सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘तरंग’ – सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

काव्यसंग्रहाचे नाव….तरंग

कवियत्री …… सुश्री अरुणा मुल्हेरकर

प्रकाशक……यशोदीप क्सक्सपब्लीxकेशन्स.पुणे.

प्रस्तुती …सौ. राधिका भांडारकर. पुणे.

प्रथम  आवृत्ती …..१ मे २०२१

 

पुस्तकावर बोलू काही—- “ तरंग “  

सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचा *तरंग हा पहिलाच काव्यसंग्रह,प्रकाशित झाला आहे..प्रथम त्यांचे मनापासून अभिनंदन!!  

अरुणाताईंचा हा पहिलाच कवितासंग्रह  असला तरी त्यातील जवळ जवळ ४७/४८ कविता वाचताना प्रथम जाणवले,ती त्यांची वैचारिक उंची आणि शब्दांवरची घट्ट पकड. काव्यरचने विषयी असलेली त्यांची जाण….!!

त्यांच्या अंतरंगातून उमटलेल्या सर्वच कविता सरल आणि सहज आहेत…विनाकारण शब्दांची अनाकलनीय, बोजड वेटोळी नसून,कवितातल्या त्यांच्या भावना आणि त्या अनुशंगाने उलगडणारे अर्थ,वाचकांसमोर स्वच्छ सादर होतात.त्यामुळे त्यांची एकही कविता कंटाळवाणी वाटत नाही..सामान्य रसिक वाचकाच्या मनाला आणि बुद्धीला पटणार्‍या आणि झेपण्यार्‍या या कविता आहेत…ही माझी पहिली प्रतिक्रिया…

तरंग या कवितासंग्रहातल्या ४८कवितांची ,सुंदर शीर्षके असलेल्या विभागातून समर्पक मांडणी केली आहे. –जसे की,

भक्तीची वाट

निसर्ग माझा सखा

प्रेमरंग

मातीचे प्रेम

स्त्री

मन…

त्यामुळे वाचकाला सुरवातीलाच एक निश्चीत दृष्टीकोन सापडतो.सर्वसाधारणपणे कवी किंवा कवियत्रीच्या काव्यकृतीमागे, त्यांच्या नेमक्या कोणत्या भावना होत्या, कोणत्या अर्थाने,त्यांनी काव्यरचना केली असावी हे वाचकाला माहीत नसते.तो त्याच्या कल्पनेने ,बुद्धीने शब्दामागचे अर्थ लावत कविता वाचत असतो…कधी कवितेचा गाभा सापडतो तर कधी नाही सापडत…

पण अरुणा ताईंच्या कवितेतले विचार नेमके आणि स्पष्ट असून काव्यात्मक आहेत.त्यामुळे वाचक कवितेच्या प्रवाहाबरोबर आनंद घेऊ शकतो.हे या कवितांचे प्रमुख वैशिष्ट्य जाणवते.

भक्तीची वाट मधल्या ,”विट्ठला “असो…शिवमहिमा असो…अष्टविनायक महिमा…देवीची आरती .—.या सगळ्या कविता मनात एक भक्तीभाव घेऊन झिरपतात…

।।विट्ठला दास मी

  सेवक तव चरणांचा

  लागलीसे आस तुझ्या दर्शनाची।।

———ही आळवणी अंत:स्फूर्त भासते.

 

।।शिवा!चंद्र सूर्य पवन

    अनल तूच अससी

     जले तू आकाशी

      आणि अवनीवरती

      ॐनम:शिवाय।।

 

———-ही शिवस्तुती वाचताना महादेवाचे मूर्त स्वरुप उभे राहते…

 

प्रेमरंगमधल्या कविता ,खरोखरच निरनिराळ्या नात्यातल्या प्रेमाच्या रंगाची ऊधळण करतात.

..–त्या रेघोट्या पुळणीवरच्या

ती सागराची भरती

लहरीवर लहरी उठती

प्रीतीच्या उर्मी उसळती….

 

——–हे शब्द सहजपणे मनीच्या प्रेमभावना जाग्या करतात

“वंदन सैनिकास…”या कवितेतली वीर रसाची निर्मीती,

मीच गौरी मीच दुर्गा मधील स्त्री शक्ती,

“रे मनुजा..”मधील पर्यावरणासाठी ची हाक,

“पहाट”या कवितेतले ऊजळणारे आकाश,

आणि “आंबट वरण ” सारख्या हलक्या फुलक्या कवितेतून भासणारे हंसरे मन….

 

———–हे सारेच इतके बोलके आणि सजीव अनुभव आहेत की या सर्वच कविता

जणु आपल्याच होउन जातात..त्यांच्याशी आपल्या मनाचे नाते जुळते…

“तरंग” या कविता संग्रहात जशा “मुक्तछंद “कविता आहेत,तसेच काही मनोरंजक काव्यप्रकारही आहेत—यात शिरोमणी काव्य आहे.. दिंडी वृत्तातल्या कविता आहेत.निरनिराळ्या काव्यप्रकाराची ओळख अरुणाताईंनी त्यांच्या”तरंग”या काव्यसंग्रहात करुन दिली आहे….

प्रत्येक कवितेविषयी  लिहीणं मला योग्य वाटत नाही कारण वाचकांनीच एकेका कवितेचा आनंद स्वत: घ्यावा.मला जशा सर्वच कविता आवडल्यातशा त्या तुम्हालाही आवडतीलच याची खात्री आहे!!  अरुणाताईंच्या कवितेबद्दल आणखी एक आवर्जून सांगावेसे  वाटते..की त्या संगीतज्ञ असल्यामुळे, शब्द,सूर, लय, नाद याचा प्रभाव त्यांच्या काव्यरचनेत आढळतो.त्यांच्या कवितेत गेयता आहे.म्हणूनच त्यांची कविता “गीत” होते.

——पहिलाच पण वाचनीय ,दर्जेदार असा हा “तरंग””काव्य संग्रह ..यातील कविता मनावर तरंगत राहतात..

यशोदीप पब्लीकेशनचे श्री.निखील लंभाते आणि सौ.रुपाली अवचरे यांनी उत्कृष्ट मांडणी,अक्षर जुळणी, छपाईच्या माध्यमातून,त्यास देखणेपण दिले ही अभिनंदनीय बाब…!!

सुश्री उषा ढगे यांचे मुखपृष्ठ तरल,कलात्मक आणि अर्थपूर्ण.त्यांचेही अभिनंदन!!

असा हा परिपूर्ण, वाचनीय “तरंग” काव्य संग्रह—-

अरुणा मुल्हेरकर यांचे पुन:श्च अभिनंदन!!

आणि त्यांच्या भविष्यातील साहित्य प्रवासास मनापासून शुभेच्छा!! 

अशाच अनेक काव्यसंग्रहाची निर्मीती  त्यांच्याकडून होवो ही प्रभुचरणी प्रार्थना….

परिचय  : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments