श्री सुधीर करंदीकर
मनमंजुषेतून
☆ “फॅशनची हुडहुडी” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
गेल्या आठवड्यात प्रभात रोडला बायकोच्या दातांचं दाखवायला डेंटिस्टकडे जात होतो. सकाळचे ९ – ९. ३० वाजले असतील. थंडीचा महिना असल्यामुळे, चांगलीच थंडी होती. स्कुटरवर जायचं, म्हणून आम्ही स्कार्फ – स्वेटर अशा तयारीनीच निघालो होतो. संध्या रस्त्यावर ट्रॅफिक इतका फास्ट असतो, की, बाजूनी कोण जातोय, समोर कोण जातोय, हे बघताच येत नाही. आणि बायको मागे बसलेली असेल, तर, काही बघण्यासारखं असलं, तरी ते बघता येत नाही, किंवा मी काहीच बघत नाही, असंच दाखवावं लागतं. लॉ कॉलेज रोड ला लाल सिग्नल लागल्यामुळे ट्रॅफिक स्लो झाला.
माझ्या समोर एक मोटर सायकल होती. मागच्या सीटवर दोन्हीकडे पाय टाकून, साधारण ४ – ५ वर्षाची छोटी मुलगी बसली होती, आणि थंडीमुळे ती चक्क कुडकुडत होती. गाडी चालवणारी व्यक्ती बहुदा तिचे वडील असावेत. त्यांनी व्यवस्थित कोट घातला होता. कारण बाईक आणि थंडी, म्हणजे कोट पाहिजेच. कोटाची उब घेण्याकरता मागे बसलेली छोटी मुलगी त्यांना बिलगून बसायचा प्रयन्त करत होती. पण वडीलांच्या पोटाचा घेर बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे, तिला ते जमत नव्हते आणि त्यामुळे तिला उब घेता येत नव्हती. आपोआपच माझं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं. बघितलं, तर तिच्या अंगात फॅशनेबल असा अगदी पातळ कापडाचा फ्रॉक होता. मध्यंतरी स्लीव्ह लेस ची फॅशन होती, आणि आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे शोल्डरलेस ची फॅशन आहे. तसाच काहीसा शोल्डरलेस आणि नो बॅक चा तिचा फ्रॉक होता. थंडी असूनही पायात सलवार किंवा फुलपॅन्ट नव्हती, पाय उघडेच होते. पायात मात्र फ्रॉक ला मॅचिंग बूट आणि मोजे होते. साहजिकच नवल वाटलं, की, एवढ्या थंडीत असे कपडे का घातले असावेत! बिचारीला थंडीमुळे हुडहुडी भरली होती. एक उत्सुकता म्हणून, मी ही शंका मागे बसलेल्या बायकोला विचारली.
बायकोकडून स्टॅंडर्ड उत्तर आलं, “तिचे वडील आहेत ना बरोबर! तुम्ही समोर बघून आपली गाडी चालवा”.
कालचं आपण पेपरमध्ये वाचलं, अपघात टाळायचे असतील तर, “एका वेळेस एकच काम करा / गाडी चालवत असाल, तर इकडे तिकडे स्वैर पाहू नका / गाडी चालवत असाल, तर मोबाईल वर बोलू नका, आणि मोबाईलवर बोलत असाल, तर त्यावेळेस गाडी चालवू नका”.
आणि याउपर तुम्हाला बघायचच् असेल, तर इथे कोपऱ्या कोपऱ्या वर छोटी छोटी मंदिरे आहेत, ती बघा.
मी सवयीप्रमाणे “थँक यु” म्हणालो.
सिग्नल जवळ समोरची बाईक थांबली. मी पण बाजूलाच थांबलो. बाईकवर माणसाच्या समोर त्यांचा मुलगा बसला होता. तो मात्र कपड्यांमध्ये पूर्ण पॅक होता. फुल पॅन्ट, अंगात स्वेटर, डोक्यावर कॅप वगैरे. त्या माणसाला उपदेश करण्यात काहीच पॉईंट नव्हता. आणि, तसही म्हणतातच, की, सिनियर सिटीझन झाल्यानंतर कुणालाही उपदेश करू नये. एकतर उपदेश ऐकायला कुणाला वेळ नसतो, उपदेश ऐकण्याच्या कुणी मनस्थितीत नसतो, आणि तिसरं म्हणजे, देणाऱ्याचा उपदेश आऊटडेटेड पण असू शकतो. अगदीच राहवत नसेल, तर फक्त स्वतः ला उपदेश करावा, किंवा तो डायरीमध्ये लिहावा.
थियरी कितीही छान असली, तरी, “दिल है के मानता नही”, असे प्रत्येकाचेच होते. विचार केला, की, सेफ्टीबद्दल तरी त्यांना सांगायलाच पाहिजे. अनायसे त्यांची गाडी शेजारीच होती.
मी : दादा, मागे मुलीला नीट धरता येत नाही आहे, मधून मधून मागे लक्ष ठेवा.
त्यांनी हो – हो म्हणत मान माझ्याकडे वळवली. आणि लक्षात आलं, की, हा तर मित्राचा मुलगा! त्यानी पण मला ओळखलं आणि नमस्कार केला. माझ्यामधलं उपदेशाचं मशीन आपोआपच सुरु झालं.
