श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “देवालय – एक शोध परिक्रमा” – लेखिका : सुश्री सुनीला सोवनी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : देवालय – एक शोध परिक्रमा
लेखिका : सुनीला सोवनी
प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स
पृष्ठे : २१६
मूल्य: २५०₹
अयोध्येतील श्रीरामलल्लाची मूर्ती घडविणारा मूर्तिकार अरुण योगीराज प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणू लागला “ही मूर्ती मी घडवलेली नाही ” त्याच्या या आश्चर्यकारक उद्गारा मागचे रहस्य काय असावे ? त्यावेळी श्रीरामाची झलक अनुभवणाऱ्या प्रत्येकाचे भान हरपले, डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले ते कशामुळे ?
केरळमधील शबरीमला येथील स्वामी अय्यप्पा मंदिरात विशिष्ट वयातील महिलांना परंपरेने प्रवेश नाकारला तो का ?आणि तिरुअनंतपुरम पासून 16 कि. मी. वरील माता भगवती मंदिर परिसरात प्रतिवर्षी ओणमच्या दिवशी महिला भक्तांची विश्वविक्रमी गर्दी होते ती तरी का ?
भगवान विष्णुच्या विठ्ठलरुपी भेटीसाठी आतुरलेले वारकरी “माऊली माऊली “असा धावा करीत पंढरीची वाट तुडवतात मात्र असा ” माऊली” चा मान त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आदी ज्योतिर्लिंगांना का नाही दिला जात ?
तिरूमला पर्वतावरील बालाजी सुद्धा विष्णूचेच रूप.. मात्र तो “धनदाता”म्हणून विख्यात! तर या डोंगरा जवळचेच कालहस्ती मंदिर “सर्वबाधा निवारक” म्हणून प्रसिद्ध हा भेद कशामुळे ?
महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली किंवा बनशंकरी, शांतादुर्गा, कामाख्या अशी कित्येक शक्तीदेवतेचीच नावे नी तिचीच देवालये, परंतु प्रत्येकाची महती वेगळी, आराधना वेगळ्या, फलश्रृती सुध्दा वेगळी असे का असते ?
भल्या मोठ्या पिंपळाखालच्या पारावरील एवढ्याशा दिवटीच्या प्रकाशातला मारुतराय घाबरलेल्या मनात जशी आश्वासकता निर्माण करतो तशी आश्वासकता नेत्रदीपक रचनेने समृध्द वेरूळचे कैलास मंदिर किंवा कोणार्कचे सूर्य मंदिर का नाही करू शकत ?
देव- देवालयांच्या संस्कृतीने नटलेल्या अशा आपल्या देशात प्रत्येक देऊळ वेगळे दिसते, वेगळे भासते पण वेगळे असत नाही. ते कसे ?
कुठल्याही मंदिराच्या गाभाऱ्यात अनुभवता येणारी शांतता, प्रसन्नता दुसऱ्या एखाद्या भव्य- दिव्य.. डोळे दिपवणाऱ्या वास्तूरचनेमध्ये अनुभवता येईलच याची खात्री देता येत नाही. असे का व्हावे ?
दक्षिणेतील मंदिराभोवतीची गोपुरे किंवा दिपमाळा कोणाला साद घालतात ? देवळाचे गर्भगृह लहान व अंधारे का असते ? मनात येईल त्या मोकळ्या जागेवर मंदिर का नाही बांधत? मंदिरातून पूजा- अर्चा, होम- हवन सारखे का चालू असते ?
विभिन्न संप्रदाय नी मंदिरे यांचा परस्परसंबंध काय ?
मुळात देवालये निर्माण का केली जातात? मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का होते ? योगशास्त्रात वर्णिलेली कुंडलिनी शक्ती नी देवालये यांचा परस्परसंबंध असतो तो काय ?
अशा कित्येक प्रश्नांचा वेध घेत उत्तरे देणारी अर्थात मंदिर चे रहस्य उलगडणारी ही ” देवालय – एक शोध परिक्रमा “
मंदिर दर्शन हा देखल्या देवा दंडवत असा वरवरचा किंवा मार्गदर्शकाने दिलेल्या दृष्टीमुळे तात्पुरते अचंबित होण्याचा किंवा मंदिर प्रवेशावरून तावातावाने भांडण्याचा विषय नसून येथल्या प्रत्येक निर्माण प्रक्रियेमागे, कृतीमागे महाप्रचंड अर्थ आहे. ‘देवालय’ म्हणजेच परमेश्वराचे घर साकारण्याची ती एक अशी प्रक्रिया आहे की, ज्यायोगे परमेश्वरी शक्तीचे भक्तामध्ये जागरण घडून येईल, भक्ताचे रूपांतर होऊन भक्त आणि भगवंत एकरूप होतील. परमेश्वरी कृपाप्रसादाने भक्ताचा भगवंत व्हावा, त्याचे परमकल्याण व्हावे यासाठी केलेला तो फार मोठा यत्न आहे.
जीवमात्राला सुखी-आनंदी जीवन जगता यावे यासाठी जगभरात अक्षरशः शेकडो पंथ, संप्रदाय, वाद-विचारधारा, राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था जन्माला आल्या आणि बहुतेक जण अधिकांच्या अधिकतम सुखापर्यंत जाऊन पोहोचले. भारतातही अनेक मार्ग जन्माला आले, मात्र या सर्वांनी सर्वव्यापी ईश्वराचे (एकाच एका चैतन्यशक्तीचे) दर्शन घेतले व त्यांनी सर्वांच्या परमसुखाचा -चिआनंदाचा ध्यास घेतला. अनुभूतीच्या बळावर परमकल्याण साधणे हेच प्रत्येक मार्गाचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यातलाच एक मार्ग म्हणजे ‘सगुण भक्ती’च्या माध्यमातून समस्त उत्कर्ष घडविणारा भक्तिमार्ग होय आणि त्या भावआराधनेचे साधन केंद्र म्हणजे मंदिर होय.
‘देवालय’ शोध परिक्रमेचे संकलन मुख्यतः तीन भागात वर्णिले आहे. पहिला भाग बाह्य सृष्टीवर म्हणजेच मंदिराच्या अंगोपांगाचे वर्णन करणारा. त्याचे अंतरंग उलगडून सांगणारा आहे. एखाद्या नितांत सुंदर, भव्य, अत्याधुनिक वास्तूच्या रचनेने आपण प्रभावित झालो तरी तिला प्रार्थनास्थळ किंवा देवालय अशी उपमा देत नाही. मात्र शिखर, गोपुरे, दीपमाळा, शंखनाद असे काही दिसू, ऐकू येऊ लागले की आपण जाणतो की इथे परमेश्वराचे निवासस्थान आहे. प्रारंभिक भागात देव-देवालयांची परंपरा, त्यांच्या प्रमुख शैली, साकारलेल्या मंदिर रचनेमागचा अर्थ, प्रत्येक स्थानाचे महत्त्व, त्या वैशिष्ट्यपूर्व रचनेमागचा खोलवर विचार यात मांडला आहे.
दुसऱ्या भागात कुठल्याही भेदभावनेशिवाय हजारो मंदिरांमधून सर्वांना मुक्त प्रवेश असला, तरी एखाद्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश का नाकारला जातो अथवा एखादे मंदिर स्त्रियांना कृपा आशीर्वाद देण्यासाठी सिद्ध कसे असते, हे ज्या चैतन्य शक्तीवर अवलंबून असते, अशा मंदिर -निर्माण शास्त्राची म्हणजेच आगमे वा तंत्रे यांची माहिती देण्यात आली आहे. आज देशभरातील मंदिरे ज्या संप्रदाय व त्याच्याशी निगडित श्रद्धा -आगमांमधून निर्माण करण्यात आली आहेत, अशा प्रमुख संप्रदायांची संक्षिप्त ओळख, संबंधित प्रधान देवतेविषयीच्या भावना यात आढळतील. त्याचप्रमाणे मंदिर वास्तू अंतर्गत चैतन्यशक्तीची जागृती ज्या तंत्र, मंत्र, यंत्र, मूर्तीद्वारे विकसित आणि प्रवाहित ठेवले जाते, त्या प्रत्येक घटकांचे कार्य शब्दबद्ध केले आहे. याच भागात योगशास्त्राची विशेषतः कुंडलिनी जागृती संबंधाने माहिती दिली आहे. तंत्रशास्त्रांनी सुप्तावस्थेतील कुंडलिनी शक्तीला जागे करून पिंड-ब्रह्मांड शक्तीचे ऐक्य घडविणे हेच साध्य ठरविलेले असते. हेच लक्ष्य ठेवून मंदिरशास्त्र विकसित झाले आहे.
‘ब्रह्म’ सर्ग या तिसऱ्या भागात परमपुरुष हेच अधिष्ठान, त्याच्या अंतर्गत विभिन्न देवतांची कार्ये, पिंड-ब्रह्मांड संबंध, साधक साधनेतील शूचिता, पाळावयाची पथ्ये, प्राणप्रतिष्ठा व चैतन्यजागृती, चैतन्यशक्तीचा कुंडलिनी शक्ती जागरणावर होणारे परिणाम, भक्तिमार्गातील ईश-शरणता अशा अनिवार्य बाबींचा ऊहापोह करीत अंततः देवालयातील प्राणप्रतिष्ठित वैशिष्ट्यपूर्ण चैतन्यशक्ती अर्थात ईश सिद्ध पीठ जीवाशिवाचे ऐक्य घडविण्यासाठी सहायक ठरणारे ‘योग मंदिर’ म्हणून सदैव कार्यरत कसे राहते याचे वर्णन करीत ही परिक्रमा पूर्णत्वास जाते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







