सुश्री अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
परमेश्वराशी तादात्म्यता-१
मागील भागात स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन लोकांनाही भवभया पासून मुक्त होण्यासाठी कसे सावध करीत होते हे आपण पाहिले. एकदा जीवनात निःसंगता आली की द्वैतभाव नष्ट होऊन परमेश्वराशी तादात्म्यता कशी येते याविषयी गाथेतील काही अभंग घेऊन आपण या भागात विवेचन करूया.
शरणागत भक्तांना तुकाराम महाराज काय सांगत आहेत?
ब्रह्मादीक जया लाभासी ठेंगणे/
बाळीये आम्ही भले शरणागत//१//
ते भक्तांविषयी आणि स्वतः विषयी बोलत आहेत. ब्रह्मादीकांना सुद्धा जो लाभ होऊ शकत नाही, ते त्यासाठी ठेंगणे, तोकडे पडतात तो लाभ देवाला शरण आलेल्या आम्हा भक्तांना अगदी सहज होतो. त्याचे कारण काय? तर
कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ/
झाला पद्मनाभ सेवाऋणी//२//
आम्ही कामना, वासनांचा त्याग केल्यामुळे आम्हाला भजनाचा लाभ झाला आहे आणि आमच्याकडून होणाऱ्या या सेवेसाठी प्रत्यक्ष विष्णू सुद्धा आमचा ऋणी झाला आहे.
परमेश्वराला प्रसन्न करण्याचे भजन हे फार प्रभावी साधन आहे.
कामधेनुच्या क्षीरा पार नाही/
इच्छितचिये वाही वरुसावे//३//
या ठिकाणी महाराजांनी कामधेनूचे रूपक वापरले आहे. कामधेनूचे दूध कधीही न आट णारे असते. या सर्व संत मंडळींची हरी म्हणजे कामधेनू आहे. जेवढ्या आमच्या हरिभक्तीचा जोर मोठा तेवढा या धेनूचा पान्हा सकस आणि सरस!
हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी/
नारायण अंगी विसावला//४//
आम्हाला बसल्या जागी परिपूर्णत्व आले आहे. आता आमच्या ठिकाणी ध्याता, ध्यान, आणि ध्येय असा भेद राहिला नाही. नारायण आमच्या अंगी विसावला आहे अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो आहोत.
शेवटी याच अभंगात महाराज सांगतात,
तुका करी जागा/ नको वासपू वाउगा/
आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//५//
प्रत्यक्ष भगवंत हृदयात स्थिर झाल्यामुळे, नारायणमय झाल्यामुळे आम्ही भक्तजन अत्या- नंदाच्या भोजनाचा आस्वाद घेत आहोत. वासनाक्षयामुळे आम्हाला पुनर्जन्म नाही. नारायण स्वरूपाशी तादात्म्यभाव हे या अवस्थेचे रूप आहे.
निजरूप विसरून तुकाराम महाराज झोपी गेलेल्याला जागे करतात. त्याला सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैतरूपी हरी तुला सापडेल कारण तू स्वतःच अंगाने तो आहेस, परमात्मा रूप आहेस. जेव्हा तू तुझी आत्मिकदृष्टी उघडून पाहशील तेव्हा तुला त्याचे ज्ञान होईल.
एकात्मतेचे दुसरे उदाहरण या अभंगातून पहा.
माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया/
अंग आणि छाया जया परी//
आपले शरीर आणि सावली ही जशी वेगळी नसतात, त्याचप्रमाणे माया आणि ब्रह्म या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. जरी या दोन वेगळ्या गोष्टी भासल्या तरी तत्वतः त्या एकच आहेत. छाया कोणत्याही शस्त्राने तुटत नाही. हाताने तिला दूर सारता येत नाही. जमिनीवर लोटांगण घातले तरी ती वेगळी न होता आपल्या अंगाखाली दिसेनाशी होते. आपण उंच झालो तर ती उंच होते, वाकलो तर ती आपल्याबरोबर लवते.
*
आता केशी राजा हेची विनवणी/
मस्तक चरणी ठेवीतसे//१//
*
देह असो माझा भलतीये ठाई/
चित्त तुझ्या पायी असो द्यावे//२//
*
काळाचे खंडण घडावे चिंतन/
तन मन धन विन्मुखता//३//
*
कफ वात पित्त देह अवसाने
ठेवावी वारुनी दुहिते ही//४//
*
सावध तो माझी इंद्रिय सकळ/
दिली एक वेळ हाक आधी//५//
*
तुका म्हणे तू या सकळाचा जनिता/
येथे ऐक्यता सकळांसी//६//
*
इथे परमेश्वराला उद्देशून महाराज म्हणतात,
“हे केशवा, तुझ्या पायांवर मस्तक ठेवून मी तुला विनंती करतो की, माझा देह कुठेही असो, पण चित्त मात्र तुझ्या ठिकाणीच असावे. देह, मन, द्रव्य याचा मोह नष्ट होऊन अखंड तुझ्याच चिंतनात माझा सर्व वेळ खर्च व्हावा. कफ, वात, पित्त या त्रिदोषांचे माझ्या अंतकाळी निवारण व्हावे. जोपर्यंत माझी सर्व इंद्रिये सावध आहेत तोपर्यंत मी तुम्हाला साद घालून वर्तमान परिस्थिती निवेदन करीत आहे. “
सामान्य जन मूढ आहेत, त्यांना परब्रम्ह स्वरूपात द्वैतभावना नाही हेच मुळी समजत नाही. त्यांना तारण्यासाठी भक्तीचे महात्म्य पटवून देणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज त्यांच्या मनातील हे विचार खालील अभंगात सांगत आहेत.
याजसाठी भक्ती/ जशी रुढवावया ख्याती/
नाही तरी कोठे दुजे/ आहे बोलावया सहजे/
गौरवावयासाठी/ स्वामी सेवेची कसोटी/
तुका म्हणे अळंकारा/ देवभक्त लोकी खरा//
लोकांमध्ये भक्तीचा गौरव होण्यासाठी स्वामी, सेवक आणि सेवेची कसोटी या गोष्टी येतात. लोकांमध्ये देव आणि भक्त यांचे वरवरचे द्वैत हे भूषण आहे, अलंकाराप्रमाणे आहे. या सगूण भावातूनच हळुहळू जनसामान्यात एकरूपता येते.
ईश्वराशी महाराजांची संपूर्ण तादात्म्य पावलेली अवस्था या अभंगात ते वर्णितात.
काहीच मी नव्हे कोणीये गावीचा/
मी कोणीच नाही. मला ना नाव ना गाव. जागच्या जागी असणारे जे एकमेव ब्रह्म आहे तेच मी आहे.
*नाही जात कोठे येत फिरोनिया/ मी कोठे जात नाही की मी परत येत नाही.
नाही मज कोणी आपले दुसरे/
कोणाचा मी खरे काही नव्हे//
मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही, माझ्यात आप-परभाव नाही.
नाही आम्हा जावे मरावे लागतं/
अहो अखंडित जैसे तैसे//
आम्ही जगत नाही की मरत नाही, कायम जसेच्या तसे राहतो.
तुका म्हणे नामरूप नाही आम्हा/
वेगळा या कर्मा-अकर्मासी//
आम्हाला रूप नाही, नाव नाही, कर्म-अकर्म यापासून आम्ही वेगळे आहोत.
परमेश्वराशी एकरुपता म्हणजे काय हे आपल्याला तुकारामांच्या या अवस्थेतून स्पष्ट होते.
क्रमशः… १४
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈






