शालिनी जोशी
विविधा
☆ मारिया मॉन्टेसरी ☆ शालिनी जोशी ☆
मारिया मॉन्टेसरी
मॉन्टेसरी म्हटलं की आपल्यासमोर येते पहिलीच्या आधीची शाळा. हे एका व्यक्तीचे, स्त्रीचे आडनाव आहे हे सहसा कुणाला माहीत नसतं. मारिया मॉन्टेसरी इटलीतील ॲलेस्सॅड्रो आणि रेनिल्देला या दाम्पत्याची मुलगी होती. जन्म ३१ ऑगस्ट १८७०. वडील सरकारी नोकरीत आणि आई घरकाम करणारी. असे हे सुखी मध्यमवर्गीय कुटुंब होते. त्या काळात स्त्री शिक्षणाला स्थान नव्हतं. तरीही मारियाला नवीन काही शिकवावं अशी इच्छा तिच्या आईची होती. मुलींच्या शिक्षणात शिवणकाम, विणकाम यावर भर असे. तेथे बुद्धिमत्तेला वाव नव्हता. मुला मुलींच्या शाळा वेगवेगळ्या असत. शिक्षक सांगतील ते ऐकायचं आणि पाठ करायचं. ही घोकंपट्टी मारियाला कंटाळवाणी वाटे. तिला सुरुवातीला गणितात गती होती. पण मुलींसाठी ते अनावश्यक अशी समाजाची समजूत होती. तरीही शेवटी आईच्या प्रोत्साहनाने ती वैद्यकशास्त्राकडे वळली.
उभ्या इटलीत कोण्या स्त्रीने या शास्त्राचा विचार केला नव्हता. वडिलांनाही पसंत नव्हतं. पण त्यानी विरोध केला नाही. अनेक जाचक चालीरीती सांभाळून मारियाने शिक्षणात प्रगती केली. उदाहरणार्थ वर्गातील सर्व मुलांनी आपापल्या जागेवर बसल्याशिवाय मारियाला वर्गात प्रवेश नव्हता. कारण पुरुषांना ओलांडून जाणं शिष्ट संमत नव्हतं. खोडसाळ मुलानी बसायला जागाच ठेवली नाही तर दोन तीन तास सुद्धा उभे राहावे लागे. पण मारीयाने जिद्द सोडली नाही. बालकांचा विशेष अभ्यास केला. तिच्या शेवटच्या वर्षीच्या भाषणाने सर्व भारावून गेले. मानसशास्त्राचा संशोधनात्मक प्रबंध सर्वमान्य झाला. तिला डॉक्टर पदवी बहाल करण्यात आली. इटलीतील पहिली महिला डॉक्टर ती ठरली. पुरुषांच्या साठी असलेल्या पदवी सर्टिफिकेट मध्ये खाडाखोड करून तिच्यासाठी सर्टिफिकेट तयार करावे लागले.
मारिया देखण्या होत्या. काळेभोर गनदाट केस, नीटनेटका पोशाख, वागण्यात मार्दव, आकर्षक व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता आणि धाडसी स्वभाव यामुळे मारिया रस्त्याने निघाली की लोकांच्या नजरा तिच्यावर खिळत. समाजाने तिला डॉक्टर म्हणून मान्यता दिली. स्त्रियांच्या हक्काविषयी त्यांची भाषणे उत्स्फूर्त असत. त्यामुळे वृत्तपत्रांचा कुतुहुलाचा विषय झाली. बालरोग तज्ञ म्हणून कीर्ती वाढू लागली.
मनोरुग्ण बालकांचे विशेष निरीक्षण त्यांनी केले. तेव्हा लक्षात आलं ही मुलं जेवण झाल्यावर जमिनीवर पडलेले अन्नकण शोधून खातात. यात त्यांचा खाणे हा हेतु नसून हाताने काही कृती करावी वाटते. ती मूर्ख नाहीत तर बुद्धीचा वापर करायची संधी त्यांना मिळत नव्हती. याशिवाय जंगलातील मुलगा, मुक व कर्णबधीर मुले, अविकसित मुले यावर त्यांनी विशेष अभ्यास केला. अशा मुलांसाठी वेगळी शिक्षण व्यवस्था असावी. नाहीतर ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहारी जातील. येथे शिक्षेचा उपयोग नाही. डॉक्टर आणि प्रशिक्षित शिक्षक हवेत. हा विचार लोकांना पटला. बालरोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मानवंशशास्त्र अभ्यासक, शिक्षणशास्त्र अभ्यासक अशी महिला डॉक्टर अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
स्त्रियांविषयी त्यांची मते स्पष्ट होती. स्त्रियांना दुय्यम ठरविण्याला त्यांचा विरोध होता. विवाह आणि मातृत्व स्त्रियांवरती लादू नये. ते त्यांनी स्वेच्छेने स्विकारावे. अतिरिक्त कामामुळे बायका अशक्त व कमकुवत होतात. त्यामुळे तशीच मुले जन्माला येतात. नव स्त्री ही शुद्ध सामाजिक पर्यावरण निर्माण करेल. तिथे युद्ध नसतील. गुन्हेगारी नसेल. न्यायव्यवस्थेची गरज पडणार नाही. असे त्या आर्जवून सांगत. दु:खाला तोंड देण्यासाठी धर्मादाय काम, अशी समाजाची धारणा बदलून दुःख निर्माण होणार नाही यासाठी विज्ञानाच्या साह्याने प्रतिबंधात्मक प्रयत्न व्हावे. रोग आजार दुरुस्त करण्यापेक्षा निर्माण होणार नाहीत असे प्रयत्न असावे. त्यामुळे समस्या निवारार्थ होणारा पैशाचा भार कमी होईल. असे त्यांचे ठाम मत होते. अशा प्रकारे स्त्रीवादी म्हणून इटलीत त्या ओळखल्या जाऊ लागल्या.
अक्षम, मतिमंद मुलेही योग्य शिक्षणाने सर्वसामान्य मुलांच्या शाळेत जाऊ शकतात. हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यासाठी योग्य शैक्षणिक साधने आणि मुलांच्या पातळीवर येऊन मुलांत दडलेल्या माणसाला शोधणारे शिक्षक हवेत. शिक्षक हा मार्गदर्शक असावा. साधने कशी वापरावी याचे स्वातंत्र्य मुलांना असावे. यासाठी निरनिराळ्या आकाराचे, रंगाचे ठोकळे व अक्षरे हवीत. कृतिशील शिक्षणावर त्यांनी भर दिला. मुलांच्या वर्तनाला, शिस्त व स्वच्छतेला त्यांनी महत्त्व दिले. शारीरिक व्यायामासाठी साधने तयार केली. गैरवर्तनाला शिक्षा म्हणजे गप्प बसायला लावणे. बेघर, झोपडपट्टीतील रोगराईग्रस्त कुपोषित मुलांसाठीही अशा शाळांचा चांगला परिणाम दिसून आला. पुढे हीच पद्धत सामान्य मुलांसाठी उपयोगात आली. सर्व साहित्याने युक्त शाळा आणि शिक्षकाची केवळ निरीक्षकाची भूमिका, अशीही स्वयंशिक्षण पद्धत क्रांतिकारी ठरली. खेळण्याच्या मुक्त आनंदातून प्रशिक्षण अशी ही डॉक्टर मॉन्टेसरी शिक्षण पद्धती एक चळवळ झाली. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, चीन, रशिया येथेही अशा शाळा निघाल्या. डॉक्टर मारियाने वैद्यकीय व्यवसाय बंद केला. सर्व देशात भेटी व व्याख्याने होऊ लागली. ‘मॉन्टेसरी मेथड’ नावाचे पुस्तक निघाले. प्रशिक्षण वर्ग व त्यातून मॉन्टेसरी महाविद्यालयही इटलीत निघालं.
भारतातही ॲनी बेझंट यांनी १९१४ मध्ये पहिली मॉन्टेसरी शाळा काढली. रवींद्रनाथ टागोर व डॉक्टर मारिया यांचा पत्र व्यवहार असे. महात्मा गांधींनी इंग्लंडला त्यांची भेट घेतली होती. गिजूभाई बघेका नावाचे वकील होते. त्यांनाही पद्धत जीवन दृष्टी वाटली. त्यांनी ताराबाई मोडक यांच्या मदतीने ही पद्धत गुजराथ, सौराष्ट्र मुंबई येथे वाढवली. त्यांच्या निमंत्रणाने डॉक्टर मारिया भारतात आल्या. येथे त्या सात वर्षे राहिल्या. सर्व देशात मान्यता मिळत असूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. १९४६ मध्ये त्या परत भारतात आल्या. ताराबाई मोडक यांनी बालशिक्षण नगर भरवले. त्या परिषदेच्या उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या. कमलाबाई काकोडकर, अनुताई वाघ यांनी या पद्धतीचा अवलंब केला. अजूनही ही पद्धत सुरू आहे. काळानुसार नवीन बदल झाले असतील.
अशा प्रकारे इटलीची मारिया कार्याच्या वैश्विकतेमुळे सर्व जगाची झाली. अशा या स्त्री शक्तीला सलाम! १९५२ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पण मॉन्टेसरी रूपाने अमर झाल्या.
© शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



