सुश्री अरूणा मुल्हेरकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “अंश” – लेखिका: सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
पुस्तक – अंश
लेखिका – सौ. राधिका भांडारकर
प्रकाशक – अमित प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ – श्री राजेश प्रभु देसाई
अमित प्रकाशन, पुणे तर्फे सौ राधिका भांडारकर, पुणे यांचा *अंश* हा ललित लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी *शुभंकरोती साहित्य परिवार* या समूहाच्या काव्य संमेलन प्रसंगी मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
… सौ. उमा व्यास यांनी या लेखसंग्रहाला प्रस्तावना देताना म्हटले आहे की, बागेत बसले असताना एखादे रंगीबेरंगी फुलपाखरू या झाडावरून त्या झाडावर बसलेले पाहताना आपले मन जसे त्या फुलपाखराचा ताबा घेते, त्याचप्रमाणे राधिका ताईंचा हा लेख संग्रह वाचताना आपली मनस्थिती होते. त्यांच्या या उक्तीला माझे पूर्णतः अनुमोदन आहे.
या पुस्तकातील अंश आणि इतर लेख वाचताना प्रामुख्याने जाणवते ते विषयांचे वैविध्य! यात पुराणकथांचा आधार आहे, पारंपारिक रितीरिवाज, सणवार आहेत, जुन्या नव्या पिढीतले अंतर आहे, आधुनिक विकसित तंत्रज्ञान आणि त्याचे साधक बाधक परिणाम आहेत आणि खूप काही आहे. पटकन लक्षात येणारी गोष्ट अशी, ती म्हणजे लेखिकेची अनुभूती! प्रत्येक लेखात त्या स्वतः वावरताना दिसतात, प्रत्येक बारीक सारीक तपशीलांचा त्यांनी सखोल विचार करून नंतरच स्वतःचे मत मांडलेले आहे. मग ते तपशील सामाजिक असोत, राजकीय असोत, पौराणिक असोत, धार्मिक असोत, किंवा कोणत्याही क्षेत्रातील असोत.
सौ. राधिका भांडारकर
बाईपणाचा पिंगा या लेखात राधिकाताई सुरुवातीलाच म्हणतात, ” ओठावर हसू, पदरात निखारे, निखारे भिजायला नकोत आणि पदरही पेटायला नको. हे असतं बाई पण.”
“बाई पण म्हणजे प्रकाश.
बाई पण म्हणजे धैर्य
बाई पण म्हणजे वाकणं पण मोडणं नाही
एक तळपणारी मूर्तीमंत तलवार म्हणजे बाई पण. “
या चार वाक्यातच आपल्याला अख्खी बाई म्हणजे काय हे राधिकाताईंनी समजावून दिले. या प्रभावी लेखन शैलीने सुरुवातीच्या पहिल्याच लेखात लेखिकेने वाचकांच्या मनावर ताबा मिळवला असे म्हटले तर चूक ठरणार नाही.
स्त्रियांना लेखन स्वातंत्र्य आहे का?
या लेखात त्यांना प्रामुख्याने हेच सांगायचे आहे की लेखक काय किंवा लेखिका काय
यामध्ये लिंगभेद असण्याचे कारणच नाही.
लेखक पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांच्या मनातील विचार न घाबरता, कोणत्याही बंधनात न अडकता स्पष्टपणे मांडलेच पाहिजेत. मग ते विचार मवाळ असतील अथवा बोल्ड असतील. परंतु स्त्री ही नेहमी कोणत्यातरी बंधनात अडकलेली आहे आणि म्हणूनच तिची क्षमता कुठेतरी कमी पडते हे लेखिकेला सांगायचे आहे. अपवाद म्हणून सुनीता देशपांडे, माधवी देसाई, स्नेहप्रभा प्रधान, अगदी लक्ष्मीबाई टिळक
यांच्यासारख्या स्त्रियांच्या लेखनात निर्भीडता दिसते परंतु बहुतांशी स्त्री लेखिका
एका ठराविक चाकोऱीतूनच लेखन करतात असे राधिका ताईंचे मत आहे.
स्वयंसिध्दा हा लेख स्त्री मधील धाडसी वृत्ती, ती अबला नसून सबला आहे हे वाचकांना पटवून देणारा आहे. एक दुर्दैवी, अकाली वैधव्य प्राप्त झालेली षोडशकन्या, जे वय नाचण्या उडण्याचे, फॅशन करण्याचे, मित्र मैत्रिणीत रमण्याचे, त्या वयात सासू-सासरे आणि पदरात चार महिन्याचे बालक घेऊन शंभर वर्षांपूर्वीच्या काळात संसाराची धुरा पेलण्यासाठी खंबीरपणे उभी राहते, तिच्या बाळाला एक यशस्वी पुरुष बनवते. अशा स्वयंसिध्देवरचा हा लेख वाचताना अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत.
स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक विविध पैलू दाखवणारे आणखीही लेख या संग्रहात वाचावयास मिळतात.
प्रिय तरुणाई हा अत्यंत हलकाफुलका आणि सहज जाता जाता तरुण पिढीला संदेश देणारा असा लेख!
व्यासपीठावरून एका बुजुर्ग स्त्रीने तरुण पिढी बरोबर साधलेला हा संवाद! साधारणतः आजच्या पिढीला पाहून “आमच्या वेळी असं नव्हतं बुवा” हे बोलणं ऐकू येतं. थोडक्यात आमच्या वेळी जे होतं ते चांगलं होतं आणि आत्ताचं सगळं वाईटच अशी बोलण्याची पद्धत सर्वत्र पहायला मिळते. लेखिका मात्र वेगळी आहे. तिने वर्तमानाचा मोठ्या मनाने स्वीकार केला आहे. आजच्या तरुण पिढीकडून किती नवीन गोष्टी जुनी पिढी शिकू शकते हे मान्य करताना तिच्या मनाचा मोठेपणा जाणवतो. हा लेख म्हणजे सत्याची स्वीकृती आहे.
तरुणाईच्या पाठी मी एक मिणमिणता दिवा घेऊन उभी आहे असेही लेखिका सांगते. तरुण वर्गाने मागे वळून पहावे, मोठ्यांकडे दुर्लक्ष करू नये हाही संदेश त्यांना देते. शेवटी जुन्या नव्याची सांगड घालता आली पाहिजे हा फार उपयुक्त बोध वाचकांना या लेखातून मिळतो.
काळ पुढे पुढे सरकत जातो, काळानुसार माणसांतही बदल होत जातात, परंतु कितीही बदल झाले तरी जे मूळ असतं ते तसंच राहतं. त्या मुळाची ओढ कायम असते. परिस्थितीनुसार माणूस बदलण्याचा प्रयत्न करीत असला तरी स्वभाव कसा बदलेल? हेच सत्य लेखिकेने *प्रिय अस्मादिक* या पत्ररूपी लेखात मांडले आहे.
पॉपकॉर्न हा लेख, म्हटलं तर विनोदी, म्हटलं तर उपहासात्मक. पॉपकॉर्न संस्कृतीचा निखळ आनंद कसा घ्यावा हे सांगणारा. हा लेख वाचताना अपूर्वाईतील पु. लं. ची आठवण झाली.
नाचा उडा मुक्त व्हा आणि मुळचा कडक,
कठीण सुका भाव उधळून पिसासारखे हलके व्हा हा पॉपकॉर्न या शब्दात दडलेला संदेश वाचकांना नक्कीच आवडेल.
महाभारतातील अश्वत्थामाची गोष्ट घेऊन *अमरत्व शाप की वरदान*? हा लेख लेखिकेने लिहिला आहे.
अश्वत्थामाला मिळालेल्या अमरत्वाच्या वरदानामुळे आणि त्याच्या कपाळावरील संरक्षक मणी काढून घेतल्यामुळे कपाळावरील भळभळणार्या जखमेचे दुःख सहन करीत त्याला जगावे लागले म्हणून त्याचे अमरत्व शापित ठरले.
प्रत्येक माणसाला मरणाची भीती वाटते, परंतु अमरत्व हे खरोखरच आनंददायी आहे का याचा विचार आपण करत नाही.
मरावे परी कीर्ती रुपी उरावे, हेच खरे अमरत्व
हा अत्यंत मोलाचा संदेश देणारा असा लेख आहे.
अंश! पुस्तकाच्या नावाचा लेख. लेखिका स्वतःच्या अंतरंगात डोकावते आणि स्वतःचा शोध घेते. तेव्हा एकाच वेळी तिला तिच्यातील अनेक रंग दिसतात. तिची नेमकी प्रतिमा कशी आहे या संभ्रमात असताना तिला जाणीव होते की ती तर या विश्वाचा एक अंश आहे.
पुस्तक वाचत असताना प्रकर्षाने जाणवते ती राधिकाताईंची लेखनशैली! कोणत्याही क्लिष्ट शब्दांचे अवडंबर नाही आणि अगदी साधी, सरळ, प्रवाही अशी भाषा, त्याचप्रमाणे त्यांच्या दीर्घ आयुष्यातील त्यांनी अनुभवलेले, जपलेले क्षण आणि अभ्यासू वृत्ती! त्यांच्यासमोर ठा- कलेली परिस्थिती कशीही असो, चांगली वाईट, आनंदी, केविलवाणी, त्यांना पहिला प्रश्न पडतो तो हे असे का? या प्रश्नांची उत्तरे त्या शोधत असतात आणि जेव्हा उत्तर सापडते तेव्हा त्यांची शब्दगंगा स्वच्छ नितळ वाहू लागते.
पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी बोलले नाही तर पूर्ण न्याय मिळणार नाही. मखपृष्ठकार श्री. राजेश प्रभुदेसाई यांनी *अंश* या शीर्षकासाठी अगदी योग्य असेच मुखपृष्ठ तयार केले आहे.
आपण सगळेच संसाराच्या भोवर्यात सापडलेले एक अंश आहोत. त्यातून बाहेर कसे पडता येईल याचा विचार चालला आहे. या पुस्तकाची लेखिकाही याला अपवाद नाही. निसर्ग मात्र या भोवर्यातही तटस्थपणे उभा आहे. रात्रीच्या गर्भात उद्याचा असणारा उषःकाल आणि गुलमोहराचे ताठ कण्याने उभे असणे हे या तटस्थ वृत्तीचे द्योतक आहे.
हे सर्व लेख वाचले की आपल्या मनाला त्यात नमूद केलेल्या गोष्टी पटतात. आपणही याच अंशाचा एक भाग आहोत असे वाटू लागते, आणि म्हणूनच एकदा हे लेख वाचायला घेतले की पुस्तक हाता वेगळे करावेसे वाटत नाही. पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवावे आणि जेव्हा केव्हा एकटेपणा जाणवेल, मनात काही शंका कुशंका निर्माण होतील तेव्हा अंश उघडावे आणि प्रथमदर्शनी दिसेल तो लेख वाचण्यास सुरुवात करावी इतका हा लेख- संग्रह वाचनीय झाला आहे यात शंका नाही.
परिचय : अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






