सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘एस्. आर्.’ … एक निस्पृह कामगार नेते –  सुश्री ललिता बापट ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तकाचे नाव : एस. आर.

लेखिका : ललिता बापट

प्रकाशक : बी. मोहनराव चिटणीस

प्रकाशन वर्ष : १९८७.

एस.आर…. भारतीय कामगार चळवळीतील झुंजार नेतृत्व— एक निस्पृह कामगार नेते.

श्री.एस.आर कुलकर्णी यांचे हे चरित्र लेखन म्हणजे एक प्रकारे भारतीय गोदी आणि बंदर कामगारांच्या, इतकचं काय पण कामगार चळवळीच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडातील प्रेरणादायी प्रवास..

कामगार चळवळीला एस.आर. हे नेते लाभले तो आजवरचा महत्वपूर्ण कालखंड…अनेक वादळे, अनेक चढउतार घडामोडी यांनी भरलेला—

एस.आर. यांचे विलोभनीय व्यक्तिमत्व, त्यांचा पोलादी निर्धार यांचे एक उत्तुंग दर्शन हे पुस्तक वाचताना घडत जाते. त्याचप्रमाणे उदात्त, सुसंस्कारित, मानवतावादी व निर्भय नेतृत्वाच्या साहचर्याचा पुनःप्रत्यय देणारा, सहसंवेदना निर्माण करणारा व भारतीय कामगार चळवळीतील सुवर्ण काळाविषयीची अधिक ओढ, जिज्ञासा उत्पन्न करणारा अनुभव वाचकाला हे पुस्तक वाचताना येतो.

या पुस्तकात जन्म आणि बालपण ते राष्ट्रवादी एस.आर. असे अनेक टप्पे वाचावयास मिळतात. तसेच अनेक बोलकी छायाचित्रेही पहावयास मिळतात. या दीर्घ कालावधीत एस.आर. साहेबांनी कामगार हितासाठी केलेले आणि घडवून आणलेले करार, कामगारांना मिळवून दिलेली पगारवाढ आणि असे अनेक अभिमानाने उजळवून टाकणारे प्रसंग, घटना यांचा उल्लेख तर आहेच, आणि  त्यांच्या जीवनाला आणि त्यांच्या कामगारसेवेच्या व्रताला आकार देणा-या पी.डिमेलो यांच्या स्मृतीने भावविवश होणारे एस.आर कुलकर्णी– हेही इथे भेटतात.

“एकमेवाद्वितीय एस.आर” या लेखात तर १९७१ साली बांगलादेश मुक्तीयुद्धाचे दिवस होते. पाकिस्तानसाठी युद्धसाहित्य घेऊन आलेल्या पाच बोटींवरील शस्त्रास्त्रसाठा आणि भारत विरोधी रसद एस.आर च्या आदेशानुसार मुंबई बंदरात उतरवून घेऊन त्या बोटींवरील बांगलादेशीय खलाशांना, कर्मचा-यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्याच दरम्यान दिवाळीचा सण ..एस आर यांनी बोटींवरील ताब्यात घेतलेल्या सर्व खलाशांना, कर्मचा-यांना ताजमहल हाॅटेलमध्ये स्वतःच्या खर्चाने जेवण दिले. यावरून त्यांची कामगारांसाठी जीव ओवाळून टाकण्याची वृत्ती लक्षात येते. तसेच आणखी एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, एस.आर. आणि पी. डिमेलो आणि त्यांचे आणखी काही जिवलग सहकारी यांना ठार मारण्याचे दोनदा प्रयत्न करण्यात आले होते. पण दोन्ही प्रयत्न  निष्फळ ठरले.. फाझलच्या मनात सद्सद्विवेक बुद्धी जागृत झाली. फाझलने क्षमायाचना केल्यानंतर पी. डिमेलो यांच्या कडे एस.आर. यांनी रदबदली केली आणि क्षमा करण्यासाठी शिफारसही केली. मात्र मोरारजी देसाई यांनी त्या फाझलला मुंबईतून कायमचे तडीपार करण्याचा हुकूम दिला. आज कित्येक तपे उलटून गेल्यानंतरही कलकत्याहून फाझल प्रतिवर्षी खास सण व अन्य निमित्ताने शुभेच्छा पाठवतो, संपर्क ठेवतो.. यावरून त्यांची निर्भयता, चारित्र्य आणि कामगार हिताची प्रामाणिक तळमळ व त्यासाठी केलेले संपूर्ण समर्पण..वाचकांच्या  लक्षात येते..

“वादळी जीवनातील चढउतार” यात तर आपल्याच सहका-यांमधील, कर्मचा-यांमधील गुणीजनांचे गुण आणि नेतृत्व- विशेष ओळखून, त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्यावर जबाबदारी सोपवून, नवे नेतृत्व घडविणारे त्यांच्यातले शिल्पकार दिसून येतात .तसेच ते आपल्या यशाचे वारस आपल्या सहका-यांना व सहभाग आणि साथ देणा-या कामगारांनाच मानतात.आणि  त्यांच्या यात त्यांच्या   विनम्रतेचे दर्शन वाचताना घडत जाते..

भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय गोदी आणि बंदर कामगारांच्या अग्रगण्य पुढा-यांच्या मालिकेतील कौस्तुभरत्न– एकाच वेळी कामगारांच्या अनेक संघटनांच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले एस.आर.— कामगारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास, कामगारांच्या हितासाठी समर्पित झालेले एस.आर.– ” समर्पित नेतृत्व “—हा लेख वाचताना त्यांच्या कार्याचा सारा तपशील न सांगताच आपल्या अंतर्मनासमोर उभा राहतो..

कामगार चळवळींची मुहूर्तमेढ, ट्रान्स्पोर्ट अँड डाॅक वर्कर्स युनियनची स्थापना, समर्पित नेतृत्व, समानधर्मा सोबती आणि स्नेही, शक्तिशाली कामगार चळवळ,  वटवृक्षाची छाया, एस.आर.– एक विश्वस्त, असे या पुस्तकातील अनेक लेख वाचनीय आणि अभिमानाने उजळवून टाकणारे—

अश्या गुणसमुच्चयाचे एस आर कुलकर्णी—-

कामगारांना प्रकाशाकडे नेण्याच्या आपल्या व्रताला साठ उन्हाळे- पावसाळे पूर्ण करून पुढे पुढे चालत जाणारे एस.आर कुलकर्णी आपल्याला इथे वाचावयास मिळतात… नकळतच आपण त्यांच्या या उत्तुंग कर्तृत्वापुढे नतमस्तक होतो.

त्यांना उद्देशून ” जीवेत शरदः शतम ” चा घोष अनेक कामगारांच्या अंतःकरणात, मनामनात निनादत आहे, हीच त्यांच्या उत्तुंग कार्याची पावती आहे..

हे पुस्तक वाचताना मला एस. आर कुलकर्णी यांच्या कुशल नेतृत्वाची ओळख परत नव्याने झाली…

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments