☆ विविधा ☆ विदुषक ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

मोठं लालबुंद नाक, लिपस्टिकने गालावर बनवलेले दोन मोठे लाल गोळे भरपूर पावडर लावून गोरापान बनवलेला चेहरा, लालचुटुक ओठ, फ्रीलचा झगा, मोठ्या पट्यांची विजार आणि गोंडे असलेली मोठी टोपी. चेहर्‍यावर वेगवेगळे हावभाव, मिश्कील हास्य, आणि विचित्र उचापती करत जेव्हा हा विदुषक रिंगणात उतरतो तेव्हा हा सगळा अवतार पाहीला की नकळत मोठ्यांच्या चेहर्‍यावर हसू आणि लहान मुलांच्यात हलकल्लोळ माजतो.

एखादा बुटका आणि दुसरा अतिउंच अशी जोडी जेव्हा क्रिकेट खेळते आणि मुद्दामून आपला चेंडू मुलांच्यात फेकत बॅट टाकून पाळायला लागते तेव्हा सारे अगदी पोटभरून हसतात.

एखाद्या सायकल स्वाराची सायकल चोरतात किंवा रिंग मास्टरलाच घाबरवण्यासाठी मुद्दाम वाघाची डरकाळी काढून पळून जातात. अश्या अनेक मनोरंजक उचापती करत लोकांना मनमुराद हसवतात. त्यांचे काही क्षण का असेना आनंदात घालवतात सगळे टेंशन विसरायला लावतात.

लहानमुलांच्या टाळ्यांच्या गजरात स्वतः ला विसरून जगाला हसवतात.

लोकांसाठी हा केवळ एक विदुषक असतो चित्र विचित्र रूप घेऊन हसवणारा. पण माझ्या मते तो एक उत्तम कलाकार असतो. किती सहजपणे तो सार्‍यांना हसवून जातो. स्वतःची दुःख बाजूला सारून, सतत चेहर्‍यावर स्मित हास्य ठेवत उत्तम अभिनय पार पाडतो. त्याच्या चेहर्‍यावरुन त्याच्या मनात चाललेली तगमग तो अजिबात जाणवून देत नाही कोणाला.

फक्त सर्कशीतच विदुषक असतो असं नाही बरं का, तर पूर्वीच्या काळी कामाचा ताण कमी व्हावा आणि मनाचे मनोरंजन व्हावे म्हणून राज्याच्या दरबारी विदुषकाला मानाचे स्थान होते. त्यातले कृष्णदेवराय ह्यांच्या दरबारातील तेनालीराम हे खूप प्रसिद्ध झाले ज्यानी मनोरंजना बरोबर राज्याचा मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली आणि अनेक अडचणींवर तोडगे काढले.

सध्या वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढून व्यंगचित्रकार  विदुषकाचीच भूमिका बजावतो. ते वेडेवाकडे चित्र पाहून सकाळच्या वेळी आपल्या चेहर्‍यावर हास्य उमलवतो.

आपल्या तान्हुल्यांसाठी बरेचदा आई विदुषक बनते, स्वतःची सारी दुःख, तणाव बाजूला ठेवून सुंदरसा विदुषकाचा मुखवटा घालत दुःखाचा लवलेश ही चेहर्‍यावर न आणता उत्तम अभिनय साकारते फक्त त्याच्या चेहर्‍यावर हास्य उमलावे म्हणून.

मला आठवतं माझी एक मैत्रीण होती, ती कायम अशी विदुषकासारखी वागत होती. काहीतरी विचित्र करून हसवायची सगळ्यांना, आम्ही तिला जोकर म्हणूनच ओळखत होतो. आत्ता कळतं की तो अभिनय करून ती अनेक ठिगळं लपवण्याचा प्रयत्न करत होती.

आयुष्यात विदुषकाचा मुखवटा घालून किरदार निभावणे फार अवघड आहे. आज समाजात असे अनेक जण आहेत जे ह्या विदुषकांना हिणवतात त्यांना कमी दर्जा देतात पण हे फार महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. विदुषकांमुळे आपण काही काळ का होईना आपली सारी दुःख विसरून पोटभर हसू शकतो.

जरा बघा प्रयत्न करून जमतं का हसवायला त्यांच्या सारखे. जे ओठ बोलू शकत नाहीत ते त्यांचे डोळे बोलून जातात. बघा त्यांच्या डोळ्यात काही समजते का?? कदाचित ते अस सांगत असतिल की आम्ही पण माणूस आहोत आम्हाला हिणवू नका.

मी एवढच म्हणेन त्यांना हिणवण्या पेक्षा त्यांचा मुखवटा घालून तुम्हालाही त्यांच्या प्रमाणे सगळ्यांना हसवता येतं का पहा… काहीकाळ का होईना सारी दुःख विसरायला लावून काही आनंदाचे क्षण कोणाला देता येतात का ते पहा..

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

28.01.2012

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments