विभावरी कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष – एका डोळस रामभक्तीचा रसाळ प्रवास
लेखक – श्री. विश्वास देशपांडे, ९४०३७४९९३२
प्रकाशक – सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन
रामायणाच्या आजवर हजारो आवृत्त्या आणि शेकडो भाष्ये उपलब्ध असताना, “यात आणखी नवीन काय असणार? ” या शंकेला पूर्णविराम देणारे हे एक अत्यंत आगळेवेगळे आणि समकालीन काळाला दिशा देणारे पुस्तक आहे. लेखक श्री. विश्वास देशपांडे सरांनी कोणत्याही पारंपरिक पठडीत न अडकता, आधुनिक पिढीच्या मानसिकतेचा विचार करून या ग्रंथाची केलेली मांडणी खरोखरच कौतुकास्पद आहे.
आजच्या ‘रील्स’ आणि वरवरच्या वाचनाच्या युगात, मूळ संहिता न वाचता खलनायकांचे होणारे उदात्तीकरण (उदा. रावणाचे उद्दात्तीकरण) आणि त्यातून निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक एका दीपस्तंभासारखे काम करते.
१. मानवी मूल्यांचा मेरुमणी : पुरुषोत्तम राम
लेखकाने रामाचे चित्रण करताना त्याला देव्हाऱ्यात कोंडून न ठेवता, एक ‘सर्वगुणसंपन्न माणूस’ म्हणून आपल्यासमोर उभे केले आहे. एक सामान्य माणूस आपल्या आचरणाने, कर्तव्याने आणि नैतिकतेने कशा प्रकारे देवत्वाच्या उंचीवर पोहोचू शकतो, याचे सुरेख विश्लेषण पुस्तकातील तीन भागांमध्ये आले आहे. पुत्र, पती, बंधू, राजा, योद्धा आणि अगदी शत्रू म्हणूनही रामाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व वाचकाला अंतर्मुख करते. राम आणि रावण यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन व्यक्तींमधील नसून, तो “विश्वात्मक विचार विरुद्ध टोकाचा व्यक्तिवाद” आणि “संस्कारित रामवृत्ती विरुद्ध नैसर्गिक रावणवृत्ती” यांमधील फरक स्पष्ट करणारा आहे.
२. स्त्रीत्वाचा स्वाभिमान आणि इतर व्यक्तिरेखा
“जेथे राघव तेथे सीता” या उक्तीप्रमाणे सीतेच्या अलौकिक आणि स्वतंत्र अस्तित्वाचे दर्शन यात घडते. सीतेवरील कथित अन्यायाचा आणि तिच्या अग्निपरीक्षेचा संवेदनशील प्रसंग लेखकाने अत्यंत निष्पक्ष आणि संयतपणे हाताळला आहे. आजच्या ‘झटपट लग्न आणि झटपट काडीमोड’ या अस्थिर काळात राम-सीतेचे नाते एक आदर्श वस्तुपाठ ठरते.
याशिवाय लक्ष्मण, भरत, उर्मिला, मंदोदरी आणि बिभीषण यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे अचूक आकलन लेखकाने मांडले आहे. त्यातही संकटमोचक आणि परमभक्त हनुमंतावरील दोन प्रकरणे लेखकाच्या आत्मीयतेमुळे प्रचंड वाचनीय झाली आहेत. अगदी नकारात्मक मानल्या गेलेल्या कैकयीच्या मनाचे विश्लेषणात्मक चित्रण करून तिच्याविषयीचे गैरसमज दूर करण्याचा स्तुत्य प्रयत्न यात दिसतो.
३. प्राचीन व्यवस्था आणि आजची परिस्थिती
एक शिक्षक म्हणून देशपांडे सरांनी रामायणकालीन राजसत्ता आणि गुरुसत्ता (शिक्षण पद्धती) यांच्यातील सुवर्णसमन्वयावर अचूक बोट ठेवले आहे. आजच्या व्यावसायिक आणि भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी ती जीवनपद्धती किती श्रेष्ठ होती, हे प्रकर्षाने जाणवते. अष्टप्रधान मंडळ, ऋषिमंडळ आणि राजा यांच्या त्रिसूत्रीवर चालणारी रामराज्याची न्यायप्रिय शासन व्यवस्था आणि आदर्श कुटुंबसंस्था आजच्या विस्कळीत समाजाला आरसा दाखवणारी आहे. लक्ष्मणरेषेचे सामाजिक महत्त्व, वालीवध यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर लेखकाने अत्यंत परिपक्वतेने भाष्य केले आहे.
४. सांगीतिक गोडवा आणि रसाळ भाषा
पुस्तकाचा शेवट म्हणजे सुग्रास जेवणानंतरचा ‘गोडाचा घास’ आहे! ‘गीतरामायणा’व्यतिरिक्त असणारी, रामाच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतची वेगळी ‘रामगाणी’ समाविष्ट करून लेखकाने आपल्यातील गहिऱ्या संगीततज्ज्ञाची ओळख करून दिली आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत साधी, सरळ आणि प्रवाही असल्याने ते कुठेही क्लिष्ट वाटत नाही.
हे पुस्तक केवळ एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नसून मानवी मूल्यांचा आदर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ‘संग्रहणीय’ आहे. लेखकाची रामावरील प्रगाढ आणि डोळस श्रद्धा या पुस्तकाच्या पानापानातून पाझरते. आजच्या तरुण पिढीने आणि पालकांनी हे पुस्तक केवळ वाचावे असे नाही, तर त्यावर मनन करून ते आचरणात आणण्याची गरज आहे. अक्षरांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केलेली ही एक नितांत सुंदर आणि चैतन्यमय ‘भावांजली’ आहे. प्रत्येकाने आवर्जून अनुभवावा असा हा एक “नवनवोन्मेषशालिनी वाङ्मयीन उत्सव” आहे!
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







