सुश्री आरुशी अद्वैत

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी  (सुश्री आरुशी अद्वैत जी ) का  एक सामाजिक कुप्रथा पर आधारित  आलेख। इस आलेख में उद्धृत निष्पक्ष विचार सुश्री आरुशी जी के व्यक्तिगत विचार हैं।  हम किसी भी सामाजिक कुप्रथा  जो  संविधान , समाज अथवा व्यक्ति की मनोभावना व वैचारिक स्वतन्त्रता  तथा आत्मसम्मान के विरुद्ध हो उससे कदापि सहमत नहीं हैं।   )

 

☆ कौमार्य चाचणी… अमानुष पद्धत.. ☆

 

लग्न झाले की नवऱ्या मुलीला ही चाचणी करावीच लागते, ह्यातून सुटका नाही… कंजारभाट समाजातील ह्या घृणास्पद रितिरिवाजावर काल करम प्रतिष्ठान तर्फे चर्चासत्र आणि विषयाधारीत कवितावाचन ठेवण्यात आलं होतं…

तिथे लीलाताई इन्द्रेकर ह्यांच्याकडून जी माहिती मिळाली ती ऐकल्यावर मन विषण्ण झालं, सुन्न झाले… काही वेळा अंग थरथरायला लागलं, तर कधी दगडासारखं घट्ट बनलं, तर कधी पोटात ढवळाढवळ होऊ लागली.. एकंदरीत काय रितिरिवाजांमधील फोलपणा समोर येत होताच, त्याचबरोबर त्यातील भीषणता अस्वस्थ करून मनाला डागण्या देत होते… नुसतं ऐकून आमची ही अवस्था झाली होती, तर ज्या मुलींना ह्या पद्धतीला नकार देता येत नाही आणि सगळं निमूटपणे सहन करायला लागत असेल त्या मुलींना, स्त्रियांना ह्या राक्षसी वृत्तीच्या पुरुषांची चीड आल्याशिवाय राहत नसेल… जे जे ऐकलं ते इतकं भयंकर आहे की लिहितानासुद्धा अंगावर काटा येतोय आणि लिहिण्याचं धैर्य तर अजिबात नाही…

कौमार्य चाचणी घेताना मुलीवर, तिच्या कुटुंबियांवर जे दडपण, दबाव टाकला जातो, त्यामुळे लग्नानंतर सुरू होणाऱ्या नाजूक, कोमल नात्याबद्दल स्वप्न पाहणं तर दूरच, पण ह्या चाचणीमुळे जो मनस्ताप सहन करावा लागत असेल ते शब्दात सांगणे कदापि शक्य नाही… दुर्दैवाने जर ही चाचणी फेल गेली तर त्या मुलीचे आणि कुटुंबाचे हाल हाल केले जातात, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो, अगदी जीवनावश्यक गोष्टीही पुरवल्या जात नाहीत, मुलीला मारहाण, तिचा छळ, ह्याची परिसीमाच… मुलीला शंभर लोकांसमोर उत्तरे द्यावी लागतात… बिचारीची धिंड काढायची बाकी असते… हे सगळं तिच्या इच्छेविरुद्ध घडत असतं, आणि तिला कोणीच एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून मदत करायला तयार नसतं… सगळं चव्हाट्यावर आणून तिला दोषी ठरवून तिच्यावर अत्याचार करतात, आणि ह्याला कोणीच विरोध करत नाही, करण जात पंचायत जे सांगेल ते बरोबर ह्या अंधश्रद्धेच्या आंधळ्या कुबड्यावर चालणं इथल्या पुरुषांना सोपं वाटतं, शिवाय जमातीत राहायचं आहे तेव्हा जमातीच्या नियमांना डावलण्याचं धाडस नसतं किंवा सोयीस्कर रित्या हे धाडस गुंडाळून ठेवलं जातं… देशातील कायद्याला धाब्यावर बसवून जात पंचायत फक्त त्यांचा इगो आणि सो कॉल्ड पद भूषवण्यात धन्यता मानतात… चर्चासत्रातून असेही निदर्शनास आले की ही पद्धत फक्त कंजार भाट समाजात नसून, इतर अनेक उचचभृ समाजातही पाळली जाते…

आज एक स्त्री म्हणून मी देवाचे आभार मानते की त्याने माझ्यावर अशी वेळ कधीच आणली नाही, तरी माझ्या तक्रारी संपत नाहीत, ह्या अवस्थेतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे… जणू दुःखाची काय किंवा सुखाची व्याख्या पडताळून पाहणे आवश्यक आहे…

इंटरनेट वर search केलं तर ह्यावर इथांभूत माहिती मिळेल.

सध्या ह्याच समाजातील काही तरुणांनी ह्या अमानुष रूढी परामपरेविरुद्ध आवाज उठवला आहे, त्यात विवेक तामचीकर आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या भात ह्या लढ्याला सुरुवात केली आहे, शिवाय लीलाताई इन्द्रेकर ह्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत, हे कार्य करणाऱ्या , मुलांना त्यांच्याच समाजातूनच अनेकविध लोकांकडून धमक्या येतात, तरी ही लोकं आता थांबणार नाहीत, हे नक्की.. ही अमानुष रीत समूळ नष्ट करण्यात देव त्यांच्या प्रयत्नांना यश देवो, हीच प्रार्थना…

ह्या विषयावर कविता लिहायचं आव्हान पेलणे खूप अवघड गेले, मी एक स्फुट लिहायचा प्रयत्न केला, ते पुढे मांडते आहे…

 

लग्नाला नक्की या हं…

आणि हो, आहेर अजिबात स्वीकारला जाणार नाही…

तुमचे शुभाशीर्वाद हाच मोठा आहेर…

 

हे माझ्याही लग्न पत्रिकेवर छापलेलं पाहून थोडासा दिलासा मिळाला…

 

आई बाबांना हे पटवून देणं खरंच कठीण गेलं की

भेटवस्तूंची प्रथा मोडून

सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज कशी जास्त आहे… !

 

प्रत्येक वस्तू खरेदी करताना

तिचा योग्य वापर, फायदे, नुकसान

ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि गॅरंटी / वॉरंटी,

ह्याची खातरजमा झाली की,

ती वस्तू खरेदी होते, हो ना !

 

आई, थोड्याच दिवसात ह्या लग्नाच्या दुकानात तू प्रेमाने, वात्सल्याने वाढवलेल्या,

ह्या संस्कारित मांसाच्या गोळ्याची अवस्था होणार आहे…

रुखवतात मांडलेल्या अनेक वस्तूंप्रमाणे माझी स्थिती होईल…

पीस खराब निघाला तर रिप्लेसमेंटही होईल कदाचित…

 

नाही म्हणजे स्वप्नरूपी माप ओलांडताना,

प्रेमाचे, लाडाचे, कौतुकाचे शब्द,

दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यावर,

बहरू पाहणाऱ्या नात्याला नजर लागू नये म्हणून,

रक्ताच्या टिक्याने सुरक्षित करून,

आनंदाने स्वीकारतील, ही गॅरंटी मिळवण्यासाठी,

सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे…

 

तेव्हा,

लग्नाला नक्की या हं…

आणि हो, आहेर अजिबात स्वीकारला जाणार नाही…

तुमचे शुभाशीर्वाद हाच मोठा आहेर…

 

© आरुशी अद्वैत

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments