श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ # अभिनेता # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
(झलक एका पडद्याआड माणसाची आणि पडद्यावरील अभिनयाची)
निळू फुले.
बाई तुम्ही आधी वाड्यावर चला…! ” हा एक साध्या शब्दातला संवाद आपण जेव्हा जेव्हा भाषेतल्या लकबिने आणि अंतस्थ हेतूने आवाज ओळखून ऐकतो त्यावेळी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच व्यक्तिमत्व उभे राहाते ते म्हणजे हरहुन्नरी कलावंत साक्षात निळू फुले यांचं… काही वेळेला साध्या वाटणार्या संवादांना चिरंतन मूल्य लाभून जातं ते अशा दिग्गज कलावंताच्या कडून निघालले असल्याने. सिनेमा,नाटकातला त्या प्रसंगाचा प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम करून जातं. सामना असो वा पिंजरा… सिनेमात डॉ. श्रीराम लागू यांच्या बरोबर तमाशातील फडावर तर या दोन दिग्गज कलावंताची आपापल्या भूमिकांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहून तर डोळ्यांचे पारणेच फिटते. “मास्तर तुम्ही मला मारलंत…! ” असा छद्मीपणाने,डोळे बारीक करून चेहर्यावर बेरकी कावेबाजपणाची छटा आणून बतावण्या आपली कर्मकहाणी सांगतो तेव्हा तर अभिनय पराकोटीला पोहचतो. इथेही परत तेच संवाद. साधेच असतात. पण निळू फुले तेजेव्हा बोलतात तेव्हा त्यांतील गर्भित व्यथा प्रेक्षकांच्या काळजाला भिडल्याशिवाय राहत नाही. त्या व्यक्तीबद्ल चीड येते पण त्याच्या अंतकरणात खोलवर रुजलेल्या त्याच्या व्यथेची आक्रंदन जेव्हा आपल्याला ऐकू येतात तेव्हा त्याच्या त्या अबोल भावनाची किव येते… शेवटी माणूस निर्सग धर्माला सोडून जगू शकत नाही हेच खरे… एकावेळी हे चित्र दिसत असताना दुसरीकडे डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि तोंडाचा चंबू करून बेरकीपणानं हुंकारत बोलणाऱ्या सरपंच, पाटील, भ्रष्टनेत्याच्याच प्रतिमेत अनेकांनी त्यांना पाहताना लबाड,कावेबाज,स्त्रीलंपट,राजकारणी… स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रसंगातील खलनायकाच्या रूपातला निळू फुले पाहताच त्या प्रेक्षकगृहातील समस्त भाबडा महिलावर्ग त्यांच्या नावाने तिथेच बोटं मोडत असताना, ‘मुडदया,एका गरीब बाईमाणसाची अब्रू लुटतोस.. वाटुळं वाटुळं हुईल तुझं.. तुझ्या घरी काय आयाभनी हायती का नाहीत. मुडदा बशविला तुझा तो…’
ही लाखोली वाहिली जायची. हा त्या खलनायकाच्या अभिनयाला दिलेली सन्माची पावतीच म्हणायला हवी. निळूभाऊंनी खलनायकाची स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांची जरबयुक्त शब्दफेक, भेदक नजर, देहबोली हे सर्व त्या पाताळयंत्री,मग्रूर भूमिकेसाठी पूरक ठरले. नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरीजीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. निळू फुले यांनी ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. ‘एक गाव बारा भानगडी’ याचित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदीचित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४०चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी ‘चोरीचा मामला’,’पुढचं पाऊल’, ‘शापित’, ‘सामना’, ‘सिंहासन’ यांतील भूमिका विशेष गाजल्या.
व्यावसायिक रंगभूमीवरचं एक असं नाटक आलं, जे अभिनेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीसाठीच महत्त्वाचं ठरलंच,नाटक होतं विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाईंडर. त्यानंतर निळू भाऊंनी तेंडुलकरांचेच ‘बेबी’ हे नाटक, जयवंत दळवींचं’सूर्यास्त’, ‘जंगली कबूतर’, ‘राजकारण गेलं चुलीत’ यांसारखी नाटकं केली. सखाराम आणि निळू फुले हे नातं घट्ट असलं तरी स्वतः निळू फुलेंना’बेबी’ नाटकातली राघवची भूमिका प्रचंड आवडायची.
त्यांच्या कारकिर्दीची अभिनयाइतकीच महत्त्वाची दुसरी बाजू राहिली, ती सामाजिक चळवळीमधील सक्रिय सहभागाची. अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत,सत्यशोधक चळवळ, दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य आदींशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध व सहभाग होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पुरोगामी चळवळींशीआपली नाळ अखंडित ठेवली होती. 2003 या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निळू फुले यांची निवड झाल्याचं त्यांना कळविण्यात आलं होतं. निळूभाऊंनी हा पुरस्कार नाकारला. मी व्यावसायिक अभिनेता आहे, जे काम करतो त्याचा मोबदला घेतो. यात समाजासाठी काही केलं नाहीये. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाच दिला जावा, असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्चच्या माध्यमातून काम करणाऱ्या डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांचं नावही सुचवलं.
कलाकाराचं पडद्यावरचं आयुष्य आणि प्रत्यक्षातली प्रतिमा यात अनेकदा विरोधाभास असू शकतो. निळू फुलेंच्या बाबतीत तर तो अतिशय ठळक आहे. पडद्यावर वेगवेगळ्या ढंगातला खलनायक रंगवणारा हा माणूस वैयक्तिक आयुष्यात मात्र नायक होता किंबहुना नायकापेक्षाही तो खऱ्या अर्थाने ‘मोठा माणूस’होता.
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







