☆ विविधा ☆कोरीगड ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

रविवार १७ मार्च २०१९ रोजी आम्ही कोरीगडचा ट्रेक ‘केला’ असे म्हणण्यापेक्षा तो ‘घडला’ असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. काही गोष्टी आपण करायच्या म्हणून ठरवतो पण त्या तशा न होता घडते काही भलतेच! इतिहासात आपल्याला अशी अनेक उदाहरणे सापडतील. असे म्हणतात की ख्रिस्तोफर कोलंबस खरे तर निघाला होता इण्डिज बेटांच्या आणि मसाले व्यापाराच्या शोधात पण अपघाताने पोहोचला अमेरिकाला. त्या दिवशी आमच्याही बाबतीत थोड्याफार फरकाने असाच प्रकार घडला होता. म्हणजे “जाना था जापान, पहुंच गये चीन। समझ गये ना?”  नसेल समजले तरी हरकत नाही, पुढील वर्णन वाचा म्हणजे “समझ में आयेगा”! JJ

मोहन बरोबर पहाटे ५:४५ वाजता माझ्या घरी कार घेऊन पोहोचला. तिथून आम्ही हायवे ने पोहोचलो म्हाळुंगे गावात संदीपला घ्यायला. मोहन दातार, संदीप पाटील आणि मी असा आम्हा त्रिकुटाचा बेत होता ‘घनगड’ चा ट्रेक करण्याचा. म्हाळुंगेहून एका भलत्याच खडबडीत रस्त्याने नांदे-चंदे गावातून घोटावडे फाट्याला पोहोचलो. तेथून पुढे पौड-कोळवण रोड ने हाडशीला पोहोचलो. तिथे आम्हाला एक हिरवी मारुती जिप्सी पुढून येताना दिसली ज्यामध्ये विक्रम गोखले गाडी चालवताना दिसले. कदाचित ‘गिरीवन’ मधून परत येत असावेत. असो. तिथून तुंगा-तिकोना ह्या दोन गडांच्या मार्गाने पुढे निघालो. काही परदेशी पाहुणे सकाळसकाळी तुंगी गावाच्या त्या जंगलात जॉगिंग करताना दिसले. तुंगच्या बाजूने पुढे गेल्यावर असे लक्षात येत गेले की आम्ही मार्ग कुठे तरी चुकतोय. मग वाटेत एक-दोन जणांना घनगडाचा मार्ग विचारला तर त्यांनी “सरळ जात रहा!” असे सांगितले. एका फाट्याला डावीकडे वळलो तर पुढे ‘अम्बी व्हॅली क्लब’चे गेट लागले पण तिथे गेट असल्याने मार्ग बंद झाला. मग पुन्हा उलटे फिरून  फाट्यापाशी आलो व उजवीकडे वळून निघालो. वाटेत आम्हाला चार-पाच Harle Davidson मोटरसायकलस्वार प्रचंड वेगाने आडवे गेले तेव्हा हळूहळू लक्षात आले की आम्ही लोणावळ्या कडे निघालो आहोत. वाटेत एकाला विचारले तर तो म्हणाला “घनगड कुठाय माहीत नाही. पण तुम्हाला ‘कोरीगड’ ला जायचे का? इथून सरळ गेलात तर पेठ शहापूर गाव लागेल तिथे ‘कोरीगड’ दिसेल. आम्ही तिघांनी तसाही ‘कोरीगड’ पहिला नव्हताच. मग सरळ तिकडेच ट्रेक करायचा तडकाफडकी निर्णय घेतला. सरतेशेवटी कोरीगड दिसला. गडाच्या पायथ्याशी कार लावून आम्ही चौकशी केली तेव्हा कळाले की घनगड तिथून पुढे १६ किमी दूर आहे. असो. पण तो विषय आता संपला होता.

आता ’कोरीगडा’ कडे वळूयात… हा गड कोराईगड, शहागड (गडाची पेठ शहापूरला असल्याने)ह्या नावानेही ओळखला जातो. पायथ्याच्या गावाचे नाव ‘आंबवणे’ आहे. ह्या नावावरूनच त्याच्या भोवतीने सहारा ग्रुपने वसवलेल्या अतिश्रीमंतांच्या वसाहतीचे नाव ‘अंबी व्हॅली’ पडले आहे. त्याबद्दल अधिक माहिती पुढे…

प्रथमदर्शनी कोरीगडाचा आकार आकाशात तिरप्या गेलेल्या  सुळक्यांमुळे थोडा विचित्र दिसतो. पण माथ्यावर मात्र चांगलेच विस्तीर्ण पठार आहे. गड तसा खूप उंच नसला तरी रेखीव तटबंदीने मढवलेला आहे. आंबवणे गावातून चढण्याची वाट जरा जिकिरीची आहे पण मुख्य वाटेने चढल्यास पाऊणेक तासात सहज चढाई होते. सुरुवातीलाच पुरातत्वखात्याने उभारलेला गडाचा इतिहास सांगणारा फलक आपले लक्ष वेधून घेतो. पुढील वाट एका घळीतून आणि नंतर जंगलातून जाते. वळसा घालून गेल्यावर एक छोटी सपाटी लागते.

निम्या वाटेच्या वरपासून तर पायर्‍याही बांधल्या आहेत.  उजवीकडे एक प्राचीन गुहा आणि गणपतीची मूर्ती दिसते.

वरती पोहोचल्यावर गणेश दरवाजा लागतो आणि मग तुम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचता.

सभोवतालचा परिसर एकदम विलोभनीय दिसला, पावसाळ्यात गेले तर खरेच हिरवेगार दृष्य पाहायला मिळेल, हे नक्की. आम्ही गडाच्या उजव्या तटबंदीवरून चालायला सुरुवात केली तेव्हा तटबंदीची डागडुज्जी करण्याचे व चिरे बसवण्याचे काम चालू पाहून सुखद धक्का बसला.

गडाच्या मध्यावर श्रीकोराईदेवीचे ना छत, ना भिंती असे प्राचीन पण उजाड अवस्थेतील मंदीर आहे. दोन मोठी पाण्याची तळीही दिसली. एका तळ्याजवळ दगडांच्या ढिगार्‍यामध्ये एक भग्न मूर्ती पाहून वाईट वाटले. मंदिराचा गुरव आमची चाहूल घेऊन बाहेर आला व गडावर काय पाहण्यासारखे आहे त्याची माहिती दिली. गडावरील भगवे निशाण असलेल्या बुरूजावरून पहिले तर खूप मोठा टापू नजरेस दिसला. समोर तिकोना, मोरगड, तोरणा ओळखता आले.

पुढे वळसा घालून आंबवणे गावाच्या बाजूच्या तटबंदीवरून खाली पहिले तर दोन भग्नावस्थेतील दरवाजे एकाखाली एक असे दिसले पण तिथे उतरण्याची वाट मात्र दगड कोसळून बंद झाल्यासारखी दिसली. त्याखालील वाट मात्र घनदाट जंगलात हरवलेली दिसली. महितगाराच्या मदतीशिवाय उतरणे अवघड वाटले.

त्याच तटबंदीवर एक तोफही उत्तम स्थितीत दिसली. येथपर्यंत चालून आम्हाला कडाडून भुका लागल्या असल्याने तिथेच एका झाडाच्या सावलीत बसून डब्यांवर मनसोक्त ताव मारला.

आमच्या बसल्या जागेवरून ‘अंबी व्हॅली’चा देखावा खूप छान दिसत होता. आता हयाविषयी थोडे…

सहारा ग्रुप ने विकसीत केलेल्या ह्या छोटेखानी नगरामध्ये मुंबईतील आणि देशभरातील बडेबडे उद्योगपती, सिने-नटनट्या, क्रिकेटपटू अशा घनाढ्याची आलिशान रो-हाऊसेस आहेत. त्याची खाजगी विमानाने येण्याजाण्याची सोय व्हावी म्हणून खास धावपट्टी बांधली आहे. आतमध्ये युरोप-अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते बनवले आहेत. पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या बांधल्या असून, जलशुध्दीकरण केंद्रही उभारले आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याला बांध घालून पाण्यावर तरंगते रेस्टॉरंट उभारले आहे. बोटिंगची सोय केली आहे. आम्हाला पूर्वी आडवी गेलेली मोटरसायकलस्वार मंडळी विमानाच्या धावपट्टीवरून एका टोकाकडून दुसरीकडे गाड्या उडवीत फिरताना दिसली. एम्ब्युलंस धावपट्टीच्या बाजूने फेर्‍या मारीत होती. तिथून कोणीतरी एरोमोडेलिंगची पांढरी लांब पंख असलेली विमाने अतिशय कौशल्याने उडवीत हवाई प्रात्यक्षिके करीत होते.

‘शिवलिंग’ पॉइंट

प्रदक्षिणा पूर्ण करून 3:30 च्या सुमारास आम्ही गड उतरायला प्रारंभ केला व पाऊणेक तासात उतरून आलो सुद्धा! खाली एक सरबत विक्रेता आणि त्याची बायको भेटले. लिंबू सरबत पिता-पिता त्यांच्या कडे मी सहज चौकशी केली. त्यांना विचारले की “इथे सचिन तेंडुलकरचा बंगला आहे का? इतर कोणकोण फेमस लोकांना आलेले पाहिले आहे?” तेव्हा काही धक्कादायक माहिती त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली…. नवराबायको म्हणाले, “अहो इथे येक-दोन दिवसापुरते कोण येते अन् कोण जाते आम्हाला काही कल्पना नाही. एकतर विमानाने येतात, परस्पर विमानाने जातात. कारने आले तरी बंद काचेआड कोण बसलेले असते आम्हाला पत्याच लागत नाही. शिवाय खाजगी मालमत्ता असल्याने आम्हा स्थानिक ग्रामस्थांना आत प्रवेशच देत नाहीत. पूर्वी धुण्याभांड्याची, साफसफाईची कामे तरी मिळायची आता कोर्टाच्या आदेशाने मालमत्ता खरेदी-विक्री बंद आहे. इतकेच नव्हे तर पूर्वी केलेल्या 8-10 महिन्यांच्या कामाचे आमचे पैसेही मालकांनी बुडवले आहेत. स्थानिकांना रोजगार देत नाहीत पण मुंबई वरून बिहारी कामगारांना आणून त्यांना मात्र कामे देतात. तुम्ही सांगा हे योग्य आहे का?” कसे तरी बोलून मी आपलं त्यांचे सांत्वन केले व माहितीबद्दल आभार मानून निघालो.

परतीचा प्रवास आता लोणावळा मार्गे करायचा हे ठरवून मोहनने गाडी गियरमध्ये टाकली. परतीच्या मार्गावर ‘शिवलिंग’ पॉइंट लागला. तिथे विक्रेत्यांनी छोटीशी चौपाटी वसवलेली होती. थोडा वेळ तिथे फोटो काढून पुण्याच्या दिशेने कूच केले ते आयएनएस शिवाजीच्या बाजूबाजूने लोणावळामार्गे थेट घर येईपर्यंत विनाथांबा आलो.

एकंदरीत कोरीगडाची आमची आकस्मिक भेट श्रीकोराई मातेच्या कृपेने आनंदात पार पडली. “कोरीगड झाला, पण घनगड राहीला…” ही सल मात्र मनात बोचत आहे. आमची घनगड भेटीची पाटी अजून तरी कोरीच आहे. त्यावर “श्री गणेश” कधी लिहिला जाणार ते आता श्री गजाननाच्या घन-कृपेवरच अवलंबून आहे!

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments