सुश्री ज्योति हसबनीस

अवचित एका सायंकाळी

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  द्वारा  एक सुमधुर संगीत के कार्यक्रम की अति सुंदर व्याख्या ।  )

कधी कधी ध्यानी मनी नसतांना अचानक एखादा खजिना गवसावा तसं काहीसं काल झालं . सिव्हील लाईन्सच्या वसंतराव देशपांडे हॉलकडे जाणाऱ्या रस्त्याचं उत्सवी रूप बघून हरखूनच गेले मी आणि नकळतच पावलं उत्सुकतेने हॉलच्या दिशेने वळली, रस्त्याच्या दुभाजकावर रोवलेले, आणि फडफडणारे रंगीबेरंगी झेंडे, मुख्य प्रवेशद्वारावर उभारलेली अत्यंत आकर्षक कमान ,हाॅलपर्यंतच्या रस्त्यावर घातलेला रेड कार्पेट, सुरेख रंगसंगतीतली संस्कारभारतीची रांगोळी, हाॅलच्या प्रवेशद्वारासमोर मंद ज्योतींच्या प्रकाशात जणू कलेचा सारा वैभवशाली इतिहासच उजळून काढणारा भव्य दीपस्तंभ, गच्च मोगऱ्याचं घमघमणारं मुख्य दारावरलं तोरण, आणि आत हाॅलमध्ये जाण्यासाठी असणाऱ्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सोडलेले मोगऱ्याचे कलात्मक पडदे, सारं वातावरणच गंधभारलं झालं होतं. ‘सूर -वसंत’ च्या रूपांत जणू वसंतच फुलला होता, परिसरात, मनामनात!

आज अगदी मेजवानी होती रसिकांना ! सुरेल वाद्यांची जुगलबंदी, आणि ऊस्ताद रशिदखान  यांचे खणखणीत सूर ! डायसवर सारी दिग्गज कलाकार मंडळी आपापल्या वाद्यांशी थोडंसं हितगुज करतांना जाणवत होतं, हळूहळू पडदा उघडला, आणि थोर कलाकारांचा परिचय करून दिल्यानंतर ज्याची रसिक अगदी श्वास रोखून वाट पाहत होते त्या जुगलबंदीस सुरूवात झाली. सॅक्साफोन, बासरी, तबला, मृदुंग, आणि मोरसिंग साऱ्यांच्या आपसात गप्पा सुरू झाल्या. कधी सॅक्साफोन, बासरीचं हितगुज चाललं होतं तर, कधी त्यांच्यात एकदम वादाची ठिणगी पेटल्यासारखी वाटत होती, तबला आणि मृदुंग काळोकाळ न भेटलेल्या मित्रासारखे संवादी सूर आळवत होते तर कधी त्यांच्यातही एखादा विसंवादी सूर लागावा तशी खडाजंगी होत होती, मोरसिंग खट्याळ सारखं अध्ये मध्ये लुडबुडत होतं, चित्र विचित्र  आवाजांनी साऱ्यांना ‘अरे ऐकारे माझंही थोडं ‘ जणू असं म्हणत आपलं अस्तित्व दाखवून देत होतं, मध्येच तबल्याला आपलं तेच खरं करायची तल्लफ येत होती तर , मृदुंग  देखील हम किसीसे कम नहीं करत बेभान थिरकत होता !मधूनच सुरेल पदन्यासात बासरी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती, तिच्या दैवी सुराच्या चांदण्यात तर सारीच उजळली होती ! अधून मधून शिस्तीत सारे ‘ मिळून साऱ्याजणी ‘ चा साक्षात्कार झाल्यासारखे सूरात सूर

मिसळून, गप्पाष्टकांत गुंग झाल्यासारखे वाटायचे, तर मध्येच एखादा, एकांड्या शिलेदारासारखा किल्ला लढवायचा …..! कलेची साधना म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, याचा साक्षात्कारच झाला मला ! ती थिरकणारी आणि क्षणभर अंतर्धानच पावणारी बोटं, केवळ कानांना जाणवणारी त्यांची थाप त्यातली त्यांची लय, रागाच्या विशिष्ट  सुरावटीच्या रिंगणातच त्यांनी एकमेकांबरोबर केलेलं लयबद्ध नृत्य अत्यंत विलक्षण ! माझ्यासारखा संगीताचा सा ही न कळणारा कानसेन अगदी तृप्त तृप्त झाला. उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी मानवंदना दिली त्या थोर कलाकारांना !

जुगलबंदीनंतर ऊस्ताद रशीदखान यांच्या गायकीला सुरूवात झाली. क्षणात उंची खोलीचे पल्ले लीलया गाठणारी त्यांची खणखणीत आवाजातली सुरावट त्यांनी सादर केलेल्या बंदिशीतून झळकत होती. स्वरांबरोबरचा त्यांचा विहार रागांच्या शिस्तीच्या  चौकटीत असला तरी अतिशय विलोभनीय होता. जणू सुरांची आणि त्यांची अशी गळामिठी रंगली होती की ती सुटूच नये असं वाटत होतं . आवाजातल्या फिरतीचं गारूड रसिकमनावर अगदी गोंदलं गेलं होतं. साथीला असलेला तानपुरा, तबला आणि गोsड सारंगी, सुरावटीचं ऐश्वर्य अधिकाधिक समृद्ध करत होते …! गुरूबरोबरच साथ संगत करणारा त्यांचा शिष्य देखील आपल्या गानकौशल्याने रसिकमनावर आपला एक वेगळा ठसा उमटवून गेला !

कलेचा समृद्ध आविष्कार माझ्यासारख्या कलाप्रांतातल्या अनभिज्ञ जिवाच्या आयुष्यात एक अनमोल असा खजिना रिता करून गेला. घरी परतले तरी ते सूर होतेच सोबतीला, झोपतांना देखील वाद्यांचं रंगलेलं गप्पाष्टक आठवत होतंच. कदंबाला भेटायला गेलेली मी ..मला नाराज नाही केलं त्याने …माझी पावलं वळवलीत देशपांडे हाॅलच्या दिशेने … त्याच्याचसारख्या सुगंधी स्मृतींच्या खजिन्याच्या दिशेने ..मनातला माझा कदंब अधिकाधिक जिव्हाळ्याचा वाटायला लागलाय आता !!

© ज्योति हसबनीस, नागपूर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments