☆ विविधा ☆ माझं वेड…. ☆ सौ. मानसी काणे 

मी त्याच्यासाठी वेडी झाले होते,  वेडी आहे आणि राहीन. त्याला मी प्रथम पाहिल तेंव्हा तो मुक्या माणसाच्या भूमिकेत होता पण त्याचे डोळे माझ्याशी बोलले. मग ‘‘देखा न हाय रे सोचा न हाय रे’’अस म्हणत आपले उंचच उंच पाय त्यान नाचवले आणि त्याचा खट्याळपणा मला फार भावला. मग वेगवेगळ्या रुपात ‘‘विजय’’या एकाच नावान तो मला सतत भेटत राहिला. डोळ्यात अंगार पेटवून त्वेषान ‘‘है कोई माईका लाल ’’अस त्यान विचारताच माझही रक्त उसळल.‘‘ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बापका घर नहीं’ ’अस म्हणत त्यानं खूर्ची उलटवून टाकली तेंव्हा त्याची तडफ पाहून मी सुखावले.‘‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’’ अस त्यान ठणकावल तेंव्हा त्याचा स्वाभिमान पाहून मी भारावले.आपल्या हातावर गोंदलेल्या ‘‘मेरा बाप चोर है’’या गोंदणाकड त्यान करूण नजरेन पाहिल तेंव्हा माझा गळा दाटून आला.‘‘मैं बहुत थक गया हूं माँ’’अस म्हणून त्यान आईच्या मांडीवर हताशपणे डोक टेकवल तेंव्हा माझाही शक्तीपात झाल्यासारख वाटल.तो अन्यायाविरुद्ध नेहमी पेटून उठायचा.सगळ्या जगाशी लढायचा.शर्टाच्या दोन्ही टोकांची गाठ मारून एक खांदा झुकवून डायनामाईट लावून तो धुरातून मोठ्या डौलात बाहेर यायचा पण तोपर्यंत इकडे माझ्या नाडीचे ठोके थांबलेले असायचे. कधीकधी तो प्रेमान ‘‘मै अपने बच्चे के लिए पालना लाया हूं सुधा’’ अस म्हणायचा तेंव्हा त्याच्या नजरेत मला कोवळा बाप दिसायचा .‘‘तुझे थामे कई हाथों से, मिलूंगा मदभरी रातों से ’’अस म्हणत कधी तो प्रियकर प्रेमळ पती व्हायचा. कधी प्रेयसीला ‘‘हे सखी’’ अशी साद घालायचा. त्याच हे प्रेम करणं मला त्याच्या पेटून उठण्याइतकच वेड  लावायच. त्यानं ‘‘इंतहा हो गई इंतजार की’’ अस म्हटल तेंव्हा त्याच्याबरोबरच मीही जिवाच्या आकांतानं वाट पाहिली .‘‘इसके आगे की अब दास्ताँ मुझसे सुन सुनके तेरी नजर डबडबा जाएगी ’’अस तो म्हणाला आणि खरच माझे डोळे भरून आले. ‘‘डॉक्तरानीजी बेहोश मत कीजिए मुझे. मैं होश में दर्द सहना जानता हूं’’ अस म्हणत आपला जखमी हात टाके घालण्यासाठी त्यान पुढ केला तेंव्हा त्याच्या मनातल वादळ माझ्याही मनात उसळल. माऊथ ऑर्गनच्या करूण स्वरातून त्यान आपल विधवेवरच अबोल प्रेम व्यक्त केल. आपल्याला डाकूंच्या हाती सोपवणार्‍या कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी बापाकडं त्यान निश्चयानं पाठ फिरवली. त्याच्या प्रेमभंगाची आणि दु:खाची झळ मला पोहोचली.‘‘कल अगर न रोशनी के काफिले हुए?’’ या प्रेयसीच्या प्रश्नावर ‘‘प्यार के हजार दीप है जले हुए ’’अस म्हणत हात पसरून उभ्या असलेल्या त्यान मलाही एक आधाराच आश्वासन दिल. कधीतरी कोणी ‘‘मोहब्बत बडे कामकी चीज है’’ अस म्हटल्यावर ‘‘ये बेकार बेदाम की चीज है’’ अस तो तोडून  टाकायचा. पण मी मात्र ‘‘सब कहते है तूने मेरा दिल लिया, मैं कहती हूं मैंने तुझको दिल दिया’ अशी दीवानी झाले होते. शेकडो माणस आजूबाजूला वावरत असूनही पडदाभर फक्त तो आणि तोच असायचा. पहाणार्‍याची नजर त्याच्यावरून जराही इकडतिकड होऊच शकायची नाही. त्याच प्रेम, त्याची हाणामारी, त्याचा राग ,त्याचा त्वेष या सगळ्यासाठी, त्याच्या आवाजासाठी, त्याच्या डोळ्यातल्या अनामिक आकर्षणासाठी मी खरच वेडी होते आणि आहे. ‘‘भाईयों और बहनों, देवियों और सज्जनों हम और आप खेलने जा रहे है यह अदभुत खेल कौन बनेगा करोडपती’’ परत तोच रुबाब, तोच धीर गंभीर आवाज ,प्रौढत्वाला न्याय देणारा अप्रतीम रंगसंगतीचा पोषाख ,सर्वाना समजून घेणारे डोळे आणि तेच भारावून टाकणं. साठी उलटून घेली तरी माझ त्याच्याबद्दलच वेड काही कमी होत नाही. येस आय अ‍ॅम क्रेझी फॉर माय अँग्री यंग मॅन!

© सौ. मानसी काणे

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments