श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ लॉकडाऊन चार नंतर भेटलेल्या मैत्रिणी ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

अनलॉक ४ नंतर भेटलेल्या मैत्रिणी

(जूना लेख नवीन बदलांसह)

ठिकाण: लोणावळा

??????

अरे अजून कशी आली नाही ही स्वारगेट हिरकणी एव्हान यायला पाहिजे होती. माझी तर आता  निघायची वेळ झाली असे विचार बोरिवली शिवनेरीच्या मनात येत असतानाच लोणावळा एक्झीट मधून अर्ध गोलाकार वळण घेत धापा टाकत. ठाणे – स्वारगेट हिरकणी अवतरली.

अग हो, हो,  जरा हळू,

उशीर झाला म्हणून एवढं जोरात यायचं? लागलं असतं की तुलाच.. शिवनेरी जरा काळजीच्या भावनेने म्हणाली..

ए शिवनेरी Sorry हं,  जरा उशीरच झाला मला, आता नेहमी सारख्या गप्पा नाही जमणार गडबड होईल इती – हिरकणी

‘अगं असू दे ‘ गप्पा काय संध्याकाळी परत येताना करु, तू आधी ३० रुपयाचा नाष्टा करुन ये. उपमा घे आज. मस्त आहे गरम. पण त्या आधी हे घे आधी सॅनिटायझर. स्वच्छ हात धू. कोण कोण असतं गाडीत देव जाणे. आपणच आपली काळजी घ्यायची

हो गं,  किती वाईट दिवस होते मागचे.  डेपोत नुसते पडून होतो. एक दोन दिवसात आपले मेकॅनिक मामा येऊन फक्त आपल्याला चालू करुन जायचे आपण कायमचे बंद पडू नये म्हणून खूप आठवण यायची सगळ्यांची

अग जातीयस ना नाष्ट्याला

नको ग, अजून काही दिवस बाहेरचे नको. घरुनच डबा आणलाय मी. स्वारगेटला पोहोचले की खाईन.

अगं पण एवढा घाट चढून आलीयस. दमली असशील की निदान चहा तरी घे.

नको गं शिवनेरी,  सध्या नुसते गरम पाणी.  तो बघ थर्मास भरुन ठेवलाय. निघताना घेईन पाणी.

शिवनेरी, घाटावरुन आठवलं,मला तर बाई या आपल्या कोकणातल्या मैत्रिणींच नवल वाटत. कशा एकदम फीट ना. ती अशोक लेल्यांची सून माहित आहे ना.

‘हो ना गं’ किती ते मोठे घाट असतात ना कोकणात. या आपल्या कोकणातल्या मैत्रीणी एकदम बिंधास्त. मी  मात्रफारशी त्या मार्गावर जातच नाही

आपला हा पुणे-मुंबई बोर घाटच बरा.

हो ना, नाहीतर आपण. अमृतांजन पाँईंट ला केंव्हा टाटा करतो असं होऊन जातं आपल्याला.

हिरकणी , तो बघ अश्वमेध येतोय, दादर – पुणे स्टेशन, बोलायचं का त्याच्याशी

“काही नको ग”, तो कुठं आपल्याशी बोलतो ग्रुप वर. तो फक्त  पुणे – दादर – पुणे  शिवनेरींशींच  बोलतो. आपला ग्रुप त्यानेच बनवून दिला अन   एकंदरीत  पुणे – दादर –  पुणे ची मक्तेदारी   आपण सगळ्या  ग्रुप मध्ये आल्यामुळे  मोडली गेलीय ना , त्याचे  त्यांना  दुःख आहे ग , लक्ष देऊ नकोस तू . आणि मुख्य म्हणजे तो दोन्हीकडच्या कंटॅन्मेंट झोन मधून येतो. येतोय तो, मास्क घाल निट. आणि मगाच पासून सारखं खालीवर का करतीयस हा मास्क. अजिबात असे करायचे नाही हं

हो ग बाई, अजून नीट सवय झाली नाही ना गं. पण घेईन काळजी

ए आपली

‘परळ – सातारा’ ती नाही ग दिसली ब-याच दिवसात नेहमीच्या वेळेला इथे

अग गणपती असतो ना तिच्याकडे  साता -याला. मला म्हणलेली  एक दिवस  पुणे – सांगली रूट  करून ये दर्शनाला . पण नाही ग जमलं . उद्या परत जॉईन होतीय ती  परळ डेपोत.

तिने गणपती विसर्जनाचे फोटो पाठवलेले की . नाही पाहिलेस  ग्रुपवर ?

नाही ग , राहून गेलं . पण ही परळ खूप सरळ हो . किती दमते  बिचारी.   आपण पुण्यापर्यतच जातो ग बिचारीला साता-या पर्यत जाऊन रात्री उशीरा पर्यत परत परळला  यावे लागते. खूपच हेक्टिक काम आहे तिचे.

हो ना. कुणाला कधी नाही म्हणत नाही. ग्रुप मध्ये सगळ्यात जास्त टोल पार्टी देणारी म्हणून तिचे सगळेच कौतुक करतात. आता उद्या मुद्दाम जरा  जास्त थाबते लोणावळ्याला अन कंदी पेढ्याचा प्रसाद. तिच्याकडून घेऊनच निघेन म्हणते

शिवनेरी,  ती बघ यशवंती .हाक मारतीय आपल्याला

यशवंती, ये  चहा घेऊन जा ..

अग नको  अजून चार चकरा मारायच्या आहेत  लोणावळा ते कार्ला आणि मी अजून बाहेरचे  काहीच खात नाही सध्या. भेटू परत केंव्हातरी

कमाल आहे ना या मुलीची.  केव्हा ही बघा ही आँन लाईन असतेच. जवळच्यांची खूप काळजी घेते, मैत्रीण असावी तर हीच्या सारखी

खरंय ग

ए शिवनेरी, तो बघ तुझा राजा हिंदुस्तानी आला ‘

“आले का सगळे का कोण राहिलय”

या आवाजाने मला जाग आली तेंव्हा ही शिवनेरी आणी समोरची हिरकणी माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसतायत असा भास मला झाला

तरीही त्यांचा संवाद संपत नव्हता:-

हो हो , चल आज खूप वेळ झाला, आता बोरिवलीला केव्हा पोचणार देव जाणे

नीट जा ग , सायन पासून पुढे बांद्रया पर्यत प्रत्येक  ९ मिटरवर खोल खडडे आहेत. कंबरडं मोडून जाईल

हो हो  काळजी घेईन, थॅक्स हं

मोरया ?

एसटीचे अनलॉक पर्व  ????

लोणावळ्याला जमू सर्व

 

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
स्मिता पंडित

सुंदर. वेगळ्या मैत्रीणी