सुश्री उषा जनार्दन ढगे

?विविधा ?

☆ नको फक्त मोबाईल..संस्कारही हवेत ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

—आजच्या नवयुगातील तुमचा आमचा सर्वांचा घनिष्ठ सोबती म्हणजे स्वतःचा मोबाईल..त्याच्याशिवाय घरबसल्या आप्त-स्वकीयांशी संपर्क साधणें-जोडलेले रहाणें म्हणजे दुर्गम बाब झाली आहे…एकटे असतांना कधी रेंज नसली किंवा नेटवर्क नसले तर एकदम सगळ्यांशी संपर्क तुटल्यासारखा वाटतो व जीव घाबराघुबरा होतो..याचा अनुभव मलाही आलेला आहे…

प्रगत युगातील हे आधुनिक लहानसे यंत्र लाॅकडाऊनच्या काळात तसे खूपच उपयोगी पडले…सर्व व्यवहार ठप्प झालेले असतांना व्यवसाय नोकर्‍या इत्यादींचे वर्क फ्राॅम होम चालले होते…भाजीपाला,जरूरीच्या वस्तू, औषधे इ. सर्व मोबाईलवरून आॅनलाईन मागविल्याने घरपर्यंत पोहोचत होते..स्वकीयांशी संवाद साधता येऊन परिस्थितीचा अंदाज घेता येत होता..

या लाॅकडाऊनच्या काळात शाळा काॅलेजे ही बंद पडल्याने, शाळा-काॅलेज वर्ग आॅनलाईन screen वर असल्याने, मुलांची मोबाईलशी जास्तीत जास्त जवळीक झाली हे मात्र खरे..अजूनही अद्ययावत परिस्थितीमुळे म्हणावा तसा बदल झालेला नाहीय..

या मुलांचे शाळेत जाणें नाही,मित्र-मैत्रिणींशी भेटणें नाही,त्यांच्याशी खेळणे नाही,म्हणून त्यांची चिडचिड होणें स्वाभाविक आहे..परंतु गृहपाठ करण्याचा बहाणा  करून ही लहान मुले आईवडिलांचा मोबाईल घेतात व तासनतास त्यावर गेम खेळत बसतात..किंवा टी व्ही वर कार्टून्स बघत बसतात,वेळेचा अपव्यय करतात हे मात्र गैर आहे..अर्थात काहीजण यांस अपवाद असतील..

मोबाईल,काॅम्प्युटर,लॅपटाॅप,टी.व्ही. याचा वापर किती प्रमाणांत, किती मर्यादा राखून करायचा याची सवय सर्व थोरा-मोठ्यांना अंगवळणी पडलेली बरी…

—आभासी जगतापलिकडेही एक जग असते हे पहाण्याची दृष्टी मुलांना संस्कारातून मिळते..!

अभ्यासाव्यतिरिक्त मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करून घ्यावा याचा सुजाण व जागरुक पालकांनी मुलांना बोध करून द्यावा..हा वेळ त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी सार्थकी लावण्यात मुलांना सुयोग्य सहकार्य करावे..त्यांचा बहुमूल्य वेळ मोबाईलवर वाया घालविणे इष्ट नाही.. यासाठी पाल्यास दिवसभरातील कामाचे एक वेळापत्रक तयार करून द्यावे..त्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळात ठरलेली कामें करण्याची नियमित सवय लागून भविष्यात यश संपादन करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा होईल..यात शारिरीक व्यायाम,योगासने,अथर्वशीर्ष,अभंग-ओव्या पाठ करणें इ.चांगल्या सवयींचाही समावेश होतो..मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा,त्यांच्या आवडत्या छंदांना प्राधान्य द्यावे…जसे चित्रे काढणें,रंगविणें,गोष्टींची पुस्तके वाचणे,त्या गोष्टी दुसर्‍या मुलांना कथित करणें,शुध्दलेखन करणें,बुध्दीबळ खेळणें..टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणें,नृत्य संगीताची आवड असल्यास त्यांचा सराव करणें, एखादे वाद्य वाजविण्यास शिकणें वगैरे वगैरे..

बागकाम,शिवणकाम पाककला, हस्तकला लेखन हे मोठ्या मुलांसाठीचे पर्यायही आहेत..

तसेच,मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना ध्यानधारणा,चिंतन,मनन करण्याची सवय लावावी..अशाप्रकारचे संस्कार करून मुलांना लहान वयातच वेळेचे महत्व समजावून दिले तर त्यांच्याकडून कदापि वेळेचा अपव्यय होणार नाही..

वेळेच्या बाबतीत विल्यम पेन यांचे एक सुंदर वाक्य आहे..ते म्हणतात ” आपल्याकडे वेळेची कमतरता सर्वांत जास्त असते,असे असूनही आपण सर्वांत जास्त दुरुपयोग वेळेचाच करतो..”

वेळ हे जीवनातले असे नाणें आहे जे कसे आणि कुठे खर्च करायचे ते आपणच ठरवू शकतो..!

मुलांवर संस्कार करतांना किंवा संस्कारी मुले घडवीत असतांना,पालकत्व ही केवळ जन्मदात्या पालकांचीच नव्हे तर संपूर्ण कूटुंबाची जबाबदारी असते हेही इथे नमूद करावेसे वाटते..!

कर्तव्य पालकांचे

मुलांसी द्यावे संस्कार

हे संस्कारच देतील

त्यांच्या जीवनास आकार..!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Sumedha Kale

As always your write-ups are exclusive & give good base & ideas to handle various situations.