☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ खचू लागली भूई – सौ.नीलम माणगावे ☆ श्री अभिजीत पाटील ☆ 

नीलम माणगावे यांचा नवा कविता संग्रह भेटीस आला त्या संग्रहावरील अल्पस टिपण आपल्या आस्वादासाठी सामाजिक, वास्तव, निसर्ग,  ऐक गंगे, नातेसंबध, ती, आणि परिवर्तन, अशा विविध विचार मंथनाच्या खोल चिंतनातून आलेल्या काव्य भावनात्मक सहज सरळ तितकाच वेधक, कुठे भेदक, तर कुठे निरामय, काहीशी  आत्मसंवादी, तर नेमके वास्तव व्यक्त करणारी कविता,सध्याच्या आघाडीच्या लेखीका, नीलम माणगावे यांच्या खचू लागली भुई या नव्या कविता संग्रहामध्ये एकसंघ समाविष्ट असलेला कविता संग्रह भेटीस आला आहे.

सौ.नीलम माणगावे

प्रज्ञा दया पवार यांची नेमकी प्रस्तावना लाभलेला हा संग्रह सुरवातीला आपले मुखपृष्ठ लक्ष वेधून घेतो,आतील कवितेस उठावदार करणारी मंडणी आणि त्यांची कविता ही वाचकांची होऊन जाते, कविता तुमच्या, आमच्या, त्यांच्या

तुम्ही पेटवता आम्ही पेटतो,

तुमच्या हातावर ओरखडासुध्दा नाही

आमचे देह काळेठिक्कर !

तळहातावर शिर घेऊन

बंदुकीच्या चापवर फुलपाखरू

जिंकू किंवा मरू,

तुम्ही त्रिशूल वाटता

आम्ही फुले वाटतो

पाहूया, जास्त जखम कुणापासून होते !

अशा वास्तववादी कवितेची सुरूवातीला भेट घडते आणि आपण विचार करायला लागतो सध्याचा भोवतालच्या परिस्थितीचा

दात पाडलेले असले,म्हणून काय झाले?

साप तो सापच ना?

किती हळूवार पणे व्यक्त होतात या ओळी

म्हणून त्याची तिव्रता कमी नाही होत त्यातील भेदकपणा  मनाला डंख करतो,

धर्मा बद्दल भाष्य करतांना

भयहीन जगण्यात

प्रत्येकाच्या मनात हिरवं रोप

जिवंत राहील,

जे दुसऱ्याला जगवील

यालाच धर्म म्हटलं तर…?

अशी सोपी पण विचार करायला लावणारी कविता नव्याने आपल्याला आपल्याकडे बघायला शिकवते

चिमण्यांना हुसकावून

कावळ्यांनी घर केले

कावळ्यांना हुसकावून मग

बगळ्यांनी

अख्खे झाडच काबीज केले !

आता…

कावळे सैरभेर

चिमण्या दीशाहीन

बगळे स्वामी !

चिमण्यांनी पुन्हा एकदा उठाव केला

बगळ्यांनी प्रतिहल्ला केला

चिवचिवाट…कलकलाट..

फडफडाट…

यातून बरेच काही सांगून जाणारी जाणीव कवीला मांडायची आहे ती तुमच्या माझ्या पर्यंत येऊन पोहचते हे नक्की मृत्यू की सुटका ही अशीच एक भेदक कविता मनात कल्लोळ निर्माण करते वेग किती वाढला हे जाणून घेण्यासाठी वेग ही कविता जग किती जवळ आले आहे याची नोंद घेते,

चला, बोनसायांच्या जगात

चेह-याच्या शोधात

आता घरातून बाहेर पडताना

विश्वास वाटत नाही

की हा रस्ता…घरापर्यंत पुन्हा सोबत करेल…

मी माझा…अभिमन्यू बनवील?

हे वास्तव तुमचं – आमचं

या बोनसायांच्या जगात जग जवळ आले,

तुम्ही आम्ही कुठे कशासाठी कुणासाठी धावतो आहोत,

त्याचा शेवट काय?

आपण किती ठेंगणे झालोत,

आभाळाला आपण हात लावू शकत नाही,

प्रत्येकाच स्वतंत्र आभाळ स्वतःपुरत ही खुजी माणसं मनाने कधी मोठी होणर सार्वभौम आपण का नाही होत?

आपला बोनसाय झालाय हे मान्य करायला हवेच

घुशींचे काय करायचे?

हे घर…घराच्या भिंती

संरक्षणाच्या आहेत,पण…

घरच्या चोरांचे काय करायचे

हे नाक…श्वास घेण्यासाठी

पण नाकात वेसण घालणाऱ्या हातांचे काय करायचे?

हा वारा…जगण्याची आस देणारा

पण त्यात लपलेल्या

जीवघेण्या वादळांचे काय करायचे?