मी : अरे, ती थंडीनी कुडकुडतेय. स्वेटर विसरला का आणायला? आणि पायात पण काही नाही.
मुलीचे वडील : काका, स्वेटर कसा विसरेन? बाबा पण मागे लागले होते, तिला स्वेटर घाल म्हणून. पण बायकांना पटलं पाहिजे ना! त्यांच्या फॅशन मध्ये स्वेटर बसत नाही. एका लग्नाला चाललोय. बायको पाहुण्यांबरोबर रिक्षानी येते आहे. लग्नात सगळे मुलीच्या ड्रेस चे कौतुक करतील, म्हणजेच बायकोच्या सिलेक्शन चं कौतुक होईल. ड्रेस कुठे घेतला? कधी घेतला? केवढ्याचा आहे? हीला खूपच गोड दिसतोय! तुझ्या साडीला अगदी मॅच होतोय, वगैरे, वगैरे.
खास लग्नाकरता कालच हा ड्रेस आणलाय. आणि तिथे बदलायला असेच अजून दोन ड्रेस बरोबर घेतले आहेत.
तेवढ्यात आसपासच्या गाड्या सुटायला लागल्या, त्यावरून समजले, की, लाल दिव्याची वेळ संपत आली आहे. ५ -६ सेकंद शिल्लक असले, तरी, लोक आजूबाजूचा अंदाज घेत, सुटतातच. आमचे अच्छा – बाय झाले. हिरवा दिवा लागला आणि आम्ही पण सुटलो. तो यंगस्टर च्या स्पीडनी निघाला आणि मी सिनियर सिटीझन च्या स्पीडनी निघालो.
बायकोनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, मी रस्त्याच्या कोपऱ्यावर कुठे देऊळ दिसते कां? ते बघायला लागलो. आणि सिग्नल क्रॉस केल्यावर, लगेचच डावीकडे छोटे मंदीर दिसले.
मी स्कुटर साईडला थांबवून, दोन मिनिटात येतो, असे बायकोला सांगून, मंदिराजवळ गेलो.
देवासमोर हात जोडून, “धन्यवाद, थँक्यू” असं म्हणालो.
देवाचे डोळे थोडे किलकिले झाल्यासारखे वाटले, आणि ऐकू आलं, “कशाबद्दल”?
मी : वर्षाच्या १२ महिन्यांमध्ये, तू ४ महिने उन्हाळा तयार केला, त्याबद्दल. आयांच्या फॅशन पायी छोट्या मुलींना वर्षांमधले तेवढे ४ महिने तरी थंडीची हुडहुडी भरत नाही.
देवानी डोळे पुन्हा किलकिले केले आणि ऐकू आले, “वेलकम”.
देवासमोर मी पुन्हा हात जोडले, आणि निघालो.
पेपरमध्ये वाचल्याप्रमाणे, ‘एका वेळेस एकच काम / गाडी चालवत असाल तर, इकडे तिकडे स्वैर पाहू नका / गाडी चालवत असाल, तर मोबाईल वर बोलू नका, आणि मोबाईलवर बोलत असाल, तर त्यावेळेस गाडी चालवू नका’, या मंत्रांची मी मनामधे उजळणी केली, आणि आता हे तंतोतंत पळायचेच, असे मनात ठरवून, मी गाडी सुरु केली.
तसं म्हटलं, तर स्त्रियांमध्ये फॅशन ची क्रेझ आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. पण तेव्हा रंगसंगती, कलाकुसर यावर भर असायचा. नंतर पाश्चिमात्यांची फॅशन सिनेमावाल्यांनी नट – नट्यांमध्ये आणली. पण ती बऱ्यापैकी सिनेमागृहात सीमित असायची. टीव्ही चा जमाना आला, घराघरात टीव्ही पोहोचला. जाहिराती वाढल्या, शोज वाढले, आणि फॅशन मधे अंग प्रदर्शनाचं विषारी बी, बेमालूमपणे, कसं आणि कुणी पेरलं, हे समजलंच नाही. टीव्ही मधली अंगप्रदर्शनाची फॅशन आता घराघरात अवतरली. आता अंगप्रदर्शन म्हणजेच फॅशन, हेच समीकरण झाले आहे. सध्या स्त्री सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामध्ये या आधुनिक फॅशन चा पण मोठा वाटा असणारच!
ग्लॅमर च्या दुनियेत अंगप्रदर्शन किती पुढे न्यायचं, हे प्रोड्युसर ठरवणार / ग्लॅमर आणि पैसा दिसत असला, तरी आपण अंगप्रदर्शन कुठे थांबवायचं, हे मॉडेल्स ठरवणार / आपण अनुकरणाची “री” कुठपर्यंत ओढायची, आपण कुठे डोळे बंद करायचे, हे मात्र आपल्याला ठरवायचे आहे, म्हणजेच, हा ज्याचा – त्याचा प्रश्न आहे.
पण एक मात्र नक्की – फॅशन मुळे हुडहुडी ही भरतेच – भरते!!
आयांची फॅशन – छोट्या मुलींना हुडहुडी, युवतींची फॅशन – पुरुष जातीला हुडहुडी (साधू – संतांना पण हुडहुडी भरल्याचं आपण वाचतोच), आणि स्त्रियांची फॅशन – नवऱ्यांना हुडहुडी, असंच म्हणावं लागेल!
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





