प्रा.सौ. सुमती पवार

☆ मनमंजुषेतून : मी कडून आम्ही कडे… ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆

सुशिला ताई आज सकाळ पासूनच हिरमुसल्या होत्या .चेहरा पडला होता. दुखावल्या सारख्या वाटत होत्या. ….

श्रीपतराव म्हणाले , काय ग ? काय झालं ? चेहरा का पडला तुझा ….?

खोदून खोदून विचारल्यावर म्हणाल्या,अहो , “आज काल घरात काही किंमतच राहिली नाही आपल्याला …? अगदी अडगळीत पडल्या सारखे वाटते पहा … कां ? काय झाले …श्रीपतराव म्हणाले… अहो, हल्ली घरात काय चालले आहे कळतच नाही…कोणी सांगत नाही की विचारत नाही…

श्रीपतरावांना हसू आले ..अस्सं होय …! ते म्हणाले , लग्न होऊन तू इथे शहरात आलीस नि …लगेचच तू स्वतंत्र झालीस , तेंव्हा तू विचारलेस का कोणाला काही .? मग मात्र त्या गप्प बसल्या …!

अगं .. स्वातंत्र्य सर्वांनाच हवं असतं नि आता आपला संसार तो कितीसा राहिला आहे..? काही कमी आहे का तुला कशाची ..? मग रहा ना सुखात ? का दु:ख्ख शोधतेस..?

खरं आहे …माणूस दु:ख्ख शोधतो. मी…मी…मी …मी….आणि फक्त मीच …!

मला विचारलं नाही … मला सांगितलं नाही

हा …”मी “ च आपल्याला संघर्षाकडे , सर्व-नाशाकडे घेऊन जातो. मी मोठा , मी प्रमुख , मी नेता ,मी कारभारी,राम ..राम राम..राम.. किती धुडगुस घालतो हा मी ?

माझे घर , माझी इस्टेट ,माझी बायको, माझी मुले… हा अहं इतका सुखावतो या शब्दांनी…की विचारू नका ….! पण आपण त्या मुळे किती दु:ख्ख मागून घेतो याची कल्पना

नसते आपल्याला …! पुराणात इतिहासांत खूप दाखले आहेत याचे…..! जग जिंकलेला सिकंदर त्या मुळे वयाच्या अवघ्या ३७ साव्या वर्षी सुख न भोगताच मरण पावला …!

काय मिळवले जग जिंकून त्याने …! घरा पासून जगा पर्यंत सर्वत्र हा मी आहे ….! आणि त्या मुळे संघर्ष वाढतो .मी आक्रमण करणार .. मी सत्ता गाजवणार ..जगभर या मी चा प्रताप आपल्याला दिसतो …

“म्हणून या मी चा आम्ही झाला पाहिजे”

अगदी बाल पणापासून या मी ची एवढी प्रचंड वाढ झालेली दिसते की , माझे खेळणे ,माझे दप्तर ,…मी देणार नाही …हा मी एवढा फोफावतो की,शेजारी राहून आपण एकमेकांचे शत्रू बनतो. सर्वत्र हेच चित्रं दिसतं.भिकाऱ्या पासून सम्राटा पर्यंत हा रोग पसरलेला आहे.आपण त्याचे दुष्परिणामही भोगत आहोत .

पण तरी ही या “मी” चे प्रस्थ कमी न होता दिवसेंदिवस वाढतंच चालले आहे.जगात कुठेही जा ..मी चा फणा उभारलेलाच असतो.

माझा धर्म , माझा देव ,माझे राष्ट्र ,माझे माझे आणि माझे… अत्यंत आत्मकेंद्री ,स्वार्थी असा हा मी हा अत्यंत घातक रोग आहे… हा मी सतत माणसाला पोखरत असतो. दुसऱ्याशी तुलना करायला भाग पाडतो.

आपल्या जवळ जे जे आहे त्याचा उपभोग न घेऊ देता हा मी सतत मागणी करत रहातो. हा मी… स्वत: ही जळतो व दुसऱ्यालाही जाळतो.

म्हणून तो आधी मनातून व जनातून हद्दपार झाला पाहिजे …ही आम्ही ची भाषा आपण घरातूनच निर्माण केली पाहिजे .आपले घर आपला समाज , आपले राष्ट्र ,आपले जग अशी भाषा जाणिवपूर्वक जन्माला घातली पाहिजे .. कारण नाती टिकली तर समाज टिकतो व समाज टिकला तरच एकराष्ट्र उभे राहते…

एका बेटा पेक्षा मुठीची ताकद फार मोठी असते. मग त्या वज्रमुठी पुढे एकसंघ भावने पुढे कुणाचे काही चालत नाही .. तर घरा पासूनच  या मी ला घालवून आमचा समाज निर्माण होईल आणि आमचा देश, आमचे राष्ट्र निर्माण होईल त्या दिशेने आपण प्रयत्न करू या …व आमचा देश , मग आमचे विश्व असा अभिमान बाळगू या ..सौहार्दाचा हात पुढे केल्यास काही ही अशक्य नाही..फक्त सुरूवात व्हायला हवी ती आपण करू …

वंदे मातरंम् कडून राष्ट्रागीता कडे व मग विश्व बधुत्वाकडे वाटचाल करू या …..

।।जय विश्व बंधुत्व ।।

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments