सुश्री अरूणा मुल्हेरकर

?विविधा ?

☆ कै रामदास कामत – भावांजली ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

कै रामदास कामत

(18 फेब्रुअरी 1931 – 8 जानेवारी 2022)

नुकतेच ८जानेवारी २०२२ रोजी आघाडीचे गायक,संगीत शिक्षक आणि नाट्य अभिनेते माननीय रामदास कामत यांच्या निधनाची दुःखद वार्ता आपल्याला मिळाली.एक बुलंद दमदार आवाज अस्तंगत पावला. रामदास कामत म्हटले की आठवते ते त्यांचे देवाघरचे ज्ञात कुणाला हे मत्स्यगंधा नाटकातले पद! अभिषेकी बुवांचे संगीत आणि रामदास कामतांचा स्वर.अगदी मणी कांचन योग…! मत्स्यगंधातील नको विसरू संकेत मीलनाचा हे पदही त्यांनी अजरामर करून ठेवले आहे. ह्याच बरोबर चिरंजीव राहो जगी नाम, नाटक ~ धन्य ते गायनी कळा, तम निशेचा सरला आणि प्रेम वरदानही ययाती आणि देवयानी या नाटकांतील ही गाणी खास त्यांचीच आहेत.

नाट्यसंगीताखेरीज त्यांनी अनेक भक्तीगीते,भावगीते,स्तोत्रे गायिली आहेत.

१८ फेब्रुअरी १९३१ रोजी गोव्यातील साखळी या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड.त्यांचे वडील बंधूही गायक होते.तेच त्यांचे सुरवातीचे संगीत गुरू.पुढे यशवंतबुवा जोशी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही.

मुंबईत अर्थशास्राची पदवी घेतल्यानंतर नोकरी सांभाळून त्यांनी आकाशवाणीवर गाणे,जमेल तसे नाटकात काम करणे चालू ठेवले होते.

वयाच्या सातव्या वर्षी,१९३८ साली त्यांनी बेबंदशाही नाटकात बाल संभाजीचे काम केले होते,वास्तविक हे गद्य नाटक,परंतु त्यातही त्यांनी दोन पदे सादर केली होती.पुढे तर जवळ जवळ सगळ्याच संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत.

एकच प्याला~रामलाल

मानापमान~धैर्यधर

मृच्छकटिक~चारूदत्त

सौभद्र~अर्जून,कृष्ण,नारद.

मात्र मत्स्यगंधापराशर,धन्य तू गायनी कळातानसेन,मदनाची मंजिरीसारंगधर, व ययाती आणि देवयानीकच या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

२००९ मध्ये बीड येथे झालेल्या ८९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.तसेच २००८च्या विष्णुदास भावे पुरस्काराचे ते मानकरी ठरले.

एका थोर कलावंताला आज आपण पारखे झालो आहोत.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच माझी त्यांना भावंजली!

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments