☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -4 ☆ सौ. अंजली गोखले ☆

किशोर वयातले ते अल्लड, अबोध कळी पण हळूहळू उमलत जाते, तस तसे अवतीभोवतीचे खरे वास्तव लख्ख दिसायला लागते ,  जाणवायला लागते. तारुण्याच्या उंबरठ्यावर डोळ्यांची पाखरं फडफडायला लागतात,  मनाला फुलपाखरी पंख फुटतात. स्वप्नांच्या ढगांमध्ये मुक्तपणे संचार सुरू होतो. एवढ्याश्या मनामध्ये, इवल्याशा नजरेची स्वप्न असंख्य असतात, , अभ्यासाची असतात करियरची असतात, मोठेपणी आई-वडिलांना आधार देण्याची असतात, मित्र-मैत्रिणींची असतात, आयुष्याच्या जोडीदाराची असतात, मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याची असतात.कोणाला मिलिटरी मध्ये जायचे असते, कोणाला क्रिकेटर बनायचे असते, कोणाला शास्त्रज्ञ तर कोणाला सर्जन!उन्हाळ्यामध्ये बहावा कसा फुलून, पिवळ्या जर्द नाजूक फुलांनी डवरलेला असतो, डोलत असतो, गुलमोहर गडद लाल फुलांनी आकर्षून घेत असतो, तसे तारुण्यातल्या मनाला ही सगळी स्वप्न खुणावत असतात.ती स्वप्न गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असते.ज्यांना मनासारखे यश मिळते, ते सुखाने मनोराज्यात मुक्तपणे विहार करतात.ज्यांचे निम्मी किंवा अखे तरूणपण त्यांना पकडण्यात जाते, त्यांच्या मनाला ओरखडे पडतात, त्यांच्या स्वप्नांचे पक्षी दूर दूर भरकटत निघून जातात आणि उरते एकाकीपण!सभोवताली निराशेचे ढग जमायला लागतात.जीवनाला सुरवंटाचे काटे टोचायला लागतात आणि अपयशाने खचून जायला होते.यास  सुरवंटी अवस्थेमध्ये , एखादा जरी सोबतीचा हात मिळाला, सहानुभूतीची हलकीशी थाप पाठीवर पडली, तरी ते आयुष्य सावरायला मदत मिळते आणि बघता बघता आयुष्याची पन्नास-पंचावन्न वर्षे भुरकन सरतात.इतरांसाठी करता-करता, स्वतःच्या इच्छा , अपेक्षा, आवड गुंडाळून ठेवलेली असते.आयुष्याची संध्याकाळ खुणावायला लागते.

नेमक्या याच वळणावर आपल्या आयुष्याची, आरोग्याची, आपल्या माणसांची खरी किंमत कळते.काहींना”संध्याछाया भिवविती हृदया”हे जाणवायला लागते तर अनेकांना अनेक व्याधींचा  विळखा पडलेला असतो. त्यांना दवाखान्याचे खेटे घालावे लागतात, वेळच्यावेळी औषध पाण्याच्या वेळा सांभाळण्यात सहकार्याची दमछाक होते.आपल्या गाडीचा वेग मंदावलाय हे समजते. काहीजण मात्र यासाठी नंतर अतिउत्साही बनतात. आपले छंद जोपासतात. आपला आनंद आपणच शोधतात. पर्यटनाचा आनंद उपभोगतात. मित्रमंडळीत रमतात. वाचन मनन चिंतन आणि चर्चा अशा मधून एकमेकांशी संवाद साधतात. तरुणपणी जे करायला मिळाले नाही, जे छंद जोपासायला मिळाले नाही त, आयुष्यातले जे क्षण वाळूसारखे हातातून गेलेले असतात, ते पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि जीवनाची संध्याकाळ मनासार खी उपभोगतात.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments