सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

बंडोपंत आज गॅलरीत आरामखुर्चीत विचारमग्न होऊन शांतपणे बसले होते. नजर शून्यात होती. हे शून्य काय आहे? शून्य तर काहीच नाही. काहीच नाही. मधलं सगळं सगळं पहात बसले होते.

राधा काकू गेल्यापासून बंडोपंत खूपच शांत शांत झाले होते. फारसै कोणाशी बोलत नव्हते. कोणत्याही गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया देत नव्हते. आपलं मतप्रदर्शन करत नव्हते. मूकपणाने निर्विकारपणे घरातल्या सगळ्या घटना त्रयस्थपणे पहात रहायचे.राधा काकूंना जाऊनही आता सहा महिने होऊन गेले. खरंतर सगळं काही मनासारख छान दिसावं असं होत. सुजय डॉक्टर झाला. सुमंत सीए झाला. शिवांगीच लग्न हन तिचा संसार उत्तम चाललाय. काय कमी होत! मोठी उणीव होती. भरुन न निघणारी. एक मोठी पोकळी त्यांना जाणवत होती. आणि त्या पोकळीतल्या शून्यातच ते भूतकाळात गेले. मनाने राधा काकूंशी बोलत राहिले.

आपलं लग्न झालं आणि भरल्या धान्याचे माप ओलांडून तू या घरात आलीस. आणी घराचं रुपडच पालटून गेलं. सरवायची जमीन आणि कौलाच छप्पर असलेल्या आणि अडचणीच्या घरातही न कुरकुरता चार-पाच वर्ष आपण काढली. पण तेही घर फ्लट वाटत होतं.

दिवस जात होते घरातला व्याप बराच होता. आले गेले पाहुणे सगळ्यांना घराचं दार सदैव उघडं होतं. तू मात्र त्या व्यापात बुडून जाऊन हसतमुखानं सगळ्यांचा पाहुणचार आणि स्वागत करत होतीस. इतकंच नव्हे तर हे सगळं करताना प्रत्येकाच्या आवडीनिवडीही पहात होतीस. आणि हे सगळं करत असताना मुलांनाही तू घडवलस. मुलं अभ्यास आणि इतर क्षेत्रातही नावलौकिक मिळवत होती. मी अभिमानाने त्यांचे यश सर्वांना सांगायचो. पण मला मात्र या यशाचा वाटेकरी होता येत नव्हतं. खरोखर त्यांचा अभ्यास इतर स्पर्धा, याबाबत मी कधीच कशात लक्ष घातलं नाही. मी सतत माझ्या मित्र मंडळातल्या कोणाला ना कोणाला जेवायला, चहाला बोलवत असायचो. खरं तर तेव्हा तुला मदत करणं माझं काम होतं. तुझ्या कष्टाची मी कधी कदरच केली नाही. तुझा वाढदिवस असू दे. दिवाळी असुदे.मोठ्या गोष्टींचा किंवा दागिन्यांचा हट्ट तू कधीच केला नाहीस. मोठं खटलं असल्यामुळे परिस्थिती समजून, आहे त्यात समाधान मानत आलीस. अगदी पाणी हवं असलं तरी मी जागेवर बसून मागायचो. खरोखरच मी हाताने कधी चहा केलेलाही मला आठवत नाही. कधी डोकं दुखलं तर मी तुला हक्काने सांगायचो “अगं डोकं दुखतय जरा बाम लावतेस का”? कपाळावरुन तुझा हात फिरला की दुखणं कमी व्हायचं. तुझी तब्येतीची तक्रार कधीच नव्हती. एकदाच तुझं डोकं खूप दुखत होत. मी दाबून द्यायला हव होत. पण बरेच दिवसांनी, जुना मित्र आलाय म्हणून मी निघून गेलो. मला सगळ्या गोष्टींचा पश्चात्ताप होतोय. आता माझं डोकं मी कोणाला चेपायला सांगणार? बाम लावून दे, अस कोणाला सांगणार? चेहऱ्यावर दिसल की कोणीतरी गोळी आणून देतात. त्या गोळीबरोबर तुझ्या हाताचा स्पर्श नसतो. अनेकदा अस होत की, मला सगळ्यांशी खूप बोलायचं असतं. पूर्वीच्या आठवणी सांगाव्याशा वाटतात. गप्पांचा मूड येतो. पण प्रत्येकजण आपापल्या कोशात इतका गुंतलेला असतो की माझं सगळं बोलणं एका शांततेत विरून जात. कधीतरी एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण हक्काने कोणाला सांगणार? तुला हक्काने सांगायचो “अगं आजभजी  कर उद्या वडे कर”. पण आता जे काही असेल त्यालाच वडे आणि भजी असच नाव देतो. आणि त्याचाच आस्वाद घेत खातो. तुझ्या हातच्या पुरणपोळीची सर विकतच्या पुरणपोळीला नाही येत ग! तशी पोळी आता मला कधीच नाही मिळणार!

क्रमश:….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments