श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “साद मंदिरांची-ओळख संस्कृतीची” – लेखक : श्री आशुतोष बापट ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : साद मंदिरांची-ओळख संस्कृतीची

 – – बघायलाच हवीत अशी मंदिरे

लेखक: आशुतोष बापट 

पृष्ठ: १६६

मूल्य: ३५०₹ 

हिंदू मंदिरस्थापत्य ही कला नुसती भारतातच बहरली असे नाही, तर भारताबाहेरही तिचे अवशेष दिसून येतात. भारताबाहेर विशेष करून आग्नेय आशियात हिंदू धर्म पोचला होता आणि त्या वेळच्या राजांनी तिथे विविध मंदिरे बांधलेली आहेत. थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, बाली या प्रांतांतून हिंदू संस्कृती मंदिरांच्या रूपाने आजही आपले अस्तित्व राखून आहे. यातील अभिमानाची बाब अशी की, जगातील सर्वांत मोठे धार्मिक स्थापत्य हे हिंदू मंदिर असून ते कंबोडिया इथले ‘अंकोरवाट’ मंदिर आहे. अफाट, अफलातून, जबरदस्त, भव्य-दिव्य, अद्भुत अशी कितीही विशेषणे लावली तरीसुद्धा ती अपुरी पडतील असा प्रकार म्हणजे अंकोरवाट मंदिर. संपूर्ण जगातील सर्वांत मोठे धार्मिक स्थापत्य. याची भव्यता पाहून आपण नुसते अवाक होत नाही, तर निःशब्द होतो. मती कुंठित होते. हे असे काही मानवनिर्मित असू शकते यावर आपला विश्वास बसत नाही. कितीही वेळा पाहिले तरी बसत नाही. मंत्रमुग्ध अवस्था प्राप्त होणे, बुद्धी न चालणे, झपाटल्यागत फिरत राहणे हे सगळे अनुभव अंकोरवाट बघताना मिळतात. कितीही मनाची समजूत घातली तरी हे सगळे अशक्य कोटीतले काम असणार असेच जाणवत राहते. ख्मेर स्थापत्यशैलीचे सगळे घटक इथे बघायला मिळतात. त्यामुळे त्या मंदिराचा इतिहास, स्थापत्यवैशिष्ट्ये या पुस्तकात समाविष्ट करणे क्रमप्राप्त होते.

या पुस्तकात वर्णन केलेले एकेक मंदिर काही ना काही वेगळेपण जपणारे आहे. खजुराहोचे कंदारिया महादेव मंदिर हे विशिष्ट तत्त्वज्ञान आपल्यासमोर उघड करते. गुरुवर्य देगलूरकर सरांनी या मंदिराला ‘वास्तुब्रह्म’ असे संबोधले आहे. ज्या वास्तूच्या दर्शनाने ब्रह्मतत्त्वाची ओळख होते ते वास्तुब्रह्म. आपण ही मंदिरे का बघायला हवीत तर त्याचे सोपे उत्तर असे की, तत्कालीन राजानी, स्थपतींनी, कलाकारांनी ही मंदिरे जीव ओतून निर्माण केली ती मुळात सर्वसामान्य लोकांनी येऊन बघावीत म्हणून. तत्कालीन राजांनी आपले वैभव, सामर्थ्य या मंदिरांच्या रूपाने आपल्यासमोर सादर केले आहे. मंदिर हे देवाचे निवासस्थान आहे, आपल्या उपास्य देवतेची मूर्ती त्या मंदिरात प्रस्थापित केली जाणे हे साहजिक आहे. पण ते केवळ एक निमित्त आहे. त्या निमित्ताने या मंदिरांची रचना, त्यांच्यावर केलेले अफाट शिल्पकाम, समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे, प्रसंगांचे शिल्पांच्या रूपाने त्या मंदिरावर केलेले सादरीकरण म्हणजे जणू एखादा चित्रपटच असतो. मंदिरातील देवाची ओळख त्या देवाच्या विविध कथा आणि पुराणांतून आलेल्या प्रसंगातून शिल्परूपाने उलगडून दाखवणे ही सुद्धा एखाद्या मंदिराची ओळख असते. दगडावर दगड रचून केले जाते ते असते स्थापत्य. मात्र दान देणारा राजा, स्थापत्याचा आराखडा तयार करणारा स्थपती, रचना करणारा सूत्रधार, सगळे स्थापत्य मूर्तीनी सजवणारे शिल्पी या सगळ्यांच्या अथक प्रयत्नानंतर तयार होते ते ‘मंदिर’. इतके भव्यदिव्य बांधकाम, त्यावरील मूर्तिकला, त्यामागे दडलेले तत्त्वज्ञान हे सगळे समजून घेण्यासाठी मंदिरे बघणे अत्यावश्यक ठरते. आणि त्याचबरोबर भारतीय कलेचा मोठा वारसा हा मंदिरस्थापत्याच्या रूपाने आज आपल्यासमोर उभा आहे. प्राचीन भारताचा इतिहास आपल्या समोर मंदिराच्या रूपाने उलगडून दाखवतो आहे तो आवर्जून बघितलाच पाहिजे. तो अभ्यासला पाहिजे. तत्कालीन कलाकारांचे मनसोक्त कौतुक केले पाहिजे. ही मंदिरे उभी असणारी ठिकाणे आज कदाचित सामान्य वाटतील, पण ज्या काळात ही मंदिरे इथे बांधली गेली तेव्हा नक्कीच ती ठिकाणे महत्त्वाची होती. हे महत्त्व व्यापारी कारणामुळे असेल, राजकीय किंवा सांस्कृतिक कारणामुळे असेल, पण ज्या अर्थी एवढे भव्य स्थापत्य इथे निर्माण झाले त्या अर्थी इथल्या स्थानाला त्या काळात मोठे महत्त्व असणार हे नक्की.

आपला देश विविध प्रकारच्या मंदिरांनी बहरलेला आहे. प्रत्येक प्रदेशात एखादे तरी देखणे शिल्पसमृद्ध मंदिर उभे असतेच. भारतातली सगळी मंदिरे बघायची झाली तर किती जन्म घ्यावे लागतील याची गणतीच नाही. तत्कालीन राजेरजवाड्यांनी, स्थपतीनी, शिल्पिनी, कारागिरांनी हा एवढा मोठा अमूल्य वारसा मंदिरांच्या रूपाने आपल्यासमोर ठेवला आहे त्याचे काही अंशी तरी दर्शन घेणे हे क्रमप्राप्त आहे. सगळी मंदिरे नाही बघून होणार पण न चुकता बघायलाच हवीत अशी मंदिरे निवडून ती वाचकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्राच्च विद्येचे अभ्यासक आशुतोष बापट यांनी भारतभर भ्रमंती करून त्यातली नेमकी मंदिरे निवडली. त्यांचा इतिहास, ते बांधणाऱ्या राजांचे पराक्रम, त्या मंदिरांची वैशिष्ट्ये, त्यांच्यावर कोरलेल्या असंख्य मूर्ती, शिलालेख, त्यातून उलगडणारा इतिहास हे सगळे एकत्र गुंफून अभ्यासू वाचकांसाठी हे सगळे या पुस्तकाच्या रूपाने समोर आणले आहे. मंदिरांनी बहरलेल्या या देशातील किमान एवढी मंदिरे तरी आवर्जून बघायलाच हवीत असे सांगणारे हे पुस्तक. मंदिर अभ्यासकांसाठी, वारसा प्रेमींसाठी स्नेहल प्रकाशनाची ही अमूल्य भेट.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments