श्री दिवाकर बुरसे
☆ ‘गोपाळाची मुरली, गोरक्षाचा कल्याण’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
आज गुरुवार. जरा सावकाश उठायचे ठरवले होते; पण सवयीप्रमाणे लौकरच जाग आली. वातावरण आल्हाददायक होते. किंचित गारवा होता. आन्हिके, स्नान, संध्या, पूजा-अर्चना उरकून मन प्रसन्न झाले. सहज फेरफटका मारावा म्हणून घराबाहेर पडलो आणि पावले जंगली महाराजांच्या मंदिराकडे वळली.
मंदिराच्या द्वाराजवळील विक्रेत्याकडून हार-फुले घेतली आणि पायऱ्या चढून समाधीपाशी गेलो. समाधीवरील भरजरी चादर सूर्यप्रकाशात चमकत होती. निशिगंध, गुलाब आणि तुळशीचा सुगंध दरवळत होता. उदबत्त्यांच्या धूम्ररेखा आवर्तने घेत वर चढत होत्या. समोरचे धूपपात्र धुमसत होते.
हार, फुले वाहून साष्टांग दंडवत घातला. एका कोपऱ्यात शुभ्र वस्त्रांतील, दाढी वाढवलेली, केशरी टोपीधारी एक वृद्ध ऋषितुल्य व्यक्ती ध्यानस्थ बसली होती. ते हिंदुमहासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. रा. स. भट असावेत. त्यांनाही नमस्कार करून मी एका कोपऱ्यात ध्यानाला बसलो.
अर्ध्या तासाने बाहेर आलो. समोर ‘ओम चेंबर्स’ दिसत होते. अचानक आठवले — योगिनी सुमनताई ताडे सध्या इथेच त्यांच्या बहिणीकडे राहायला आहेत. वाटलं, आलोच आहोत तर त्यांनाही भेटून जावं.
ताईंच्या सदनिकेवर टकटक केली. दार एका शिष्येने उघडले.
“कोण पाहिजे?”
“सुमनमावशी आहेत का? मी त्यांच्या थोरल्या बहिणीचा जावई — दिवाकर. ”
“या, बसा. ताई खाली पाहुण्यांना निरोप द्यायला गेल्यात. येतीलच. ”
ताई नसताना घरात बसणे प्रशस्त वाटले नाही. म्हणून मी बाल्कनीत जाऊन उभा राहिलो. खाली पदपथावर ताई एका प्रौढ, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या महिलेशी बोलत उभ्या होत्या. मोतिया रंगाची रेशमी साडी, मरून काठ, दोन्ही खांद्यावरून घेतलेला पदर, डोळ्यावर चष्मा आणि हातात बिल्वरांची झळाळी…
त्या व्यक्ती परिचित वाटत होत्या.
तेवढ्यात रिक्षा आली. त्या बाईंनी ताईंना निरोप दिला आणि रिक्षात बसल्या. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत दोघी एकमेकींना हात हलवत राहिल्या.
थोड्याच वेळात ताई वर आल्या. मला पाहताच उत्साहाने म्हणाल्या,
“अरे, जरा लौकर आला असतास तर एका थोर व्यक्तीची ओळख करून दिली असती!”
मी विचारले, “कोण होत्या त्या?”
ताई हसल्या.
“अरे, ती साक्षात भगवंताची मुरली होती!”
“म्हणजे?”
“माणिक वर्मा! श्रीहरीची मधुर मुरली!”
क्षणभर मी अवाक् झालो.
“साक्षात माणिकताई? त्या इथे कशा काय?”
ताई म्हणाल्या,
“काल रात्री त्यांचा फोन आला. म्हणाल्या — ‘उद्या भेटायला येऊ का? मला तुमच्याकडून काही शिकायचं आहे. ’”
“तुमच्याकडून?”
“हो. त्यांना ‘गोरक्षकल्याण’ रागातील काही दुर्मीळ चीजा शिकायच्या होत्या. कुठूनतरी त्यांना समजलं होतं की माझ्याकडे त्या आहेत. ”
मी आश्चर्यचकित झालो.
“पण तुम्ही गाणं शिकलात कधी?”
त्यावर ताई शांतपणे म्हणाल्या,
“मी कुणाकडेही शास्त्रीय संगीत शिकले नाही रे. हे सगळं संतांचा प्रसाद आहे. ”
आणि मग त्यांनी सांगितलेली कथा विलक्षण रोमांचकारी होती.
बेळगावला योगिनी कलावती देवींच्या सान्निध्यात त्या काही काळ होत्या. एकदा पाद्यपूजेनंतर आईंनी स्वतः घेतलेल्या केशर-वेलचीच्या दुधातील अर्धे दूध सुमनताईंना पाजले.
ताई सांगत होत्या,
“त्या क्षणापासून, कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना, माझ्या मुखातून रागदारी उमटू लागली. एकच भजन अनेक रागांत गाता येऊ लागले. विविध चीजा, रचना सहज सुचू लागल्या. हीच संतकृपा. ”
हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले.
ताई पुढे म्हणाल्या,
“पण खरी थोरवी माणिकताईंची आहे. संगीतविश्वात एवढं मोठं स्थान असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नाही. अजूनही नवीन शिकायची तळमळ! सुरांच्या शोधात त्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडे आल्या — हीच त्यांची महानता. ”
त्यांचे शब्द ऐकता ऐकता माझे डोळे नकळत ओलावले.
इतक्यात दाराची बेल वाजली.
दार उघडले तर साक्षात माणिकताई समोर उभ्या!
मी गोंधळलोच.
त्या हसत म्हणाल्या,
“योगिनीताई, माझी पर्स इथेच राहिली वाटतं. त्या गोरखकल्याणच्या नादात विसरून गेले. ”
खरंच, पर्स गादीवरच पडली होती. मी ती त्यांच्या हातात दिली.
ताईंनी माझा परिचय करून दिला.
“हे दिवाकर. संगीताची फार आवड आहे यांना. ”
मी पटकन म्हणालो,
“ऐकण्याची आवड बरं का! गाता-वाजवता काही येत नाही. ”
त्यावर माणिकताई मनमोकळं हसल्या.
“असू द्या हो. आम्हाला रसिक श्रोतेच लागतात. श्रोते आहेत म्हणूनच आम्ही कलाकार आहोत. तेच आमचे अन्नदाते, तेच आमचे दैवत. ”
आम्ही दोघे खाली आलो. रिक्षा उभीच होती.
माणिकताई म्हणाल्या,
“या, तुम्हाला वाटेत सोडते. ”
मी संकोचत म्हणालो,
“नको ताई. मला समोरच जंगली महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. ”
त्या हसल्या. रिक्षा निघाली.
रिक्षा दिसेनाशी झाली…
आणि मी तिथेच उभा राहिलो — भारावलेला, स्तब्ध.
माझ्यासमोर साक्षात ‘गोपाळाची मुरली’ होती…
आणि त्या मुरलीच्या अंतर्यामी घुमत होता — ‘गोरक्षाचा कल्याण’!
(पावस निवासी परमहंस सदगुरू स्वामी स्वरूपानंदांच्या अंतरंग शिष्या, वैकुंठवासी परमपूज्य *योगिनीताई ताडे* यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन वैशाख वद्य दशमी अर्थात मंगळवार दिनांक १२ मे २०२६ या दिवशी होता.. त्यानिमित्ताने लिहिलेला हा लेख)
🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






