सौ. शशी नाडकर्णी-नाईक
मनमंजुषेतून
☆ मोक्ष… भाग – १ – लेखिका : भारती ठाकूर ☆ प्रस्तुती – शशी नाईक-नाडकर्णी ☆
ही घटना आहे 27 नोव्हेंबर 2012 ची. नर्मदा किनारी नगावा नावाचे एक गाव आहे. गंमत आहे ना ! गावाचे नाव नगावा. तिथे अगदी नर्मदा किनाऱ्यावर केवट धर्मशाळेत शाळा मध्येच सोडून दिलेल्या मुलांसाठी आमचे एक अनौपचारिक शिक्षण केंद्र होते. आपण निशुल्क कोचिंग क्लास असे म्हणूया त्याला हवं तर. सकाळी दहा साडेदहा ची वेळ होती. मी वर्गात शिकवत होते. खिडकीतून बाहेर लक्ष गेले तर दोन परिक्रमावासी येताना दिसले. थोड्याच वेळात त्यांच्यापैकी एकाने वर्गाच्या खिडकीतून डोकावून मला विचारले, “भारती ठाकूर से मिलना था | कहा मिलेगी ?” मी हसून म्हटलं, “मीच आहे ती. दमून आला आहात. थोडं बसा, एवढा विषय संपवून मी येतेच. ”
जवळच्याच एका मंदिरात परिक्रमावासींची रहाण्याची सोय होती. तिथल्या ओट्यावर दोघेही माझी वाट बघत थांबले. थोड्यावेळाने मी तिथे पोहोचले. एकमेकांशी परिचय झाला. पुण्याचे राहणारे ते दोघेही सख्खे भाऊ होते. एक श्री माधव परांजपे आणि दुसरे श्री मुकुंद परांजपे. दोघांचीही वयं सत्तरीच्या आसपास असावीत. थोरल्या भावानी बॅगेतून एक वही काढली. त्यातल्या एका पानावर काही जणांची नावे लिहिली होती आणि वरती शीर्षक होतं नर्मदा परिक्रमेत या लोकांना अवश्य भेटणे आहे. त्या चार -पाच नावांमध्ये माझेही एक नाव होते. माझ्या नावासमोर त्यांनी माझा मोबाईल नंबर लिहिला.
त्या मंदिरात आमचे नेहमीच जाणेयेणे असल्यानेतिथली सगळीच मंडळी माझ्या ओळखीची होती. तिथल्या व्यवस्थापकांना मी सांगितलं, “ये हमारे पुना के मेहमान है । जरा अच्छेसे ध्यान रखना इनका |” आणि मी तिथून पुन्हा लेपाला परतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच सहाच्या सुमारासच धाकट्या भावाचा म्हणजे श्री मुकुंद परांजपे यांचा फोन आला. “ ताई-दादा गेले. मी मुकुंद परांजपे बोलतोय” मला काही कळेना की कुठे गेले आणि इतक्या सकाळी ? मी विचारलं कुठे गेले? “ गेले म्हणजे दादा वारले काल रात्री. पहाटे अडीच तीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आम्ही भटयाण येथे गोधारी आश्रमात थांबलो आहोत. काल नगाव येथे जेवण करून पुढे निघालो आणि संध्याकाळपर्यंत गोधारी आश्रमात पोहोचलो आणि तिथेच थांबलो. आम्हाला रात्री झोपायला स्वतंत्र खोली पण मिळाली. रात्री झोपेपर्यंत दादा व्यवस्थित होते. पहाटे अडीच तीनला मला त्यांच्या हालचालीने जाग आली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय हे मला जाणवलं. मी त्यांना प्यायला पाणी दिलं. एखाद-दोन घोट पाणी प्यायले असतील. पण लगेच त्यांचा प्राण गेला. आश्रमातल्या स्वामीजींनी डॉक्टरांना बोलावले पण काही उपयोग झाला नाही. प्राण गेला होता. काय करावे मला सुचत नाहीये. मी घरी पुण्याला कळवलं आहे. पण घरचे लोक कुठल्याही वाहनाने आले – अगदी विमानाने सुद्धा तरी त्यांना रात्रीचे नऊ-दहा वाजतील यायला. ” थोरल्या भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या धाकट्या भावाची अवस्था मी समजू शकले.
मी म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका. मी पोहोचते तिथे. मी आमच्या दोन कार्यकर्त्यांना काय घडलं ते सांगितलं आणि लवकर तयार व्हा आपल्याला निघायचे आहे अशी सूचना देखील दिली. ताबडतोब आम्ही तिथे पोहोचलो. तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा. गोधारी आश्रम नर्मदा किनाऱ्यावर परशुरामांची तपस्थली म्हणून प्रसिद्ध आहे. मी बरोबर जाताना भगवद् गीता आणि इतर काही स्तोत्रांची पुस्तकं आठवणीने बरोबर घेऊन गेले. करण दिवसभर त्या भावाशी काय बोलणार ?
दिवस उजाडला आणि एका परिक्रमावासीचे नर्मदा किनारी देहावसान झाले आहे ही बातमी आसपासच्या गावात वार्यासारखी पसरली. लोक दर्शनासाठी येऊ लागले. त्यांच्या बोलण्यातून समजले की नर्मदा किनारी परिक्रमावासीचा मृत्यू आणि तोही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणे याला भाग्य लागतं. या भाग्यामध्ये श्री परांजपे यांचं ॲडिशनल भाग्य हे होतं की ते चित्पावन ब्राम्हण होते आणि परशुरामांच्या तपस्थलीवर त्यांचा मृत्यू झाला.
दिवसभर लोक दर्शनासाठी येत होतेच. आश्चर्य म्हणजे कोणीही रिकाम्या हाती आलं नाही. कोणी आमच्यासाठी चहा आणत होते तर कोणी दूध. कुणी साजूक तूप. कुणी गोवऱ्यांची व्यवस्था करत होते तर कुणी प्रेतावर पांघरण्याचे वस्त्र. गावातल्या बायकांनी आठवणीने मला सांगितले, “ दीदी, आमच्याकडे भरपूर लाकूडफाटा आहे. स्वयंपाकासाठी आम्ही तो गोळा करून ठेवतो. ती लाकडे घेऊन जा. आमची पिकअप व्हॅन या कामासाठी उपयोगी पडली. भरपूर गोवऱ्या आणि लाकडे लोकांनी किनाऱ्यावर रचून ठेवली. तो संपूर्ण दिवस खूप अस्वस्थतेत गेला. दर तासाला त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क चालू होता. त्यांचे इंदोर मधले परिचित श्री वाळुंजकर हे या परिवाराला भट्याणला घेऊन येणार होते. आम्ही त्यांच्याशीही संपर्कात होतो नर्मदा किनाऱ्यावर सरणाची तयारी चालू आहे आणि चिता रचली गेली आहे हे गोधारी आश्रमातल्या स्वामीजींना समजताच त्यांनी वेगळा पेच प्रसंग माझ्यापुढे उभा केला. श्री परांजपे परिक्रमेत होते. म्हणजे तो एक प्रकारचा सन्यासच असतो. आणि संन्यास घेतलेल्या व्यक्तीचे नर्मदा किनारी दहन होत नाही तर ते पार्थिव शरीर नर्मदेला अर्पण केलं जातं. पार्थिवाला जल समाधी दिली जाते.
अनेकदा अशी काही पार्थिव शरीरे जलसमाधी दिल्यानंतर नर्मदेच्या पात्रात असलेल्या खडकांमध्ये अडकतात आणि कुजतात हे मी वाचलं होतं, ऐकलं होतं आणि एक-दोन ठिकाणी बघितलेही होतं. त्यामुळे हे जलसमाधीचे खूळ लोकांच्या डोक्यातून निघावं अशी माझी इच्छा होती. मी तसा वाद घालूनही पाहिला.. लोकांचं म्हणणं असं कि शरीर सडतं हे खरं आहे पण ते मासे खाऊन टाकतात. त्यांना अन्न मिळतं. माझी समजूत पटेना. कारण तेच पाणी गावातले लोक हंडे भरून पिण्यासाठी आपल्या घरी नेतात. नर्मदेवर स्नानासाठी आलेले भक्त सुद्धा तेच पाणी पितात. त्यांचे काय ? खूप विचार केल्यानंतर एक युक्ती मला सुचली. कै. परांजपे यांच्या मुलाला मी इथे काय चर्चा चालू आहे लोकांमध्ये ते फोनवर सांगितलं. त्याला मी सांगितलं, की ‘ वडलांच्या चितेला अग्नी देणे हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे. आमचे सगळेच नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी इथे पोहोचू शकणार नाहीत. माझी आई सुद्धा येऊ शकत नाहीये. अशावेळी किमान मला अस्थिकलश घेऊन जाता यावा म्हणून तरी पार्थिव शरीराचे दहन होणे आवश्यक आहे. ’– असे तू त्या स्वामीजींना सांग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वादात मी जिंकले. गावकरी आणि ते स्वामीजी नर्मदा किनाऱ्यावर कै. परांजपे यांचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : भारती ठाकूर
नर्मदालय, लेपा पुनर्वास (बैरागढ) जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश.
प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





