श्री जगदीश काबरे
मनमंजुषेतून
☆ “विवेकवादी पालकत्व – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆
विवेकवादी पालक होणे म्हणजे केवळ देव न मानणे किंवा धार्मिक आचार न पाळणे एवढाच मर्यादित अर्थ नसून, आपल्या पाल्याला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतःच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याची मोकळीक देणे होय. विवेकवादी पालकत्वाचा केंद्रबिंदू श्रद्धा नव्हे तर तर्क, भीती नव्हे तर समज, आणि अंधानुकरण नव्हे तर जाणीवपूर्वक निवड हा असतो. असा पालक मुलाला “हे असंच आहे” असे सांगण्याऐवजी “हे का असावं? ” असा प्रश्न विचारायला उद्युक्त करतो आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेत स्वतःही सहभागी होतो.
विवेकवादी पालकत्व म्हणजे नैतिकतेचा उगम देवभयात नाही तर मानवी सहवेदनेत म्हणजे कोणत्याही प्राण्याशी माणुसकीने वागण्यात आहे हे मुलांच्या मनात रुजवणे. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य यांची मांडणी स्वर्ग-नरक किंवा पाप-पुण्याच्या चौकटीत न करता, इतर माणसांवर होणारा परिणाम, न्याय, समता आणि जबाबदारी यांच्या आधारावर करणे, हा त्याचा गाभा असतो. त्यामुळे मूल “कोणी पाहत आहे का? ” म्हणून नव्हे, तर “यामुळे कुणाला त्रास होईल का? ” म्हणून हा विचार करून वागायला शिकते. विवेकवादी पालक होणे म्हणजे मुलाला समाजापासून तोडणे नाही, तर समाजात विवेकाने उभे राहण्याची क्षमता देणे होय. सण-उत्सव, परंपरा, धार्मिक वातावरण यांपासून मुलाला सक्तीने दूर न ठेवता, त्यामागची सामाजिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून सांगणे आणि त्या गोष्टी प्रश्नांसह स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची मुभा देणे, ही त्याची भूमिका असते. यामध्ये पालक स्वतःला अंतिम सत्याचा मालक मानत नाही, तर शिकणारा सहप्रवासी मानतो. एकूणच विवेकवादी पालकत्व म्हणजे मुलांच्या मनात भीतीऐवजी कुतूहल, आज्ञाधारकतेऐवजी संवाद, आणि अंधश्रद्धेऐवजी चिकित्सक बुद्धी रुजवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करणे होय. हा मार्ग सोपा नसतो, कारण तो सतत आत्मपरीक्षणाची मागणी करतो; पण याच मार्गातून स्वतंत्र विचार करणारी, जबाबदार आणि माणुसकी जपणारी पिढी घडू शकते, हीच त्यामागची मूलभूत धारणा असते.
हे सगळे माझे आजचे विचार आहेत. पण खरं सांगायचं तर मी जेव्हा माझ्या तरुणपणी विवेकवादी मार्गाने जगण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला वाटलं होतं की, हा संघर्ष मुख्यतः माझ्या वैयक्तिक आयुष्यापुरताच मर्यादित राहील. पण जेव्हा पालक झालो, तेव्हा उमगलं की हा निर्णय आता केवळ माझा राहिलेला नाही; तो माझ्या मुलाच्या भवितव्याशी, त्याच्या प्रश्नांशी, त्याच्या भीतीशी आणि त्याच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाशी घट्टपणे जोडला गेला आहे. पालकत्व ही आईबाप झाल्यानंतर आपल्यावर पडणारी एक मोठी जबाबदारी असते. त्यातही नास्तिक आणि विवेकवादी पालकत्व ही जबाबदारी अधिकच गुंतागुंतीची करते. कारण इथे केवळ पोट भरण्यासाठी शिक्षण देणे किंवा सुरक्षितता पुरवणे एवढ्यावर गोष्ट थांबत नाही, तर मुलाच्या मनात कोणत्या प्रकारचा विवेक रुजतो आहे, कोणत्या प्रकारची भीती नकळत पेरली जातेय, आणि कोणते प्रश्न आपण टाळतो आहोत, याचाही सतत हिशोब ठेवावा लागतो. मी जेव्हा माझ्या पाल्याच्या बालपणाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की हा प्रवास सरळ रेषेत झालेला नाही; तो अनेक वळणांचा, चुकांचा, अपराधी भावनेचा, आत्मपरीक्षणाचा आणि कधी कधी स्वतःच्या विवेकालाही प्रश्न विचारायला लावणारा राहिला आहे.
माझ्या विवेकवादी भूमिकेमुळे सर्वात आधी सामना करावा लागला तो कुटुंबातच. माझे आई-वडील, आजी-आजोबा, काका-मावश्या हे सगळे ज्या श्रद्धा, सण-उत्सव, देवधर्म यांच्या वातावरणात वाढले, त्यातूनच त्यांनी मला घडवलं होतं. पण माझ्या वाचनाच्या सवयीमुळे मी त्या प्रवाहातून बाहेर आलो, प्रश्न विचारू लागलो, देव मानणं सोडलं. पण तरीही कुटुंबातील नात्यांची ऊब टिकून होती. मात्र जेव्हा माझ्या मुलाचा प्रश्न आला, तेव्हा अनेकांना वाटलं की आता मी “अति” करतो आहे. “तू नास्तिक असलास तरी मुलाला देवापासून का वंचित ठेवतोस? ”, “लहान मुलाला देव नाकारायला शिकवणं म्हणजे त्याचं बालपण हिरावून घेणं नाही का? ” असे प्रश्न थेट किंवा अप्रत्यक्षपणे विचारले गेले. सुरुवातीला मी आक्रमक झालो. मला वाटायचं की मी जे करतो आहे तेच योग्य आहे आणि बाकी सगळे अंधश्रद्धेच्या कैदेत अडकलेले आहेत. पण हळूहळू कळलं की, या आक्रमकतेचा फटका माझ्या मुलालाच बसतो आहे. कारण तो नात्यांच्या संघर्षात नकळत ओढला जात होता. मग मी एक तोडगा शोधला. वाद टाळला नाही, पण संघर्ष सौम्य करण्याकडे कल ठेवला. मी मुलाला देव न मानायला “शिकवणं” थांबवलं आणि देवाबद्दल प्रश्न विचारायला “परवानगी” देऊ लागलो. कुटुंबात सण आले, पूजा झाली, तेव्हा मी त्याला जबरदस्तीने दूर ठेवलं नाही, पण त्याला हेही स्पष्ट सांगितलं की, हा सगळा लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे, निसर्गाचा नियम नाही. हा मध्यम मार्गही माझ्यासाठी सोपा नव्हता. पण त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारी कटू टळली आणि मुलाला स्वतःचा निष्कर्ष काढायला वाव मिळत गेला.
शाळेचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होता. पहिल्याच दिवशी सकाळची प्रार्थना, देवाचं नाव, हात जोडून उभं राहणं, हे सगळं माझ्या मुलासाठी नविन होतं, पण माझ्यासाठी अस्वस्थ करणारं. एकीकडे मला वाटायचं की सार्वजनिक शिक्षणसंस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता असावी, तर दुसरीकडे मला हेही जाणवत होतं की रोजच्या लढाईत मुलाला वेगळं पाडणं त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या जड ठरेल. सुरुवातीला तो घरी येऊन विचारायचा, “आपण देव मानत नाही तर मला प्रार्थना का म्हणायला लावतात? ” तेव्हा मी थेट उत्तर दिलं, “तुला मनापासून वाटत नसेल तर मनातल्या मनात शांत उभा राहा. ” पण काही दिवसांनी लक्षात आलं की, हा सल्ला त्याच्यासाठी अवघड आहे. वर्गात सगळे एकत्र म्हणत असताना वेगळं वागणं म्हणजे स्वतःकडे लक्ष वेधून घेणं. मग मी माझी भूमिका बदलली. मी त्याला सांगितलं की प्रार्थना ही शाळेची शिस्त आहे, श्रद्धा नाही. जोपर्यंत आपण त्यांचा अर्थ तपासतो आणि प्रश्न विचारतो तोपर्यंत शब्दोच्चार करण्यात काहीच गैर नाही. हा बदल माझ्यासाठीही मोठा होता. कारण मला स्वतःला अनेक वर्षे धर्माशी निगडित कोणतेही शब्द उच्चारायचीही चीड होती. पण इथे मला मुलाच्या मानसिक सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं लागलं.
सण-उत्सवांबाबतही असाच गोंधळ होता. दिवाळी, गणेशोत्सव, रमजान, ख्रिसमस हे सगळं मुलांसाठी रंग, गाणी, मिठाया, गोष्टी यांचं जग असतं. मी जर फक्त “हे सगळं उथळ आहे” एवढंच सांगितलं असतं, तर कदाचित त्याच्या आयुष्यातून आनंदाचा एक मोठा भाग काढून टाकल्यासारखा झाला असता. म्हणून मी वेगळा मार्ग निवडला. आम्ही सण साजरे केले, पण देवासाठी नाही, तर माणसांसाठी. दिवाळीत दिवे लावले, कारण प्रकाश आवडतो; गणेशोत्सवात मूर्ती पाहिल्या, पण गणेशाची पूजा केल्याने समस्या सुटतात का, या प्रश्नावर चर्चा केली. रमजानमध्ये उपवासामागचं शिस्तीचं तत्त्व समजावलं. ख्रिसमसमध्ये भेटवस्तू देण्यामागचं सामाजिक नातं उलगडून दाखवलं. या प्रक्रियेत मला जाणवलं की विवेकवाद म्हणजे आनंद नाकारणं नाही, तर आनंदाच्या पार्श्वभूमीवर असलेली भीती आणि अंधश्रद्धा काढून टाकणं आहे.
देव आणि धर्माइतकाच कठीण विषय म्हणजे नैतिकता. अनेकदा लोक मला विचारायचे, “देव मानत नसाल तर चांगलं-वाईट कसं ठरवता? ” हा प्रश्न माझ्या मुलालाही पडला. शाळेत, गोष्टींमध्ये, चित्रपटांत चांगला माणूस म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा असा सूचक संदेश असायचा. तेव्हा मी त्याच्याशी खूप साध्या भाषेत बोललो. मी सांगितलं की, नैतिकता म्हणजे भीतीपोटी तयार केलेले नियम नाहीत, तर सहवेदनेतून समाज सुरळीत चालावा म्हणून घेतलेले निर्णय असतात. आपल्यामुळे कुणाला त्रास होतो का? कुणाचं नुकसान होतं का? आपण समाजात एकमेकांवर किती आणि कोणत्या हेतूने अवलंबून आहोत? आपण नागरिकशास्त्राचे नियम मोडत तर नाही ना? या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे नैतिकता. मला वाटलं होतं की, हे सगळं त्याच्यासाठी फार तात्त्विक ठरेल, पण उलट तोच मला उदाहरणं देऊ लागला… “मी मित्राची वस्तू परत दिली; कारण त्याला वाईट वाटू नये, असं मला वाटलं. ” त्या क्षणी मला कळलं की, विवेकवादी मूल्यं मुलांच्या मनात नैसर्गिकरीत्या रुजतात, फक्त आपण त्यांना धर्माच्या चौकटीत अडकवता योग्य दिशा दिली पाहिजे. इथेच माझ्या पालकत्वाची खरी कसोटी लागली.
मृत्यूबद्दलचा संवाद हा कदाचित सर्वात जड टप्पा होता. एखाद्या नातेवाइकाचा मृत्यू झाला, तेव्हा प्रश्न उभा राहिला, “तो कुठे गेला? ” अनेक पालक स्वर्ग-नरक, पुन्हा जन्म, देवाकडे गेला अशी उत्तरं देतात. कारण ती उत्तरं सोपी असतात. पण मी ठरवलं होतं की, मी असलं काही खोटं सांगणार नाही. तरीही मला भीती वाटत होती की, सत्य सांगितल्याने त्याचं मन अस्वस्थ होईल की काय? मी त्याला सांगितलं की, माणूस मरतो तेव्हा त्याचं शरीर निसर्गात मिसळतं, आठवणी आपल्या मनात राहतात, आणि तो आपल्यामध्ये अस्तित्वात राहतो त्याच्या स्मृतीतून. तो काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, “म्हणजे आपण त्याला आठवत राहिलो तर तो जिवंत आहे? ” त्या वाक्याने मला जाणवलं की मृत्यूबद्दलची विवेकवादी मांडणी माणसाला अधिक जबाबदार बनवते. त्या जबाबदारीतून त्याला हे कळलं की, स्वर्गाची आशा नसताना, आपलं आयुष्य इथेच अर्थपूर्ण करावं लागतं.
जन्माच्या बाबतीतही असाच संवाद झाला. म्हणजे तो साधारण चार वर्षाचा असताना त्याने आईला विचारले की, “मी कुठून आलो आणि कसा आलो? ” सर्वसाधारण घरातून अशा प्रश्नाला उत्तर दिले जाते की, ‘तुला देवबाप्पाने पाठवले. ‘ या उत्तराने मुलाचे समाधान होत असले तरी हे उत्तर चुकीचे आहे, खोटे आहे. यामुळे आपण मुलांवर नकळतपणे अंधश्रद्धेचा संस्कार करत असतो. तेव्हा त्याच्या आईने त्याला समाजावून सांगितले की, “तुला चित्रे काढायला आणि रंगवायला आवडतात. तू जेव्हा लाल रंगात हिरवा रंग मिसाळतोस तेव्हा त्यापासून तिसऱ्याच रंगाचा पिवळा रंग तयार होतो. तसेच बाबाच्या आणि माझ्या प्रेमाचे रंग मिसाळल्यामुळे तिसरा तू माझ्या पोटातून जन्माला आलास. ” किती विवेकी आणि सुंदर उत्तर आहे हे!
विवेकवादी संस्कार रुजवताना मी अनेक प्रयोग केले आणि तितक्याच चुकाही केल्या. एक काळ असा होता की, मी प्रत्येक गोष्टीत अंधश्रद्धा शोधून काढायचो. एखादी अंधश्रद्ध गोष्ट ऐकली की लगेच विज्ञान सांगायचो, आकडे मांडायचो, पुरावे द्यायचो. पण नंतर जाणवलं की मुलासाठी प्रत्येक क्षण वादाचा असणं थकवणारं आहे. कधी कधी त्याला फक्त गोष्ट ऐकायची असते, प्रश्न लगेच सुटले नाही तरी चालतात. मी हेही शिकलो की, विवेकवाद म्हणजे कायम “मला सगळं माहीत आहे” अशी भूमिका घेणं नाही, तर “मला अजून माहीत नाही” हे मान्य करण्याचं धैर्य आहे. खरोखरच त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नव्हती, आणि ते मी त्याला प्रामाणिकपणे सांगितलं. या प्रामाणिकपणामुळे आमच्यात विश्वासाचं नातं अधिक घट्ट झालं. आज मागे वळून पाहताना मला असं वाटत नाही की, मी एक परिपूर्ण विवेकवादी पालक आहे. उलट मला असं वाटतं की मी माझ्या मुलाकडून, समाजाकडून, आणि स्वतःच्या चुका पाहून अजूनही शिकतो आहे. पण एक गोष्ट नक्की वाटते की मी त्याला भीती दाखवण्यापेक्षा प्रश्न विचारायला उद्युक्त केले, आज्ञाधारक बनवण्यापेक्षा संवाद साधण्यास शिकवले, आणि श्रद्धेपेक्षा सहवेदना महत्त्वाची असते हे त्याच्या मनावर बिंबवले. थोडक्यात हा लेख केवळ माझ्या आठवणींचा संग्रह नाही; तो अशा अनेक पालकांच्या अनुभवांचा आरसा आहे, जे समाजाच्या प्रवाहात वाहून न जाता थोडं थांबून विचार करतात. कारण विवेकवादी पालकत्व हा एकट्याचा लढा नसतो; तो संपूर्ण कुटुंबाचा लढा होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, आपण आपल्या पुढच्या पिढीला अंधारात लोटले नाही, तर त्याच्या हृदयात करूणेची आणि मेंदूत विचाराची ज्योत प्रज्वल्लीत करण्याचा प्रयत्न केला, याचा आनंद काही औरच असतो.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




