सुश्री तृप्ती कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ सैतान… लेखक : श्री नारायण धारप ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक : सैतान
लेखक : नारायण धारप
प्रकाशक : साकेत प्रकाशन
नारायण धारप म्हणजे भयकथांचे अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं जायचं ते का याचं उत्तर मला नारायण धारपांची पुस्तकं वाचल्यावर मिळालं. खरंतर भयकथा हा मी आवर्जून वाचण्याचा साहित्यप्रकार नाही. पण वाचनामध्ये नावीन्यपणा आणण्यासाठी किंवा वाचनाची गोडी टिकवण्यासाठी म्हणून हा साहित्यप्रकार वाचायला मी सुरुवात केली. असं असलं तरी नारायण धारपांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांनी मात्र अनेक वर्षांपासून माझं लक्ष वेधून घेतलं होतं. बऱ्याचदा मुखपृष्ठ बघूनच आपल्याला आतला मजकूर फारसा भावणार नाही असं वाटून मी ती पुस्तकं वाचण्याचं आवर्जून टाळलं होतं.
आता वाचायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की मुखपृष्ठं भयानक असली तरी आतला मजकूर मात्र केवळ भय भावनाच सांगत नाही. धारपांच्या पुस्तकांमध्ये सगळ्यात जाणवणारी गोष्ट म्हणजे मती गुंग होणे. भयकथांचं महत्त्व केव्हा वाढतं तर तुम्हाला त्या भयामागचं कारणच समजत नाही तेव्हा. पण इथे कारण समजलं असलं तरी त्याचा जो भयावह परीणाम होतो किंवा त्या कथेतून आपल्याला वाचायला मिळतो त्याने जास्त भय वाटत राहते.
‘सैतान’ या मी वाचलेल्या कादंबरीबाबत बोलायचं झालं तर कथानक साधं घेतलं आहे. पुण्याजवळच्या एका गावात तीनवाडीमध्ये एका खडकाळ डोंगराळ निर्मनुष्य वस्तीवर विमान कोसळतं. आणि सबंध विमान पेट घेऊन त्यातील एकही व्यक्ती जिवंत राहत नाही. सर्वच्या सर्व मृत पावतात. आणि या दुर्घटनेच्या प्रसंगानंतर त्या तीनवडी गावावर जे संकट बेततं त्याची ही कथा. कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना ध्यानीमनी नसलेला मृत्यू स्वीकारणं हे शरीराला जरी अपरिहार्य असलं तरी मानवी वासना भावना यांना ते सहज शक्य होत नाही. आणि या मृतात्म्यांच्या आक्रोशातून स्वतःला जिवंत ठेवण्याच्या धडपडीतून निर्माण झालेल्या वासनांतून पुढे घडणाऱ्या गोष्टी म्हणजे हे कथानक.
प्रसंगांचं तपशीलवार वर्णन आणि अचूक शब्द योजना हे नारायण धारपांच वैशिष्ट्य यातून दिसून येतं. म्हणजे रहस्य कथा असो किंवा भयकथा असो शब्दयोजना प्रचंड महत्त्वाची असते. आणि तिच वाचकाच्या मनावर पकड घालू शकते. अनेकदा प्रसंग खूप रहस्यमय नसतील तरी चालेल पण त्यांची मांडणी आणि त्यातले शब्द हेच वाचकाच्या मनावरती प्रभाव टाकतात आणि यामध्ये धारपांचा हातखंडा जाणवतोच.
आणखीन एक त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे एक सलग कथानक घेऊन सरळसोटपणे लेखन ते करत नाहीत. त्यांच्या कथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकथानकं असतात. आणि त्या उपकथानकांचा एकमेकांशी संबंध असतो तो वाचकाला समजून घ्यावा लागतो. म्हणजे धारपांच पुस्तक वाचताना वाचक म्हणून लागलेली आपली तंद्री फार महत्त्वाची असते. नाहीतर आपल्याला उपकथानकातला मूळ कथेशी असलेला धागा पटकन समजू शकत नाही. कारण प्रत्येक उपकथनकात एखाद्या घटनेचा धागा जरी समान असला तरी पात्रांची नावे, परिस्थिती, वर्णन त्यांची कामं ही पूर्णपणे वेगळी असतात. एक विमान कोसळून पडणं या एका घटनेचा संबंध पुजारी, पादरीबुवा, फोटोग्राफर, आर्मी मधले रिटायर्ड ऑफिसर, गावातील गुंड प्रवृत्तीची माणसं आणि ती घटना पाहण्यासाठी जमलेली एक लहान मुलगी या सगळ्यांवर किती वेगवेगळ्या प्रकारे होतो आणि ते त्याला कसे सामोरे जातात त्याचं अत्यंत प्रत्ययकारी वर्णन यात आलं आहे.
काही प्रसंगात ती बाहुली जेव्हा चालत येते तेव्हा तिचं वर्णन, नंतर खसखस हसण्याच्या आवाजाचे वर्णन हे वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो. त्यांचं कथानक वाचताना आपली तर्कनिष्ठा बाजूला ठेवावी लागते असं न म्हणता मी तर उलट म्हणेन आपल्या तर्कनिष्ठेला आव्हान देणारं कथानक ते लिहितात. आणि त्यामुळे त्यांचं लेखन परिणाम करतं.
विमान अपघात या एका दुर्दैवी घटनेचे वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या लोकांवर कसे परिणाम होऊ शकतात हे दाखवणं सोपं नाही. पण ते कसब यात सहज साधलं गेल्यामुळे कथानक जास्त रोचक होत जातं.
सैतानी वृत्तीची शक्ती आणि सामान्य व सज्जन शक्ती या दोघांमधला संघर्ष हा अनादी काळापासून चालत आलेला आहे. आणि तोच संघर्ष अनेक मानवी मूल्य जिवंत ठेवतो आणि त्याचबरोबर त्या मूल्यांची होणारी पायमल्लीसुद्धा दाखवतो. हा जो प्रचंड विरोधाभास आपल्या जगण्यामध्ये आहे. तो फार उत्तमरीत्या ते मांडतात आणि त्याने त्या कथानकावरती विश्वास ठेवावासा वाटतो.
माणसांच्या मनोवृत्तीचं अचूक निरीक्षण, भरपूर अभ्यास आणि अनेक तांत्रिक गोष्टींचाही अभ्यास, स्थळ काळानुसार माणसाच्या जीवन पद्धतीत होत गेलेले बदल टिपणे अशी कितीतरी वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात दिसून येतात. त्यामुळे फक्त भय या नावातच माझ्याप्रमाणे जर कोणी अडकलं असेल तर त्यांनी तो एकांगी दृष्टिकोन न ठेवता एका वेगळ्या दृष्टिकोनातून हे पुस्तक जर वाचलं तर त्यांना निश्चितच काहीतरी वेगळं वाचल्याचा अनुभव मिळेल.
परिचय – तृप्ती कुलकर्णी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





