श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? तो असा, ती तशी ! ?

“जागा आहेस, का नुसताच लोळत पडलायस ?” हे थोडं दरडावणीच्या सुरात, आपल्या कानावर आपण लहान असतांना आईकडून आणि मोठेपणी (आपापल्या) बायकोकडून ऐकण्याचे अनेक प्रसंग आपल्यावर आत्ता पर्यंत नक्कीच आले असणार ! कारण झोपेतून जागे झाले तरी, 99.9% पुरुषांना लोळत पडून रहायची सवय असतेच असते, मग तो कामाचा दिवस असो वा सुट्टीचा ! ही टक्केवारी, मी एखाद्या साबणाच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे, रोग जंतूचा नाश करण्याच्या त्याच्या क्षमते इतकीच घेतली आहे, हे माझ्या सारख्या चाणाक्ष नवऱ्यांनी लगेच ओळखलं असेलच ! आता हे साबणाचे उदाहरण देण्या मागे सुद्धा माझे स्वतःचे असे एक सबळ कारण आहे, जे तुम्हाला पण 100% पटेल ! आपण जागे झालोय आणि नुसतेच लोळत पडलोय हे नंतर बायकोने ओळखल्यावर, ती आपल्या मागे भुणभुण करून आपल्याला सुद्धा तिच्या मागोमाग उठायला भाग पाडून, तेव्हढयावरच ती थांबली, तर ती अर्धांगिनी कसली ?  तिला असं वाटत असतं की, आपल्या नवऱ्याने पण, भूतां सारखे लोळत पडण्यापेक्षा, लगेच उठून आपल्या सारखेच लगेच सुचीरभूत व्हावे ! आता भूतं जाग आल्यावर अशीच लोळत (का झाडावर लटकत?) पडतात, हे तिला कसं कळलं का तिला कोणी (तिची आई?) तसं सांगितलं, हा एक झोप न घेता करायचा संशोधनाचा विषय ठरू शकतो ! या माझ्या विधानाशी, माझ्या सारखे 100% आळशी नवरे, सहमत होऊन भली मोठी जांभई देत, परत आपल्या डोक्यावरून पांघरूण घेऊन गादीला जवळ करतील, याची मला 100% नाही तर 101% खात्री आहे ! आणि या उप्पर जरी नवऱ्याने तिला प्रेमाने (का स्वार्थापोटी ?) म्हटलं “झोप की जरा, आज सुट्टी तर आहे !” तरी 100% बायका, ते जणू ऐकलंच नाही असं भासवत, ते अजिबात मनावर न घेता, लगेच आपल्या रोजच्या कामाला स्वतःला जुंपुन घेतात, हे तमाम नवरे मंडळी मान्य करतील !

असं जाग आल्यावर लोळत पडणं वगैरे बायकांना झेपत नाही, का त्यांना ते जमत नाही, का त्यांची मानसिक घडणंच तशी असते, हे त्या निद्रादेवीलाच माहित ! त्या जाग आल्या आल्या लगेच, कुणीतरी आपल्या पाठीमागे अदृश्यपणे छडी घेऊन उभा आहे या भीतीने, रोजच्याच अंगावळणी पडलेल्या कामाला, वाघ मागे लागल्यागत सुरवात करतात ! तो अदृश्य छडीधारी कोण असेल, याचा मी अनेक वेळा माझ्या (बायकोच्या म्हणण्या नुसार) अल्पमती प्रमाणे शोधायचा अनेक वेळा विफल प्रयत्न केला, पण तो करता करता कित्येक वेळा परत  झोपेच्या अधीन कधी झालो, हे माझंच मला कळलं नाही ! शेवटी मी तो नाद सोडून दिला आणि माझ्या मनाची मीच अशी समजूत करून घेतली की, सकाळी उठल्या उठल्या रोजच्या कामाचा तोच तोच व्यायाम केल्याशिवाय, तमाम बायकांना त्यांचा दिवस सुरू झालाय असं वाटतच नाही ! असो !

आता या अशा पेच प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याचा विचार करता करता मला, थोरा मोठ्यांनी जे काही मोठ्या मनाने म्हणून ठेवलं आहे, त्याची आठवण झाली ! जसं, ऐकावे जनाचे (बायकोचे) करावे मनाचे ! म्हणजे तुमच्या लक्षात मतितार्थ आला असेलच, की आपल्याला देवाने जे दोन कान दिले आहेत, त्याचा योग्य वापर करून, म्हणजेच एका कानाने बायकोचे ऐकून, तेच दुसऱ्या कानाने सोडून, डोक्यावर पांघरूण घेवून मस्त ताणून देणे !

निद्रादेवीचा विजय असो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
हेमंत

शुचिर्भूत

मस्त आहे नर्मविनोदी लेख