सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “अस्वस्थ नायक” – लेखक : श्री. आनंद टकले ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

 

पुस्तक : अस्वस्थ नायक

लेखक : श्री. आनंद टकले

प्रकाशक : शब्दश्री प्रकाशन

पृष्ठे – १८७ 

मूल्य – ३०० रु.

अस्वस्थ नायक’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवन संघर्षावर ही कादंबरी आधारित असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले आहे.

एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर कादंबरी लिहिणे, म्हंटले तर सोपे, म्हंटले तर अतिशय अवघड काम आहे. सोपे अशासाठी की त्या व्यक्तीचे व्यक्तिमव, त्याचे विविध पैलू माहीत असतात. त्या व्यक्तीच्या जीवनातले प्रसंग माहीत असतात. प्रसंग निर्मितीसाठी फारसा विचार करावा लागत नाही आणि अवघड अशासाठी, की कादंबरी आहे, म्हंटल्यावर काही प्रसंग कल्पनेनेही निर्माण करावे लागतात. ते निर्माण करताना त्यांच्या व्यकीमत्वाचे पैलू त्यातून नेमके प्रगट होतील, असे प्रसंग योजावे लागतात. प्रसग वर्णन करताना ते प्रभावी आणि उठावदार होतील याची काळजी घेताना, मूळ व्यक्तिमत्व, स्वभावविशेष नेमके स्पष्ट होतील, ही काळजी घ्यावी लागते. मूळ व्यक्तिमत्व वाचकाच्या परिचयाचे नसले, तरी लेखकाने वर्णन केलेल्या प्रसंगातून नायकाचे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे उभे रहाते.

‘अस्वस्थ नायक’ या कादंबरीचे चार भाग आहेत. पहिल्या भागात कादंबरीचा नायक रायानंद पुंडला धुळकर याचं गाव धुळकरवाडी आणि त्याच्या आस-पासचा प्रदेश याचं वर्णन येतं. तिथलं वातावरण, पर्यावरण आणि जनजीवन यांची माहिती त्यात येते. गाव दुष्काळग्रस्त. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरचं. निवेदन ग्रामीण बोलीत. ही ग्रामीण बोली पुन्हा त्या सीमा भागातली. आपल्याला परिचित ग्रामीण बोलीपेक्षा काही ठिकाणी वेगळेपण जाणवते. उदा. ‘लेका’च्या जागी ‘लग’ शब्द येतो. दावण तोडणे म्हणजे मेंढया पळवणे. गुड्डा म्हणजे डोंगर असे किती तरी वेगळे शब्द यात येतात. पुस्तकाच्या शेवटी काही अपरिचित शब्दांची यादीही दिली आहे. पण एकूण कादंबरी वाचताना निवेदनातला गोडवा मोहून टाकतो. नायक शिकलेला आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्यात कधी कधी नागरी शब्द आणि प्रमाण भाषाही येते. राया हा धनगर समाजातला. त्यामुळे धनगर समाजातील चाली-रीती, बोलण्याची- वागण्याची पद्धती, समाजाची संस्कृती, त्यांची आदराची स्थाने या सगळ्याची माहिती प्रसंगा-प्रसंगाने होते.

रायाला डॉक्टर व्हायचं होतं. ते जमलं नाही निराशेने घेरलं. मग जाणवलं, देवाने वक्तृत्वाची देणगी दिली आहे. तिचा उपयोग करू या. हळू हळू, लोकांची संघटना तो बांधत गेला. अनेक निमित्ते शोधली. अहिल्याबाईंची जयंती. सर्वांना बरोबर घेऊन त्याने तो उत्सव मोठ्या थाटात पार पाडला. यातून तो राजकारणाच्या क्षेत्राकडे वळला. कादंबरीच्या दुसर्‍या भागात त्याच्या राजकीय क्षेत्रातील वावर, याबद्दल लिहिले आहे. त्याने बांधलेल्या संघटना, काढलेले मोर्चे, त्याचे परिणाम, आपल्या गावात व इतरत्र जागोजागी उभारलेल्या भा. स. प. च्या शाखा, शेवटी सर्वांच्या आग्रहाने लढवलेली आमदारकीची निवडणूक, त्यात सुरुवातीला झालेला पराभव. तथापि तिसर्‍या क्रमांकाच्या मतांमुळे मनाला आलेली उभारी हा भाग येतो. इथे नायक म्हणतो,

लढता लढता हरलो जरी, हरल्याची खंत नाही.

पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, एवढ्यावर थांबायला

शांत बसायला मी काही संत नाही.

राजकारणातील कट-कारस्थाने हेवे-दावे, ही सारी माहिती, घटना-प्रसंगांचे वर्णन कादंबरीच्या दुसर्‍या भागात येते. इथे दुसर्‍या वेळी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत रायानंद प्रचंड मतांनी निवडून येतो. त्याच्या गावात, जत तालुक्यात प्रचंड जल्लोष होतो.

उत्तम वातावरण निर्मिती, प्रत्यक्षदर्शी प्रसंगवर्णन, संवाद आणि वर्णन याद्वारे केलेले विविधरंगी व्यक्तिचित्रण ही कादंबरीची विशिष्ट्ये सांगता येतील. वातावरण निर्मितीचा एक नमूना देते.

‘ऊन रखरखत होते. जमीन तापलेली. धग अंगात सुटलेली. वादळ-वारे भिरभिरत होते. वार्‍याने कहर माजवायला सुरुवात केली. आता टपोरे थेंब पडत होते. जीवाची तगमग थांबलेली. सारे अंग शांत शांत झालेले, पावसाच्या धारा धो धो बरसत होत्या. तापलेली भुई आधाशागत पाणी पोटात साठवत होती. ती आता सुस्त झालेली. तिचा अंगा-खांद्यावरून पाणी खेळत होते. ते पाणी खळाळत, धावत पुढे जात होते. ओढा-नाल्यातून पुढे जात होते. बंधार्‍यामुळे पाणी अडवले जात होते. पाणी जमिनीत मुरत होते. माणसांच्या चेहर्‍यावर समाधानाचं वारं सुटलेलं’

कादंबरीच्या पहिल्या दोन भागात अनेक घटना-प्रसंगांचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आहे. गावात पावसाने ओढ दिली. पाऊस पडावा, म्हणून मरीआईचा काढेला गाडा, गुड्डावरची बिरोबाची यात्रा, भिवर्गित साजरी केलेली अहिल्याबाईंची जयंती, चाबूक मोर्चा, मंत्र्यांना जत तालुक्यात जाऊ न देता पोलीस स्टेशांच्या तिथेच त्यांची गाडी आडवणं, धर्माच्या हॉटेलमध्ये गुंडांनी घातलेला राडा, त्यांच्यापुढे आगतिक झालेला धर्मा, त्यानंतर एकदा भा. स. प. चे नेते धर्माच्या धाब्यावर जेवायला येतात, ते अंनंदक्षण आशा किती तरी लक्षवेधी प्रसंगांची वर्णने यात आहेत.

अनेक नाट्यमय घटना यात आहेत. व्यजावर व्याज लावून पैसे वसूल केलेला सावकार तुक्या तांबे रायाच्या रानात येऊन धमकी देऊ लागल्यावर शिरमाने त्याची मस्ती कशी जिरवली, संत्या गायकवाडाने धनू गोरडाची दावण कशी कापून नेली आणि धनुने हाय खाऊन कशी आत्महत्या केली याचे वर्णन आहे. तोच सत्या गायकवाड अहिल्याबाईंची जयंती भिवर्गित साजरी होत असताना, सगळं गाव तिथे असणार, म्हणून लखू तात्याची दावण तोडायची (मेंढया पळवायच्या) योजना आखतो. संत्याला हे कळताच तो रायाला कळवतो आणि राया आपली ५०-६० पोरे घेऊन (मित्र) घेऊन ओहोळात त्याच्या जीपवर दगडांचा वर्षाव करून सत्याची जीप थांबवतो आणि त्याची मस्ती कशी जिरवतो, लहू तात्याची दावण कशी परत मिळवतो, हे सारे वर्णन घटना डोळ्यापुढे उभे करते. असाच आणखी एक प्रसंग म्हणजे संभाजी वाटळेकर कर्नाटकात मेडीकलसाठी रायाला प्रवेश मिळवून देण्याच्या बोलीवर, रायाकडून अडीच लाख रुपये घेतात. ते कॉलेजमध्ये भरत मात्र नाहीत. त्यामुळे रायाला मेडीकलला अ‍ॅडमिशन राया आणि त्याचा भाऊ धर्मा आपले पैसे परत मागायला जातो. त्यानंतर तो आत्महत्या करतो. पण त्याला जबाबदार राया व धर्मा असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवतो. सी. एम. , डी. सी. एम. , एस. पी. आय. जी. यांना चिठ्ठ्या पाठवून देतो. न केलेल्या गुन्ह्याची रायाला शिक्षा भोगावी लागली. पुढच्या काळातही अनेक खर्‍या – खोट्या गुन्ह्यात त्याला अडकवले गेले. असे अनेक प्रसंग, घटना, त्यातील संवाद यामधून रायचे आई-वडील, भाऊ, मित्र, विरोधक यांची व्यक्तिचित्रे आपल्या डोळ्यापुढे उभी रहातात.

या कादंबरीचे प्रस्तावनाकर प्राचार्य रा. तु. भगत म्हणतात, ‘या कादंबरीची ‘उंची’आहे, ग्रामीण समाजाला नवविचारांची प्रेरणा देण्याच्या सामर्थ्यात आणि तिची ‘खोली’ आहे, यातील पानापानावर पाझरणार्‍या माणुसकीच्या प्रगटीकरणात. येथील लेखकाचे शब्द वाचकांच्या आत्म्याशी संवाद साधतात आणि त्यांच्या हृदयातील तारा छेडतात. ’

 

कादंबरीचा तिसरा आणि चौथा भाग अगदीच लहान आहेत. तिसर्‍या भागात अवघी ५ पाने आहेत, तर चौथ्या भागात फक्त दोनच. तिसर्‍या भागात आमदार म्हणून निवडून आल्यावर रायानंदने कोणती कामे केली, याचे वर्णन येते. यात करोना काळातील दुर्दशेचेही वर्णन आहे. चौथ्या भागात कालानुरूप आणि रायानंदच्या प्रयत्नाने धुळकरवाडीचा विकास कसा झाला हे संगितले आहे. पाणी शेतीच्या बांधावर आले. शेती सुजलाम सुफलाम झाली एम. आय. डी. सी. निर्माण झाल्याने धुळकरवाडीच्या हाताला काम मिळाले. धुळकरवाडीत आर्थिक सुबत्ता आली. धुळकरवाडीतील तरुणांनी विविध क्षेत्रात नाव कमावले. लेखक म्हणतो, ‘नियती, निसर्ग, यातना, वेदना, अडचणींचा सामना करत, संघर्ष करत नव्या तेजाने प्रकाशणारी धुळकरवाडी सोनेरी दवाबिंदूसारखी लखलखत होती. उनाच्या झळावर विव्हळणारी झाडे आता शितलतेचा गारवा वाडीला देत होती.

एवढं सगळं चांगलं घडूनही नायक अस्वस्थ का? त्याचे कारण शेवटच्या दोन ओळीत दिले आहे. ‘जागतिकीकरणाच्या विळख्यात धुळकरवाडी गुंतत चाललेली. आर्थिक सुबत्ता आल्याने धुळकरवाडीच्या उंबरठ्यावर भोगवाद आणि चंगळवाद आ वासून उभा होता. ’ हा भाग अधीक विस्ताराने आला असता, तर नायकाची अस्वस्थता अधीक प्रभावीपणे वाचकांना जाणवली असती.

मुखपृष्ठ चांगले आहे. नायकाचा खंबीरपणा आणि अस्वस्थता दोन्हीही गोष्टी चेहर्‍यावरून प्रतीत होतात.

ग्रामीण नेतृत्वात होत चाललेली वाढ आणि बदलत चाललेल्या ग्रामीण जीवनाचे ताणे-बाणे समजून घ्यायचे असतील, तर प्रत्येकाने ‘अस्वस्थ नायका’चा अस्वस्थपणा जाणून घ्यायला हवा.

वातावरण निर्मिती छान आहे. व्यक्तिचित्रण वेधक आहे. विविध प्रसंगांचं वर्णन वाचताना आपण ते प्रत्यक्ष पहातोय आणि संवाद वाचताना ते प्रत्यक्ष ऐकतोय असं वाटतं. ज्वलंत वास्तवाचे दुर्मिळ दर्शन यात घडते. ‘संघटित व्हा. संघर्ष करा, यश आपल्यापुढे नतमस्तक होईल, हाच संदेश कादंबरी देते.

परिचय : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments