श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ९९ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- “सोs टुमारो विल बी द लास्ट डे ऑफ युवर सर्विस लाइफ. विश यू ऑल द बेस्ट… “
“थँक्यू व्हेरी मच सर. थँक्स फॉर एव्हरीथिंग” माझा आवाज भरून आला होता.
माझा अनोखा भविष्यकाळ खऱ्या अर्थाने कृतार्थ करण्यासाठी माझ्या संपूर्ण आयुष्याला अतिशय रेखीव अशी सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक नवी पहाटच ठरली होती!
आज पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळ पर्यंतचे हे असे सगळेच क्षण माझ्या मनात आपसूकच अलगद जपले गेलेयत! )
वखरेसाहेबांच्या केबिनमधून बाहेर येताना अनेक संमिश्र भावनांनी माझ्या मनात गर्दी केलेली होती. स्वतःच्याच केबिनमधे प्रवेश करतानाही या वास्तूच्या निरोपाचे क्षण हाकेच्या अंतरावर उभे असल्याच्या जाणिवेने माझं मन हळवं होऊन गेलं. अहमदनगर आणि अकोला इथल्या माझ्या अनपेक्षित बदल्या, तिथला माझा कसोटी पहाणारा कार्यकाळ आणि आजचा हा माझ्या उर्वरित आयुष्याची पुढची वाटचाल अतिशय सुकर करणारा अगदी आत्ता आत्तापर्यंत अनिश्चिततेच्या भोवऱ्यात भिरभिरत राहिलेला अनपेक्षित क्षण… सगळं स्वप्नवतच वाटत राहिलं!
आता उद्या आपला इथला अखेरचा दिवस. उद्याची मस्टरवरची आपली सही आणि दिवसभराची उपस्थिती हा केवळ एक उपचार होता. कारण या नोकरीच्या संदर्भातल्या सर्वच जबाबदाऱ्यांतून मी मनाने त्या क्षणीच मोकळा झालो होतो!!
अगदी कांही दिवसांपूर्वी या अशा क्षणाची मी कल्पनाही नव्हती केली. रोज बँकेतून बाहेर पडताना मनात दुसऱ्या दिवशी करण्याच्या अनेक कामांची व्यवधानं असायची. शरीर थकून गेलेलं असायचं. अतिशय वेगानं सातत्याने सुरू असलेलं तीस वर्षांपासूनचं हे चक्र अचानक दहा वर्षं आधीच असं थांबणार होतं आणि सोबत माझी जगण्याची उमेद वाढवणारं, मला मनापासून आनंद वाटेल असं कांहीही करण्याचं स्वातंत्र मला देणारं, दहा वर्षांचं आयुष्य बोनस म्हणून मिळणार होतं! हे असं सगळं उदार हस्ते माझ्या हवाली करताना जणू ‘तो’ मला ‘देता घेशील किती दोन करांने? ‘ असं विचारतोय असंच मला वाटत राहिलं. आज पंचवीस वर्षांनंतर त्या क्षणाकडे मागे वळून बघताना मला जाणवतं ते हेच कीं अट्टाहासाने, जीवाच्या कराराने कांही न करताही मला प्रत्येकवेळी जे हवं असायचं ते मी न मागता ‘तो’च देत आलाय. ‘तो’ सतत होताच माझ्याबरोबर. आणि मी मनापासून अगदी असोशीने समोर आलेल्या क्षणांना प्रेमाने हात लावताच त्या क्षणांचं सोनं झाल्याचा अलौकिक आनंद मला मिळत गेलाय.
या निवृत्तीनंतरच्या वाटचालीत ‘त्या’ने मला अतिशय मोलाचं असं बरंच कांही दिलंय. माझ्या लेखनाच्या बाबतीत बोलायचं तर त्या संदर्भात मनाच्या तळाशी सुप्तावस्थेत पडून राहिलेल्या माझ्या एका अव्यक्त इच्छेबद्दल मी आवर्जून सांगेन.
तोवरच्या पन्नाशीपर्यंतच्या माझ्या वाटचालीत मी माझ्या अगदी बालपणापासूनची लेखनाची आवड कथालेखनाच्या रुपाने प्रयत्नपूर्वक जपली असली तरी मला मनापासून आवडायचं ते नाटकच. तरीही कां कुणास ठाऊक पण नाट्यलेखन हे कथालेखनापेक्षा एक वेगळंच तंत्र आहे असंच मला वाटायचं आणि या धकाधकीच्या आयुष्यांत आपल्याला ते जमणं शक्यच नाही हे स्वीकारून मी आवडीने आणि सातत्याने आवर्जून नाटके पहात माझ्या मनातली दुधाची तहान ताकावर भागवत राहिलो होतो. हे ओळखून असल्यासारखं माझ्या मनात अव्यक्तपणे पडून राहिलेली नाट्यलेखनाची ती अतृप्त इच्छा पूर्ण व्हायचा योग माझ्या ध्यानीमनी नसताना अचानक एक दिवस ‘त्या’नेच जुळवून आणला. प्रसिद्ध नाटककार श्री. सुरेश खरे सरांनी २००५साली सांगलीत घेतलेल्या तीन दिवसीय नाट्यलेखन शिबीराचं निमित्त झालं. मी अंत:प्रेरणेने ते अॅटेण्ट केलं. खरेसरांशी ओळख झाली. त्या शिबिरातून सातारा, सांगली आणि कोल्हापूर या विभागातून सरांनी माझी ‘उदयोन्मुख नाटककार’ म्हणून निवड केली. आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतानाच संपूर्ण दोन अंकी नाटक लिहिण्यासाठी आवश्यक असा आत्मविश्वासही दिला. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार मी वृद्धांच्या प्रश्नावरचे माझे ‘शेवटचे घरटे माझे’ हे पहिले नाटक लिहून पूर्ण केले, ‘नाट्यमंदार’ या व्यावसायिक नाट्यसंस्थेतर्फे त्याचे व्यावसायिक रंगभूमीवर शतकमहोत्सवी प्रयोगही झाले आणि नाट्यक्षेत्रात मला नवीन ओळख मिळाली! हे सगळं इतक्या सहज आणि झटपट घडत गेलं कीं आजही मला ते एखाद्या सुखद स्वप्नासारखंच वाटतं आणि म्हणूनच वास्तवातलं हे स्वप्न मला ‘त्या’नेच घडवलेला एक चमत्कारच वाटू लागतो! ‘त्या’नेच दिलेल्या सद्बुद्धीनुसार प्रसिद्धीच्या मागे लागून पैसे कमावण्याचा हव्यास न धरता, मी सांगलीत राहूनच हौशी रंगमंचासाठी सातत्याने नाट्यलेखन करू लागलो. यातून मिळत गेलेलं यश, नावलौकिक, जोडली गेलेली माणसे, नवनिर्मितीचं निखळ समाधान आणि बरंच कांही…! पैशात ज्याचं मोल होऊच शकणार नाही असं हे सगळं स्वप्नपूर्तीच्या आनंदासोबतच मला मिळत आलंय, जे ‘त्या’च्याकडूनच प्राप्त झालेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या वरदानाअभावी कधीच शक्य नसतं झालं.
आयुष्य म्हणजे सुखांबरोबर दु:खंही आलीच. मीही त्याला अपवाद कसा असेन? म्हणूनच कदाचित स्वेच्छानिवृत्तीनंतर मोकळा श्वास घेण्यापूर्वीच मला अल्पकाळातच एका मागोमाग एक सामोरं जावं लागलेल्या अनेक दुःखद प्रसंगांच्या आठवणी माझ्या मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात साठून राहिल्या आहेत!
या आठवणींमधले माझ्या स्वेच्छानिवृत्ती नंतर लगेचच्या पहिल्या एकदोन वर्षातच माझ्या आईला अनपेक्षितपणे आलेला पॅरॅलिसीसचा अॅटॅक आणि आरतीच्या भावाचं झालेलं लंग्ज कॅन्सरचं निदान हे प्रसंग त्या दोघांच्याही सहनशीलतेचा अंत पहाणारेच जसे तसेच दोन्हीकडच्या कुटुंबीयांचीही कसोटी पहाणारे होते. प्रदीर्घ संघर्षानंतर झालेल्या त्यांच्या मृत्यूने तर आम्हा सर्वांनाच मुळापासून हादरवून टाकलं होते हे खरंच, पण या दरम्यानच्या प्रत्येक क्षणी त्या दोघांच्याही स्वास्थ, उपचार आणि शुश्रुषा यासाठी दोन्ही घरच्या सर्वांकरता मी व्यक्तीश: पूर्णवेळ उपलब्ध राहू शकत होतो ते केवळ न् केवळ नोकरीतल्या पूर्णवेळच्या व्यवधानातून मी मुक्त झालो होतो म्हणूनच. त्यानंतरच्या सासूसासऱ्यांच्या वृध्दापकाळात त्यांच्या यातनामय परस्वाधीनतेतही मी प्रत्यक्ष आणि मनानेही त्यांना भावनिक आधार आणि सोबत देऊ शकलो याचं समाधान स्वेच्छानिवृत्तीमळेच मला मिळू शकलं होतं. आपल्या आयुष्यांत घडणाऱ्या अशा सर्वच घटना-प्रसंगांमागचं अचूक नियोजन ‘त्या’च्याशिवाय दुसरं कुणाचं असू शकतं? आपण कुणाच्याच नैसर्गिक सुखदु:खाचं निवारण प्रत्येकवेळी करू शकतोच असं नाही आणि दरवेळी इच्छा असूनही मदतीचा हात आणि सोबतही देऊ शकू असंही नाही हे खरंच. आणि तरीही ‘रुग्णावस्थेतल्या या माझ्या माणसांना आपुलकीची सोबत आणि मदतीचा हात देण्यासाठी ‘त्या’ने माझी निवड केली होती’ या विचाराच्या स्पर्शाने माझ्या माणसांचा क्लेशकारक वियोगही समतोल मनाने स्वीकारण्याचं बळ मला मिळालं होतं ही ‘त्या’चीच तर देन होती!!
स्वेच्छानिवृत्ती नंतर नवनवीन गोष्टी नियोजनपूर्वक मनापासून शिकण्याचा आनंदही मला घेता आला. काॅलेज जाॅईन करून पूर्ण केलेला गार्डनिंगचा कोर्स, ‘टॅक्स कन्सल्टन्सी’ चा सर्टिफिकेट कोर्स, नाट्यलेखन सुरू झाल्यानंतर त्या संदर्भातील अभ्यासासाठी पूर्ण केलेले नाट्यशास्त्राचे सर्टीफिकेट आणि डिप्लोमा हे अभ्यासक्रम आणि असं बरंच कांही. या सगळ्याच परीक्षांमधे मिळालेल्या विशेष प्राविण्यापेक्षाही मला मिळालेली योग्य दिशा आणि अनुभव मला महत्त्वाचे वाटतात. जाणीवपूर्वक आनंदाने जगणं यापेक्षा वेगळं काय असतं? हे सगळ्याचा ‘दाता’ तोच तर आहे.
तरीही ‘त्या’चं अस्तित्व मानणं किंवा नाकारणं हा वैयक्तिक दृष्टीकोनाचा किंवा स्वातंत्र्याचा भाग आहे हेही मान्य करायलाच हवं.
माझ्यापुरतं सांगायचं तर ‘त्या’च्या अस्तित्वाबद्दलचा विश्वास माझ्या नकळत्या वयापासूनच अशा अनेक घटना-प्रसंगांमुळेच माझ्या मनात माझ्याही नकळत आपसूक रूजत असतानाच पुढेही प्रत्येक पावलावर तो अधिकाधिक दृढच होत गेलेला आहे. माझ्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यातही पुढे असंख्य प्रसंगांमधे मला तीव्रतेने अनुभवास आलेला ‘त्या’चा अलौकिक स्पर्श माझं जगणं अर्थपूर्ण करतो आहे. त्या प्रत्येक प्रसंगाबद्दल सविस्तर लिहिणं विस्तारभयास्तव मी टाळायचं ठरवलं तरी त्यातले दोन अलौकिक अनुभव मात्र प्रातिनिधिक म्हणून मला आवर्जून सांगावासे वाटतायत!
—–
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






