सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मीप्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- ११ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

‘भीषण सुंदर’ सुंदरी आणि चंद्रमुखी??

दुसऱ्या दिवशी सकाळी कॅम्पच्या शेजारी असलेलं म्युझियम पाहिलं. त्यात वाघ, इतर वन्य प्राणी, मगरी, पक्षी, फुलपाखरं, वेगवेगळ्या जातीची तिवरं, त्यांचे उपयोग असं दाखवलं होतं. तिथून खाली दिसणार्‍या मोठ्या तळ्यात मगर पार्क केलं होतं .सुंदरबनच्या बेटसमूहांचा मोठा कॉ॑क्रीटमधला नकाशा फुलापानांनी सजलेल्या बागेत होता. आज सुंदरबनातून परतीचा प्रवास होता. येताना काळोखात न दिसलेली अनेक राहती हिरवी बेटं, त्यावरील कौलारु घरं, शाळा,नारळी- केळीच्या बागा आणि भातशेतीच्या कामात गढलेली माणसं दिसत होती.  खाडीचं खारं पाणी आत येऊ नये म्हणून प्रत्येक गावाला उंच बंधारे बांधले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात हॅमिल्टन नावाच्या गोऱ्या साहेबानं गोसाबा या बेटावर स्थानिकांनी तिथे रहावं म्हणून शेतीवाडी, शिक्षण, हॉस्पिटल, रस्ते या कामात मदत केली. तो स्वतःही तिथे रहात होता. या बेटावरील त्याचा जुना, पडका बंगलाही पाहायला मिळाला. रवींद्रनाथ ठाकूर यांनी दोन दिवस वास्तव्य केलेली, छान ठेवलेली एक बंगलीही होती. गोसाबा बेटावरचे हे गाव चांगलं मोठं, नांदतं होतं. तिथलं पॉवर हाउस म्हणजे जंगली लाकडाचे मोठे ठोकळे वापरून, मोठ्या भट्टीत बॉयलरवर पाणी उकळवतात व त्यापासून औष्णिक वीज तयार केली जाते. त्यातून त्या गावाची विजेची गरज भागते.

जिम कार्बेट, कान्हा, काझीरंगा, रणथंबोर, थेकडी, सुंदरबन अशा अनेक अरण्यांना  भेटी देऊन झाल्या पण वाघाची व आमची दृष्टभेट नाही. आम्हाला फक्त हरीणे, पक्षी, हत्ती, रानम्हशी वगैरेंचं दर्शन झालं. सुंदरबन कॅ॑पमध्ये रात्री आम्हाला एका मोठ्या हॉलमध्ये वाघावरची फिल्म दाखवली. तिथे अजून २७६ वाघ आहेत. परंपरागत मासेमारीसाठी, मध व औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी स्थानिक लोक जीव धोक्यात घालून या वनात खोलवर जातात. लांबट होडीतून सात-आठ जण एकत्र जातात. त्यांच्या चेहऱ्याच्या मागच्या बाजूला माणसाचा मुखवटा वाघाची फसगत करण्यासाठी बांधलेला असतो. अजूनही दरवर्षी चाळीस- पन्नास माणसं वाघाचे भक्ष होतात. कधी सरपण गोळा करायला गेलेली मुलं, म्हातारी माणसं तर कधी मासेमारीसाठी गेलेले कोळी. भक्षावर झेपावणारं ते सळसळतं, सोनेरी ‘भीषण सौंदर्य’ पडद्यावर पाहतानासुद्धा थरथरायला होत होतं! चित्रफितीच्या शेवटी एका लांबट, मजबुत होडीतून सात- आठ जण दहा- पंधरा दिवसांनी मासेमारी करून, जंगल संपत्ती घेऊन घरी परत येत आहेत असं दाखवलं होतं. होडीच्या स्वागतासाठी किनार्‍यावर त्यांचे सारे कुटुंबीय हजर होते. घरधनी सुखरूप परत आल्याचं पाहून एका सावळ्या, गोल चेहऱ्याच्या, टपोऱ्या डोळ्यांच्या, गोल मोठं कुंकू आणि भांगात सिंदूर भरलेल्या ‘चंद्रमुखी’च्या चेहराभर हसू पसरलं. इतकं आंतरिक समाधानाचं, निर्व्याज, मनापासूनचं हसू खूप खूप दिसांनी बघायला मिळालं.

सुंदरबन समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments