सौ. ज्योती कुळकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कृतार्थ वार्धक्य” -लेखिका : डॉ. वनिता पटवर्धन  ☆ परिचय –  सौ.ज्योती कुळकर्णी ☆

पुस्तक : कृतार्थ वार्धक्य

लेखिका: डॉ. वनिता पटवर्धन

प्रकाशक: अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान

म्हातारपण आयुष्याच्या दरवाज्याला धडका देऊ लागलं. तोच वाचस्पती डॉक्टर वनिता पटवर्धन, ज्ञानप्रबोधिनी मानसशास्त्र विभाग, यांचे ‘कृतार्थ वार्धक्य’ हे पुस्तक वाचनात आले.

अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान तर्फे ‘ रंग समुपदेशनाचे ‘  व ‘ तारुण्यातून प्रौढत्वाकडे: आव्हाने समस्या आणि समुपदेशन ‘ या दोन्ही पुस्तकांच्या यशस्वी संपादनानंतर प्रतिष्ठानाने पुण्याच्या प्रज्ञा मानस संशोधिका, ज्ञानप्रबोधिनी येथे कार्यरत असलेल्या वाचस्पती डॉक्टर वनिता पटवर्धन यांच्यावरच वृद्धांच्या समुपदेशनासाठी काढण्यात येणाऱ्या पुस्तकाची ही जबाबदारी सोपविली. त्यातूनच या अभ्यासपूर्ण पुस्तकाची निर्मिती झाली.

कृतार्थ वार्धक्य या नावातच लेखिकेला काय सांगायचंय हे दडलं आहे. पुस्तक हातात घेतल्याबरोबर आपल्याला दिसतं ते मुखपृष्ठ! त्यातूनच लेखिकेला काय सांगायचं आहे ते सुंदर रीतीने व्यक्त होतं. अनेक पावसाळे काढल्यानंतर उमटणारे इंद्रधनुष्याचे रंग खूप खुलणारे नाहीत. जून झालेले आहेत. तसेच ते दिसतात देखील आहेतच. त्याचबरोबर चेहऱ्यावरच्या वार्धक्याच्या रेषा व डोळ्यातील निष्पर्ण झाडातील साम्य दाखवतानाच त्याच्यामधून निघणारा स्वच्छ सूर्यप्रकाश पुस्तकाद्वारे काय सूचित करायचं आहे हे स्पष्टपणे सांगून जातो.

वृद्धत्वाची कृतार्थ वाटचाल करताना येणाऱ्या सर्व अंगांचा विचार यात मांडलेला आहे. वृद्ध कोण हे ठरवताना जे कार्य मग्न असतात त्यांच्या वयावरून वृद्धत्व ठरवायचे का?तसेच जे तरुण वयातच उदास जगतात ते अकाली जून झालेली पाने नव्हेत का? असा प्रश्न उपस्थित करून लिखाणाला दिशा दिली आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती हा नियम वृद्धांनाही लागू होतो.

निसर्ग नियमाप्रमाणे वृद्धत्व येणारच हे प्रत्येकाने गृहीत धरावेच लागेल. व वृद्धत्वातही ‘इकेगाई’ म्हणजे राहिलेल्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवून मार्गक्रमण सुरू ठेवल्यास वृद्धत्वाला संध्या प्रकाश असे आपण म्हणू शकू ही एक छान आशादायी गोष्ट मांडली आहे.

वृद्धांची मनोधारणा कशी असते हे सांगणारं ही स्वतंत्र प्रकरण घेतलं आहे. कुणाला पूर्वीप्रमाणे आपण नाही म्हणून आयुष्य रटाळ वाटते. तर कोणी थकलो आहेत हे मान्य करायलाच तयार नसते. वृद्धांची बौद्धिक स्थिती, स्मृती- विस्मृती याबद्दलही आढावा घेऊन कार्यक्षमतेची उपयोगिता मांडली आहे. वृद्धांच्या सामाजिक स्थितीचा आढावा घेताना तरुण व वृद्ध यांची बाजू मांडताना न्यायबुद्धीने निरीक्षण मांडून दोन्ही पिढ्यांची बाजू व्यवस्थित मांडली आहे. कृतार्थ वार्धक्य जगण्यासाठी समुपदेशनाचे महत्त्व देखील त्यांनी मांडले आहे. तसेच सूर्यास्ताची चाहूल लागल्यानंतर पुढील सर्व गोष्टींचे नियोजन कसे करावे याचा उपयुक्त सल्ला आपल्याला पुस्तक वाचल्यानंतर मिळतो.

शेवटी पु.लं.चे पिकत जाणाऱ्या वार्धक्याबद्दलचे विचार शेवटच्या चौकटीत मांडून भूतकाळातली पुंजी घेऊन वर्तमान काळात उत्साहाने जगणे हीच वार्धक्याची कृतार्थता आहे हे सांगितले आहे.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात निरनिराळ्या तज्ञांनी समुपदेशनाचे महत्त्व सोदाहरण पटवून सांगितले आहे. डॉक्टर मानसी देशमुख यांनी दोन केसेस मांडल्यात. एका केस मध्ये काका व काकूंच्या विरुद्ध स्वभावामुळे उत्पन्न झालेली समस्या दोघांनीही समुपदेशनाला सहकार्य केल्याने व्यवस्थित सोडवल्या गेल्याचे सांगितलंय तर दुसऱ्या अलझायमरच्या केस मध्ये समुपदेशनाला सहकार्य नाकारल्याने वेळ लागतोय हे मांडले आहे.

नंतर श्री. कालिदास पाटील यांनी नाकापुढे बघून संसार केलेल्या पण नंतरच्या पिढीने मी म्हणेल तसेच वागले पाहिजे अशा हट्टग्रही आजोबांची समस्या मांडून समसमूपदेशनाने कशी सोडविली ते सांगितले आहे.

डॉक्टर मृदुला आपटे यांनी अशाच प्रत्येक कामात परफेक्शन हवे असणाऱ्या व इतरांकडूनही, त्यांना त्रास होत असला तरी तशीच अपेक्षा ठेवणाऱ्या सुमतीमुळे कुटुंबात उत्पन्न होणारी समस्या समुपदेशनाने हळूहळू दूर होते हे दाखवून दिले व दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी अती जेष्ठ पालकांना सांभाळताना येणाऱ्या समस्येवरही तोडगा काढता येतो हे दाखवून दिले.

अशा दोन भागात हे पुस्तक आहे.लेखिकेने आपल्या मनोगतात,वाचकांचा कुठे कुठे रस भंग होऊ शकतो असे म्हटले आहे. पण मला तरी एक क्लिष्ट विषय वाचनीय स्वरूपात मांडलेला वाटला. वृद्धपकाळातील तीन टप्पे म्हणजे जणू शरदातील चांदणे, हेमंतातील पानगळती आणि शिशिरातील गूढ शांतता! ” वृद्धांना पुढे येणाऱ्या वसंतातील मोहर आणि कोवळी पालवी यांची चाहूल असेल तर वार्धक्य हे परिपक्व असेल” अशी अलंकारिक भाषा पुस्तकाचे सौंदर्य निश्चितच वाढवते तसेच अधून मधून वापरलेल्या चौकटी विचार मांडणीतली सुसंगताच दाखवतात.

एकंदरीत पुस्तक खूपच छान झाले आहे. एकदा तरी वाचावेच असे आहे. त्यातून तरुण व वृद्धत्वाकडे जाणारे या सर्वांनाच मार्गदर्शन मिळते. डॉक्टर वनिता यांनी वृद्धत्वाला कृतार्थ समृद्ध करण्यासाठी जुन्या वस्तूंचे नियोजन, तसेच पूजा करण्याने शांतता मिळवून घेता येते, या व अशा अनेक बारीक सारीक गोष्टींचे तपशील मांडले आहेत.

थोडक्यात त्यांनी रेखीव पाऊलवाट आखून दिली आहे. त्यावरून डोळसपणे चालल्यास सगळ्यांचेच वार्धक्य कृतार्थ होईल यात शंका नाही.

परिचय: सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vasant M Kale
0

यथार्थ परीक्षण