ही झाडं,पानं,फुलं,

आभाळ… माती

रानभर पसरलेली नाती

ही सगळी आपलीच !

 पण सगळीकडे लागलेल्या

घुशींचे काय करायचे?

ही समर्पक कविता अधिक बोलूच देत नाही, हीच अवस्था घर दार गल्लीत नगरात,राज्यात देशात आणि कधीकधी मनातही याचं काय करायचे हा प्रश्न याची उत्तरे शोधायला हवीत… जो जे वांछिल तो ते लाहो…. या कवितेत आपण साफ उघडे पडतो, तर सत्ता या कवितेत सत्तेचे सारे चेहरे डोळ्यासमोर येतात

काळ्या दगडावरची रेघ

तुम्ही द्रोणाचार्य असलात,तरी आम्ही एकलव्य नाही

तुम्ही उध्वस्त केलीत आमची स्वप्ने,पण-

माळरनावरही फुलं फुलतात..हे लिहून ठेवा !

ही भिमगर्जनाच आहे सत्व,नीतीनिष्ठ आणि सच्च्या मातीवर विश्वास असणाऱ्या मानवतेची प्रार्थना म्हणणा-या माणसांची, निसर्ग कवितेच्या वाटेवर नीलम माणगावे तितक्याच संथपणे निसर्गाच्या होऊन जातात तिथल्या विरोधाभासाचे,तर कधीकधी तिथल्या तरंगाच्या परागाच्या गोष्टी सांगतात

खूप पेरलेले…

उगवले काहीच नाही

कधीच नव्हते पेरले,त्यांनीच केली घाई

पोळपाटाला पानं..लाटण्याला आली फुलं

हिरवी झाडं कालबाह्य…

कारखान्यात पिकूलागली फळं

आता मातीने करावे काय

कसायाला विकली गाय

कुठं कोल्ड्रिंक धरून ठेवत नाही साय…

हे समजून घ्यायची गरज आहे केवळ शब्दांवर नव्हे तर त्याच्या मागील तगमग निसर्ग -हास होत चाललेला अक्रोशच प्रगट करतो आहे

झाडं म्हणजे इतिहासाची पाळंमुळं

भविष्याचा वेध

कु-हाडीवर कधी करत नाहीत क्रोध

हाच शांतीचा शोध !

ही निसर्ग आणि मन शांती अनुभवायला हवी त्यासाठी झाडांचे पानांचे फुलांचे होऊन जायला हवे आपल्या माणसांच्या चित्रविचित्र वागण्याने म्युझियममध्ये ऊन वारा पाऊस ठेवायला हवा असे आपल्या कवितेत कवयत्री म्हणतात म्हणजे आपण कुठे आहोत याचा विचार करायला हवा,

ऐ क गं गे

या सदरात

खरंच गंगे

अंधारून आलं की वाटतं

आपल्या डायरीतलं एक पान गळून गेलं

पण उगवतीला वाटतं

अरेच्या ! आपल्याला तर एक नवं पानं फुटलं

हा आशावाद नेहमी आपल्या जवळ पाहिजे, परंतु आपल्याला जाणीव ही पाहिजे भोवतालची

गंगे

हीच तर नव्हे

नव्या युगाची कमाई?

कुठला बाप…

कुठली आई

गावागावातली

खचू लागलीय भुई !

अशी जाणीवपूर्वक जाणीव करून देणारी सर्व घटकांच्या सूक्ष्म प्रतिबिंब उतरत गेलेल कधी हळूवार,कधी भेदक,कधी रोखठोक सवाल बनून अनेक अंगानी भाष्य करणारी चिंतनशील,तर कुठे निर्देश करणारी तर कुठे नोंद घ्यायला हवी अशी कवितेची भुई अधिक समृद्ध करणारी कविता नीलम माणगावे यांची नव्या संग्रहाच्या निमित्ताने भेटीस आली आहे त्याचे स्वागत आहे हा सुंदर देखणा कविता संग्रह आपल्या संग्रही असावा असाच आहे,

या मधील अनेक कविता स्पूट स्वरूपात तर काही दिर्घ अशा आहेत, त्या आपल्या विषयाशी घट्ट नाते सांगणाऱ्या आहेत अशी जात, धर्म, कर्म, मर्मभेदी वास्तव अवास्तव वाढलेल्या माणूसपण सुटू पाहणाऱ्या गोष्टीवर भाष्य करणारी कविता आपली होऊन जाते.

नीलमताई माणगावे या संग्रहातून अधिक व्यापक पध्दतीने समोर येतात त्यांची कविता निश्चितच ठळकपणे नोंद घेण्यासारखी आहे.

 

संपर्क – सुश्री नीलम माणगावे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर, मो  9421200421

© श्री अभिजीत पाटील

सांगली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments