डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “रिटर्न गिफ्ट…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

कोण म्हणतं भिक्षेकरी काम करत नाहीत?

… त्यांचा विश्वास तरी संपादन करा…

तुम्ही माणूस आहात याची जाणीव तरी करून द्या…

प्रेमाचं एक बोट त्यांना फक्त देऊन पहा…

दोन्ही हाताच्या दहा बोटांनी ते डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतील…

आपण सांगू ते करतील…

हां… पण त्यांच्याशी थोडं एकरूप व्हावं लागेल, एकजीव व्हावं लागेल…

– – अद्वैत अद्वैत म्हणतात ते कदाचित हेच असावं!

आता हेच पहा ना; ही एक दिव्यांग आजी, मला हक्काने म्हणाली, ‘पोरा तू समद्यांना किराणा दिला मला न्हाय दिला… ‘ 

मी तिला म्हणालो, ‘मावशी हा जो फुटपाथ दिसतोय, तो आपण दोघं मिळून साफ करू, मग मी तुला किराणा देतो. ’ 

धड चालताही येत नसताना तीने हा फुटपाथ झाडून काढला…

यानंतर मी तिला अत्यंत मायेने, नवीन वॉकिंग स्टिक देऊन, महिनाभर पुरेल इतका किराणा दिला.

(खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team आम्ही तयार केली आहे ती याच कन्सेप्ट वर. चला आपण सर्वजण मिळून स्वच्छता करू, त्यानंतर मी तुम्हाला किराणा देतो. सांगायला अभिमान वाटतो की या टीम मध्ये 100 आज्या आणि मावश्या आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमची टीम पुणे जिल्ह्याची स्वच्छता अभियानची ब्रँड अँबेसेडर आहे.)

तर… या आजीला किराणा दिल्यानंतर मी तिला म्हणालो, ‘फुटपाथ आपुन दोगांनी मिळून झाडला, मी तुला किराना दिला, मंग आता तू मला काय देनार…? ? ? ’

यानंतर, तीने माझ्या डोक्यावरून आणि गालावरून हात फिरवून स्वतःच्या कानशिलावर बोटं कडाकडा मोडली आणि म्हणाली, ‘माझं आविक्ष तुला लाबुंदे… जलमभर माजा पोरगा म्हनून राहा, मला कदि दूर करू नगो… मी मेल्यावर मला तूच काडी लाव…! ‘

… हे ऐकून आणि पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं… मला ती धूसर दिसायला लागली…

एवढ्यात तीने बंदा एक रुपया काढून माझ्या हातात ठेवला… म्हणाली, ‘माजी लक्षुमी आई तुला देते जपून ठीव…! ‘

यानंतर झाडून स्वच्छ केलेल्या त्या फुटपाथ वर डोळ्यात पाणी घेऊन मी चालत निघालो… मुठीत घट्ट धरलेला तो रुपया होता…

याच रस्त्यावरून, अनेक माणसं जात येत होती, परंतु याच रस्त्यावरून जगातला एक सर्वात श्रीमंत माणूस चालला होता…

आणि तो मीच होतो… मीच होतो…!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted