?  मनमंजुषेतून ?

☆ भांड्यांवरची कोरलेली नावं ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

लहानपणी पुण्यातल्या  घरांमधल्या  भांड्यांवर खिळ्याने ठोकून नावं घातलेली असत. प्रत्येक तांब्या-पितळेच्या आणि नंतर स्टीलच्या सुद्धा भांड्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तीचं  नाव (मालक म्हणून असावं बहुदा !) तारीख आणि गावाच्या नावासह वळणदार अक्षरात कोरलेलं असायचं. जर एखाद्या समारंभात ते भांडं दिलं असेल तर ” चि. सौ. का. xxx च्या विवाहाप्रित्यर्थ किंवा चि. XYZ च्या मौजीबंधन समारंभ प्रित्यर्थ– ABC कुटुंबाकडून सप्रेम भेट ” असं तारखेनिशी लिहिलेलं असायचं ! 

असं नाव कोरून देणारा  माणूस माझ्या दृष्टीनी भांड्यांच्या दुकानातला सगळ्यात इंटरेस्टिंग माणूस असायचा ! तुळशीबागेच्या समोर जराशा उजव्या हाताला असणाऱ्या  “पंड्याच्या” भांड्यांच्या दुकानात आईची खरेदी सुरु झाली, की माझा मोर्चा तिथे शेजारीच असलेल्या देवळाच्या पायरीवर बसून, भांड्यांवर कोरून  नावं घालणाऱ्या काकांकडे  वळलेला असायचा—-आणि त्यांचं एकाग्रपणे चाललेलं ते काम मीही मन लावून बघत बसायची. 

एका संथ तालात, किंवा लयीत म्हणूया,  साध्या खिळ्याच्या साह्याने ठोकत ठोकत, गिऱ्हाईकाने कागदावर लिहून दिलेली  मराठी किंवा इंग्रजी अक्षरं अगदी वळणदार पद्धतीने उतरवणारे ते हात एखाद्या शिल्पकारासारखे वाटायचे मला— आता कुठे गेले ते हात ? काही दिवसांनी नावं घालायच्या मशीनचा उदय झाला, आणि ही परंपरागत कला लोपच पावायला लागली— बघता बघता लोप पावली सुद्धा  !!

पण एक गोष्ट मात्र मान्य करायला पाहिजे, की मशीननी घातलेली नावं पुसूनही जातात , पण ठोकून कोरलेली नावं  ५०-६० वर्षांनंतरसुद्धा अजूनही भांड्यांवर टिकून आहेत !!!

– सुश्री शुभा गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments