सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १२ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गाथेतून उमजणारी गीता (२)

सध्या आपण गाथेतून उमजणाऱ्या गीता तत्वाचे चिंतन करीत आहोत.

भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की “करणारा तू कोण? नियतकर्माचे पालन करून तू ते कर्म कृष्णार्पण कर. कर्ता करविता हा एक भगवंतच आहे. हेच गीतेतले तत्त्व तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून भक्त जनांना सांगत आहेत. ते म्हणतात, “माझ्या वाणीतून अभंगांच्या रूपात जे बाहेर येते, ते सर्व बोल पांडुरंगाचेच आहेत. बोलविता धनी तोची आहे.”

ते म्हणतात,

झाली माझी वैखरी/ विश्वंभरी व्यापक/

मोकलीने जावे बाणे/ भाता जेने वाहिला/

आता येथे कैचा तुका/ बोले सिक्का स्वामींचा/

हे जे काही शब्द माझ्या मुखावाटे बाहेर पडत आहेत, ते माझे नसून मी तर स्वामींचा शिक्का आहे. ते माझ्याकडून वदवून घेत आहेत. भात्यातून बाण जसे बाहेर पडतात, त्याचप्रमाणे माझ्या मुखावाटे शब्द बाहेर पडतात इतकेच!

पिडलेती भ्रमे/ वाटा नकळती वर्मी/

 तुका म्हणे भार/ माथा टाका अहंकार//

हरीच्या भेटीची आस लागलेल्या भक्तांना

तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या मनातील देहाच्या अहंकाराचा भार जेव्हा तुम्ही टाकाल, तेव्हाच तुम्हाला हरी भेटेल.

संत तुकारामांनी खालील अभंगात गीतेतून होणारा बोध भक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

काय दरा करील वन/ समाधान नाही जव/

(जोपर्यंत अंतःकरणात समाधान नाही, ते वासना शून्य झालेले नाही, तोपर्यंत रानात, गिरीकंदरात जाऊन तपश्चर्या करण्याचा काहीही उपयोग नाही.)

रीधता धावा पेवा मधी/ जोडे सिद्धी ते ठायी/

(धान्य काढण्याकरता पेवामध्ये घाईघाईने शिरले, तरी लगेच अन्न मिळेल का? )

काय भस्म करील राख/ अंतर पाख नाही तो/

(मुळात अंतकरण जर शुद्ध नसेल, तर अंगाला नुसती राख फासून काय उपयोग? )

वर्ण आश्रमाचे धर्म / जाती श्रम झालिया/

(वर्णाश्रम-धर्मानुसार विहित कर्म करण्याचा कंटाळा केला, तर ते कर्म वाया जाईल)

सर्व संतांना हेच सांगायचे आहे की कोणतेही कर्म उच्च किंवा नीच नसते. समाजाची घडी व्यवस्थित राहण्यासाठी खरंतर वर्णाश्रम धर्म रचना केली गेली. परंतु पुढे मात्र ब्राह्मण म्हणजे उच्च आणि शूद्र म्हणजे नीच अशी भावना लोकांच्या मनात विनाकारण निर्माण केली गेली.

गीतेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला कर्म संबंध विच्छेद या ठिकाणी तुकाराम महाराज साधकांना सांगत आहेत.

तेही नव्हे जे करिता काही/ ध्याता धाई तेही नव्हे/

तेही नव्हे जे जानवी जना/ वाटे मना तेही नव्हे/

त्रास मानिजे कांटाळा/ अशुभ वाचाळा तेही नव्हे/

तेही नव्हे जे भोवती भोववे/ नागवे धावे तेही नव्हे/

तुका म्हणे एकची आहे/ सहजी पाहे सहज/

 याचा अर्थ असा की, हे साधका तू जे काही करशील ती भक्ती नाही, कारण त्याचा कर्तेपणा तू तुझ्याकडे घेशील. ध्यान करणाऱ्याने मूर्ती समोर ठेवून जरी ध्यान केले, तरी ती भक्ती नाही, कारण त्यात तुझा अहंकार असेल. लोकांना परमार्थ समजावणे, मनाला जे वाटेल तीही भक्ती नव्हे. एकच तत्व महत्त्वाचे आहे, मुद्दाम ठरवून काहीही कर्म करण्याचा अभिमान स्वतःकडे न ठेवता तू जर सहजपणे पाहशील तर तीच खरी भक्ती होईल.

 हेच तत्व अधिक स्पष्ट करण्यासाठी तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगात काय सांगतात ते आपण पाहू.

 जे जे जेथे पावे/ तेथे समर्पावे सेवे/

 सहज पूजा याची नावे/ गणित अभिमान/

 अवघे भोगिता गोसावी/ आधी अवसानि जीवी/

 तुका म्हणे सीण /न धरिता नवे भिन्न//

 जीवाने जर मी करणारा आणि मी भोगणारा

 असा अभिमान बाळगला नाही तर भगवंताशी द्वैत राहत नाही.

 

 विचारा वाचून/ न पाविजे समाधान/

 देह त्रिगुणांचा बांधा/ माजी नाही गुण सुधा

 देवाचिये चाडे/ देवा द्यावे जेजे घडे/

 तुका म्हणे होते/ बहु गोमटे उचिते//

 या ठिकाणी विवेकाविषयी महाराज जनसामान्यांना सांगत आहेत. ज्या ठिकाणी विचार नसेल, विवेक नसेल, त्या ठिकाणी समाधान प्राप्त होणार नाही. प्रपंच असार आहे आणि आत्माच सार तत्व आहे, असा विवेक झाल्याशिवाय संतोष तेथे नाही. त्रिगुणात्मक अशा या शरीरात कोणताच गुण परिपूर्ण नाही. म्हणून आपण केलेले कर्म हे कोणत्याही गुणांनी(सत्व, रज, तम) युक्त असले तरी ते देवालाच अर्पण करणे आवश्यक आहे. गीतेत भगवान हेच सांगतात की पार्थ, सर्व कर्म तू मला अर्पण कर.

क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted