श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ # रहे ना रहे हम… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… “हेच तर बाळा मी मघा पासून तूला सांगायचा प्रयत्न करत होतो! … पण मला बोलता येत नसल्याची खंत जाणवली आणि माझा जीवच गलबलून गेला की रे… कशा बरं कळवाव्यात माझ्या भावना तुझ्या पर्यंत… तुला तुझ्या बद्दलचं अत्यंत महत्वाचं सांगायचं प्रयत्न करून पाहीला. जेव्हा तू सगळ्यात पहिल्यांदा तुझी धारदार कु-हाडीचा घाव माझ्यावर घातलास ना तेव्हा… तोच क्षण , होय तोच एकमेव क्षण असा जिवंत अनुभव देऊन गेला कि स्स.. स्स.. त्याने माझा सगळा देह अगदी मुळापासून ते शेंड्यापर्यंतचा भीतीने थरथरून शहारून गेला… ती भीती माझं अस्तित्व नष्टप्राय होईल म्हणून नव्हतीच मुळी… ती भीती होती मी नसण्याने तुझं आणि तुझ्या नंतर येणाऱ्या पुढच्या पिढीच्यां अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण होणार आहे त्याची होती… ती भीती होती माझ्या अंगाखांद्यावर बांधलेल्या पक्ष्यांच्या अनेक घरट्यांची… त्यात असणाऱ्या चिमण्या नवजात बाळांची… ती भीती होती त्या माझ्याच आश्रयाला येणाऱ्या लहानमोठ्या प्राणी समूहाची… ती भीती होती भूमीची धूप आता कशी थांबेल याची.. ती भीती होती पुढचा दरवर्षी चा पाऊस पडेल का नाही याची… भीतीचा अंत लागतच नाही याची सुध्दा भीती वाटत होती… पण माझ्या अबोल भावनां तुला कशा कळाव्यात… इतका का अडचणीचा झालोय,जड झालोय मी तुझा… जरा तुझ्या अवतीभोवतीच्या परिसरात पाहतोस काय.. काय करुन ठेवलेस तू… इतकी घनदाट वनराई होती तिचं एकेक वृक्षतोड करत भकास उजाड माळरान करून ठेवलसं… असं करण्यात तुझा काय छुपा स्वार्थ असेल हे तुझे तुलाच ठाऊक मला त्याच्याशी काहीएक घेणं देणं नाही… कारण माझा मुळातच धर्म आहे तो देण्याचा… थकलेल्या सावली, भुकेलेल्या फळांचा आहार, निराश मनाला फुलाचा मनमोहक सुगंध.. आणि आणि.. तहहयात काहीही मुद्दाम न घेता आणि घेतलेच तर परोपकारी बुद्धीने भरभरून परतफेड करयाचे.. हा आम्हाला सृष्टीने दिलेला परंपरागताचा वसा पाळत आलो आहोत… खरं सांगू तुझे पूर्वज, इतकेच काय तुझे वाडवडिलांच्या काळात देखील आम्ही घरातील एक सदस्य असल्यासारखी काळजी घेतली जायची आमची.. त्यावेळेचं ते आगळेवेगळे समाधान दोघांचंही जीवन सार्थ करून गेलं… तुला सांगतो अरे पावसाळ्यात कधीतरी कुठल्या झाडावर वीज पडली आणि ते झाडं त्यातं जळालं तर त्या घरातलीच नव्हे तर अख्खी पंचक्रोशीत गावातलाच माणूस गेल्यासारखी सुतकात जायची… हे तर काहीच नाही. एखादा वयोमानानुसार वृक्ष वठला पानं, फुलं, मोहोर, फळं फांद्या सगळे झडून गेली आणि निरुपयोगी झाडाचं वठलेला बुंधाच राहीला तरी देखील गावातील मंडळी मला उपेक्षित तर करत नसतचं पण माझ्या भोवती पार बांधून सकाळ संध्याकाळ तिथं गावातलीच ज्येष्ठ मंडळी चार शिळोप्याच्या गप्पागोष्टी करत बसायची… मला त्या ऐकताना माझं मन हरखून जायचं. पण कधीही त्यांच्या मनात हा वृक्ष आता तोडून टाकावा हा अभद्र विचार मनाला शिवला नाही.. उलट ती भोळीभाबडी मनं आज ना उद्या या वठलेला बुंध्याला कोवळी पालवी नक्कीच फुटेल अशा भोळ्या भाम्रक चमत्कारावर आशा धरून असायची… होय त्यावेळी धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक, श्रध्देप्रती असलेली दृढ आस्था होती त्यांच्या मनात… म्हणून तर त्यावेळी वसुधंरेवर नंदनवन फुललेलं होतं… निसर्गाचं चक्र देखील समतोल साधत राहून चरचराला आनंदाचं समाधानाचं वरदान देत राहीला… पण म्हणतात ना हे असे क्षणांना अल्पायुषीचा शाप असतो.. आणि ऐन भरात असताना याला उतरती कळा लागली… तुमची जुनी खोडं काळाच्या पडद्याआड गेली आणि नव्या मनूचा उदय झाला तोच मुळी स्वार्थ साधूपणाने अविवेकी विचाराने बुध्दीभ्रष्ट झालेला… भौतिक विकासासाठी विज्ञानाची कास धरून सृष्टीचाच र्हास सुरू केला… जसे मारणारे हात होते तसे काही तारणारेही हात होतेच कि… जेव्हा जेव्हा आमच्या अस्तित्वात वर गदा आणली गेली तेव्हा ही वृक्षप्रेमी मंडळी उठाव करायची.. पण ती हाताच्या बोटावर असणाऱ्या नगण्य मंडळीचा क्षीण आवाज दडपशाहीने दाबून टाकत राहीले आणि दरवेळी आपले विजयोन्मादाचे आसुरी हास्याचा गडगडाट करू लागले… जशी तुमच्यात घरभेदी पणाची प्रथा आहेना तशीच आमच्यातही तुम्ही या दुहीचं विष पेरून… आमच्यातल्यात वृक्षाच्या लाकडाचा कु-हाडीच्या दांड्यासाठी वापर करून आमचाच नाश करणं चालू ठेवलयं…
… तू माझ्यावर बराचवेळ पासून या कु-हाडीने घावावर घाव घालून दमलास.. म्हणून तर जराशी विश्रांती घेण्यासाठी इथं पहुडलास नां… घे घे जरा विश्रांती घे.. आणि पुन्हा तू तुझं उरलेलं काम पूर्ण करं… तुला विश्रांती घे म्हटलं खरं पण तुझ्यावर सावली टाकावी, एखादी वाऱ्याची झुळूक वाहत न्यावी.. अशी माझी स्थिती कुठं उरलीय बरं… मला फार वाईट वाटतयं की अशा उध्वस्त स्थितीत तुला ना धड वाऱ्याचा थंडावा देऊ शकत ना गडद सावलीचा गारवा जो तुझ्या थकल्याभागल्या तनामनाला उभारी देऊ शकेल… मला माफ कर.. आता खरचं मी काहीच उपयोगाचा उरलो नाही.. तेव्हा तू तुझी विश्रांती झाल्यावर तातडीने माझ्या उरल्यासुरल्या मुळावरच घाव घालून नेस्तनाबूत करून टाक… हेच माझं तुझ्याजवळ शेवटचं मागणं आहे.. तेव्हा तू ते लवकरच पूर्ण करं… आणि आणि एक सांगतो…
आता जो शेवटचा घाव माझ्या मुळावर घालणार आहेस ना तो तुझ्या हातातल्या कु-हाडीने घालू नकोस… त्या कु-हाडीने ते आता घाव माझ्यावर बसले जाणार नाहीत कारण त्या कु-हाडीचा दांडा हा माझ्याच लाकडापासून बनलेला आहे… इतका वेळ त्याने माझ्यावर घाव घातले तेव्हा प्रत्येक घावाला त्याचं मनं आक्रंदत होतं नि मला म्हणत होतं मला माफ करं.. माफ कर.. आणि असं म्हणत असताना त्याचं अंत:करण विदीर्ण होताना मला दिसत होतं.. तो आता डळमळीत झालाय.. त्याची धार बोथट झालीय.. त्याकडून आता पहिल्यासारखे घाव घातले जाणार नाहीत… अपरंपार भावुकता त्याच्या मनात नि डोळ्यात दाटून आलीयं… आपण केलेल्या कुकर्माचा त्याला पश्चात्ताप झालाय.. परिणामी त्याचं अंग भीतीनं घामानं निथळू लागलंय.. तो थरथरतोय नि भीतीने लटपटतोय… मी फक्त त्याला एव्हढच म्हणालो कि तुझा कर्ता करविता दूसराच कोणी आहे हे मला ठाऊक आहे, त्यामुळे तुझा दोष नाही.. आणि तुझं जे कर्तव्य आहे ते तू प्रामाणिकपणे करत रहा… परिणामांची तमा करा करू नकोस… एव्हढचं आमचं बोलणं झालं आणि तू विश्रांती घेण्यासाठी थांबलास… तेव्हा आता नव्याने घाव घालण्यासाठी त्या कु-हाडीला जमेलच असं वाटत नाही.. आणि मलाही खरं म्हणजे माझ्याच रक्ताच्या माणसाकडून माझ्याच देहाचे तुकडे तुकडे झालेले सहन होणार नाही… तेव्हा तू दुसऱ्या कु-हाडीने मला…
आणि हेच तर बाळा मी मघा पासून तूला सांगायचा प्रयत्न करत होतो… पण मला बोलता येत नसल्याची खंत जाणवली आणि माझा जीवच गलबलून गेला की रे…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







