श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ सकारात्मक विचार – यशस्वी करिअरसाठी कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थाने उत्सुक असणाऱ्यांनी पुढील कानमंत्र अवश्य आचरणात आणायला हवेत.

नावे लक्षात ठेवणे —

जर तुम्हाला असे वाटत असेल की, लोकांमध्ये तुम्ही प्रिय व्हायला हवेत, तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे इतरांची नावे लक्षात ठेवणे. हे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. जगातील कुठल्याही भाषिकाला आणि कोणत्याही देशातील रहिवाशाला जर सर्वात प्रिय काय असेल तर ते स्वत:चे नाव होय. स्वत:च्या नावाइतका महत्त्वाचा आणि गोड शब्द दुसरा असूच शकत नाही. खरे म्हणजे आपल्या संपर्कात आलेल्या लोकांची नावे लक्षात ठेवणे हे तुमच्या करिअरमधील महत्त्वाचे कौशल्य आहे आणि तुम्ही ते आत्मसात केले पाहिजे.

एखाद्या व्यक्तीची कितीही काळानंतर भेट झाली अन् तुम्ही त्या व्यक्तीला नावाने हाक मारलीत तर आपोआपच त्याच्या मनात तुमच्याविषयी आपुलकी निर्माण होते.

नेपोलियन बोनापार्ट या महान योद्ध्याचा पुतण्या तिसरा नेपोलियन, जो फ्रान्सचा सम्राट होता, अभिमानाने सांगत असे की, कामाच्या प्रचंड तणावातही तो इतरांची नावे लक्षात ठेवू शकत असे. याविषयी त्याचे तंत्र अगदी सोपे होते. जर एखाद्याचे नाव त्याला नीट ऐकू आले नाही, तर तो मोकळेपणाने समोरच्या व्यक्तीला म्हणायचा, ” माफ करा मला तुमचे नाव स्पष्ट ऐकू आले नाही.” आणि त्यानंतर सांगितलेले नाव तो लक्षात ठेवायचा. संभाषणादरम्यान समोरच्या अनोळखी माणसाचे नाव वारंवार उच्चारून ते नाव लक्षात ठेवणे ही त्याची खुबी होती.

चांगले श्रोते बना ….

स्वत:बद्दल बोलायला सर्वांनाच आवडते. पण ते मन:पूर्वक ऐकणारा श्रोता त्यांना हवा असतो.

जर तुम्ही चांगले संभाषणकर्ते बनू इच्छित असाल तर आधी चांगले श्रोते बना. समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. अधूनमधून “हो का?”  “असं का?”  “त्या प्रसंगी तुम्ही कसे वागलात?” असे प्रश्न विचारा म्हणजे समोरचा माणूस आणखी उत्साहाने बोलू लागेल; आणि तुमच्या ध्यानीमनी नसतांना असे अनेक मित्र आपसूकच तुम्हाला मिळतील.

इतरांमध्ये खऱ्या अर्थाने स्वारस्य दाखवा

सुप्रसिद्ध रोमन कवी पब्लीअस सायरस याने म्हटले आहे की, इतरांनी आपल्या गोष्टीमध्ये स्वारस्य दाखवावे असे वाटत असेल तर आधी आपण इतरांच्या गोष्टीत स्वारस्य दाखवायला हवे. एक चांगला श्रोता होणे हे तर पुष्कळ महत्त्वाचे आहेच. पण त्यानंतरची पायरी म्हणजे इतरांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी इतरांच्या सुखदु:खात आस्था दाखवून खऱ्या अर्थाने समरस होता आले पाहिजे. कुणाचे कौटुंबिक प्रश्न असतील तर कुणाचे नोकरीतील प्रश्न असतील. त्यासंबंधी आस्थेवाईकपणे चौकशी करून, त्याविषयी काळजी व्यक्त करून दिलासा द्यायला हवा. “कुणीतरी आपली काळजी करणारे आहे,” या विचाराने माणसाला दिलासा मिळतो, धीर येतो; आणि यातूनच कधीही न तुटणारी नाती आणि प्रेमाचे बंध निर्माण होतात. आपल्या करिअरच्या यशस्वीतेसाठी हीसुद्धा एक गुरुकिल्ली आहे.

टीका करू नका.

परिस्थिती कुठलीही असू द्या, प्रसंग कोणताही असू द्या. पण कुणावरही, कधीही उघडउघड टीका करू नका. नापसंती दर्शवू नका किंवा सरळसरळ तक्रारीचा सूर काढू नका. त्याऐवजी अप्रत्यक्षपणे समोरच्या व्यक्तीची चूक त्याच्या नजरेत आणून द्या. नकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रगती होत नसते. इतरांना त्यांच्या चुकांबद्दल संशयाचा फायदा द्या. दोषी व्यक्ती आपोआपच स्वत:चे तोंड लपवील.

माझ्या तरुण मित्रांनो,  वर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अमलात आणल्या तर तुमचे करिअर यशस्वी झालेच म्हणून समजा.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments