डाॅ.नयना कासखेडीकर

परिचय: डाॅ.नयना देवेश्वर कासखेडीकर.

शिक्षण:  B.Sc. chemistry ,Diplom in journalism,master in communication and journalism,Ph.D.in journalism.

Cert. course in film making and documentary, चित्रपट रसास्वाद कोर्स,सार्वजनिक कार्यक्रम संयोजन सर्टिफिकेट कोर्स.

अवगतभाषा: मराठी,हिंदी,गुजराती ,इंग्लिश.

लेखन: विविध मासिके, दिवाळी अंकातून लेखन, मान्यवरांच्या मुलाखती, संशोधनात्मक लेखन, संपादन, स्वामी विवेकानंद चरित्र मालिकेचे सोशल मिडियासाठी लेखन, विशेषांक व स्मरणिकांचे संपादन.

आकाशवाणी: ड्रामा B grade  artist., बालनाट्ये, शैक्षणिक कार्यक्रम यांचे लेखन व सहभाग, पुणे आकाशवाणीवर तेजशलाका या मालिकेसाठी काही भाग लेखन, नाट्य लेखन, दिग्दर्शन व सहभाग.

मुक्त पत्रकार व माध्यम अभ्यासक म्हणून काम चालू.

संस्कार भारती साहित्य विधा अ.भा.समिती सदस्य  व पश्चिम प्रांत प्रसिद्धी संयोजक.

संस्थापक:  मोहोर बुक क्लब.

संयोजक: साहित्य कट्टा, वर्तक बाग, पुणे.

साहित्य पर्यटन: साहित्यिकांचे गावी पर्यटन व माहिती घेणेदेणे.

साहित्य कार्यक्रमांची निर्मिती,संशोधन,लेखन,दिग्दर्शन. शाॅर्ट फिल्म निर्मिती.

?  विविधा ?

उत्तीष्ठत ! जाग्रत !डाॅ.नयना कासखेडीकर

श्रेष्ठ जीवनमूल्यांनी युक्त आणि आत्मजागृती झालेला असा समाज घडवण्याचे स्वप्न पहाणारे योगी, पण धर्म संघटक असलेले स्वामी विवेकानंद पाश्चात्य लोकानांही  शिकवण देऊन गेले, ही शिकवण आजच्या  जीवनशैलीच्या काळात अत्यंत उपयोगी पडणारी आहे.   

गेली दोन वर्षे जगभरात कोरोना या साथीच्या रोगाचे तांडव सुरू आहे. त्याचा प्रसार फार वेगात होतो आहे . भारताने या साथीत आपल्या लोकांसाठी आपल्याच देशात कोरोंना वर लस निर्माण केली जी जगात इतर देशांना पण पुरवता  आली. भारताने हा आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या सर्व पार्श्वभुमीवर स्वच्छता .आरोग्यादायी जीवनशैली, आहार विहार, योगसाधना, आयुर्वेद यावर पुन्हा पुन्हा चर्चा होत आहेत. लोकसंख्येचा विचार करता भारताच्या बाबतीत तर असा विचार होणं आवश्यकच आहे. आपल्याकडील पारंपरिक जीवनशैली आपल्या प्राचीन ग्रंथातून सांगितली आहे. हे ग्रंथ आजही आपल्याला मार्गदर्शक असेच आहेत. हेच स्वामी विवेकानंद ११८ वर्षापूर्वी आपल्या भारतीय लोकांना विशेषता तरुणांना वारंवार सांगत होते. त्यांचा भर तरुणांवर होता. आपला देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यासाठी तरुणांना दृष्टीकोण असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे आणि हा दृष्टीकोण आपल्याच संस्कृतीत सामावला आहे फक्त तो तरुणांना देण्याची गरज आहे असे त्यांना वाटत होते.         

स्वामी विवेकानंद भारतीय तरुणांना म्हणताहेत, “तुम्हाला केवळ एक संदेश देण्यासाठी मी जन्माला आलो आहे. आणि तो संदेश आहे, की उठा जागे व्हा, माझ्या तरुण देशबंधुनो! या, माझ्या बरोबर उभे रहा. बाहेर पडा, खेडोपाड्यात जा. देशात सर्वत्र जा आणि धैर्याचा हा संदेश सर्वत्र पोहोचवा. सबलांपासून दुर्बलांपर्यंत. लोकांशी बोला, त्यांना प्रेरणा द्या. त्यांना समजू द्या की, त्यांच्या जवळ अपार सामर्थ्य आहे. आपल्या भवितव्याचे शिल्पकार आपणच आहोत हे त्यांना कळू  द्या. त्यांना आत्मनिर्भर होऊ द्या. आजवर अपार श्रद्धेच्या पोटीच श्रेष्ठ कार्य घडून आली आहेत. पुढे चला, माझ्या तरुण देशबांधवांनो, पुढे चला”.

भारत आणि भारताबाहेर जाऊन आल्यानंतर त्यांनी जे अनुभव घेतले, जे जे पाहिले, त्यावरुन त्यांनी आपल्या देशाला कशाची गरज आहे याचा विचार केला. आपल्या देशाचे पुनरुत्थान होण्यासाठी आवश्यक असलेली अलौकिक शक्ति आपल्याकडे आहे. मग उशीर कशाला? असे म्हणून विवेकानंद कामाला लागले. त्यांना कळून चुकले की भारताची परंपरा आणि प्राचिनता एव्हढी भक्कम आधारावर उभी आहे की तीच सर्व जगाला मार्गदर्शक ठरू शकेल.   

जेंव्हा तरुण नरेंद्र बोधगयेला जाऊन आल्यानंतर श्री रामकृष्ण परमहंस यांना म्हणाला होता, “ आपण निर्विकल्प समाधीमध्ये सच्चिदानंदात डुंबून राहू इच्छितो” तेंव्हा रामकृष्ण म्हणाले, “ एखाद्या विशाल वटवृक्षासमान होऊन हजारो लोकांना शांतीची सावली द्यायची सोडून, तू आपल्या व्यक्तीगत मुक्तीसाठी तडफडणार आहेस? तुझे ध्येय इतके क्षुद्र आहे का ? नरेंद्रने केवळ अध्यात्म जपजाप्य, समाधी यातच मग्न न राहता आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचा उपयोग, आपल्या देशबांधवांच्या सर्वांगीण कल्याणासाठी करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. गुरूंची इच्छा आणि स्वत:चा अनुभव, याच्या जोरावर नरेंद्रनाथांनी पुढे आपले आयुष्य खर्ची घातले.

हे काम करता करता सर्वात आधी नरेन्द्रनाथ आपला देश जाणून घ्यायला उत्सुक होते. अयोध्या, लखनौ आग्रा वृंदावन अशी ठिकाणे पहात पहात ते भारताच्या चारही दिशांना परिभ्रमण  करू इच्छित होते.असे तीर्थाटन अर्थात परिभ्रमण केल्याने त्यांना आपल्या देशाची स्थिति कळली. आपल्या लोकांचे दैन्य समजले. दास्य आणि दारिद्र्य समजले. आपसातील भेद, अज्ञान, सामर्थ्यहीनता, ही समाजातली कमतरता लक्षात आली. परिव्राजक म्हणून फिरल्यानंतर त्यांना वाटले की आपला समाज पुन्हा सामर्थ्यशाली झाला पाहिजे, त्याचं वैभव पुन्हा त्याला मिळालं पाहिजे, राष्ट्रोत्थान झालच पाहिजे.

 म्हणून त्यांना भारतात असलेली इंग्रजांची सत्ता, गुलामी, अशा वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी त्यांनी कश्मीर ते कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत, अवलोकन करता करता भ्रमण केले. त्यांना दिसलं की जनतेत धर्माबद्दल आस्था आहे पण सामाजिक जीवनात गतीशीलता नाही. दोष धर्माचा नाही पण धर्माचा धंदा झाल्यामुळे समाजजीवन पंगु झालं आहे. त्यांना मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायच होतं. तीचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे. सगळा समाज भुकेकंगाल आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. अध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. पाश्चिमात्य लोकांची संस्कृती आणि चालीरीती व त्यांच्या डामडौलावर न भुलता, आपली ही मातृभूमी कशी आहे ते समजून घेतली पाहिजे.  आपल्या भारतीय समाजाचा जीवनहेतु काय आहे आणि त्याच्या अस्तित्वाची प्रेरणा कशात आहे, याचा शोध घेतला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरून गेलो आहोत, हे आपले खरे दारिद्र्य आहे. आपल्या ठायी स्वत:च्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेंव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील”.

खरच आहे आपल्याकडे जे अध्यात्म आहे, वेद, उपनिषदे यासारखे अनेक प्राचीन ग्रंथ आहेत. त्यात आपल्या जीवन जगण्याचे, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व सार सांगितले आहे. जीवनपद्धती सांगितली आहे. हा आपल्या संस्कृतीचा मूळ पाया आहे जो इतर कुठल्या ही देशात नाही आणि एव्हढी प्राचीन परंपराही नाही. म्हणूनच स्वामी विवेकानंद जेंव्हा सर्व ठिकाणी भारताबाहेर फिरले तेंव्हा त्यांना हेच जाणवलं होतं की, भारताकडे एव्हढी समृद्ध प्राचिनता असूनही भारत अधोगतीकडे का चाललाय? तर भारताच्या अधोगती च्या मुळाशी कोणतीही धडपड न करण्याची, उद्युक्त न होण्याची आणि कठोर परिश्रम न घेण्याची प्रवृत्ती आहे, पुढे जाण्याची ईर्ष्या नाही. इच्छा नाही, स्वत:च्या हिमतीवर उभे राहण्याचा गुण आपल्यात नाही. त्यामुळे काहीतरी प्रेरणा मिळेल, धीर मिळेल असे स्फुरण जो पर्यन्त चढत नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही.      

जेंव्हा  स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्यासाठी म्हणून अमेरिकेत शिकागो येथे गेले, त्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर त्यांना आपला देश आणि इतर देश यांच्यातली तफावत जाणवत होती. ते बघितलेल्या गोष्टींची आपल्या देशाशी तुलना करायचे, अगदी प्रवासाच्या सुरुवातीलाच जहाजाने  जाता जाता त्यांना जपान, चीन असे देश लागले. ते बघून त्यांना भरून आले की आपल्या देशाला हजारो वर्षांची परंपरा आहे, उज्ज्वल वारसा आहे, बळकट असं अध्यात्म आहे, धर्मविचार आहे, हे भूषणावह असे प्राचीनतेचे श्रेय कुठे हरपले आहे? आज आपल्या मातृभूमीतले हे वैभव, त्याचा मागमूसही दिसू नये याचे दु:ख त्यांना झाले.

जपान मध्ये जेंव्हा जहाज थांबले होते तेंव्हा खूप मोठा फरक त्यांना जाणवला. स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येक बाबतीत दिसणारी त्यांची सौंदर्य दृष्टी, रुंद रस्ते, घराभोवती बागा व शहराची नीट रचना , आधुनिकतेच्या काळात केलेला विज्ञानाचा स्वीकार, असे पाश्चात्य जगाचे आव्हान स्वीकारून जपान ताठ मानेने उभा आहे याचेही त्यांना कौतुक वाटले. तिथे त्यांना संस्कृतमध्ये मंदिरातील भिंतींवर श्लोक लिहिलेले  आढळले. तिथल्या पुरोहितांना संस्कृत कळत नव्हते, पूरोहित आधुनिक दृष्टीकोण असणारे होते. हे सर्व बघून विवेकानंद यांना वाटले शक्य तितक्या भारतीय तरुणांनी जपानला भेट दिली पाहिजे, कारण जपान पासून आपण शिकाव्यात अशा खूप गोष्टी आहेत. योकाहोमा ला पोहोचताच त्यांनी जहाजातूनच आपल्या मद्रासच्या शिष्यांना पत्र लिहिले की, जरा इकडे या, हे लोक पहा,आणि शरमेने आपले तोंड झाकून घ्या. पण त्यांना हे माहिती होतं की परंपरेने गुलाम असण्याची सवय भारतीयांना जडली आहे ती जाणार थोडीच ? आणि जात ? तिची तर खूप सवय, जरा इथून बाहेर पडले की आपण आपली जात गमावून बसू अशी भीती या लोकांना वाटतेय. शेकडो वर्षे खाणेपिणे, गुलामी, जुन्या पुराण्या चालीरीती पाळणे, आणि महत्वाकांक्षा काय तर एखादी नोकरी मिळवणे किंवा फार फार तर वकील होणे. एव्हढेच”. विवेकानंद कोणाचीही तमा न बाळगता निर्भीडपणे पुढे म्हणतात की, या तर, प्रथम माणसे व्हा. ज्यांचा नेहमी प्रगतीला विरोध असतो त्यांना झुगारून द्या. आपल्या बिळातून बाहेर पडा. आणि सभोवताली दृष्टी टाका सारी राष्ट्रे कशी दौडत चालली आहेत ते पहा. तुमचे आपल्या देशावर प्रेम असेल तर पुढे या. अधिक चांगल्या आणि उच्च दर्जाच्या गोष्टी हस्तगत आपण प्रयत्न करूया, मागे वळून मुळीच पाहू नका, पुढेच जात रहा” केव्हढा विचार आहे या मागे .

त्यांना अनुभवाने माहिती होते की चांगल्या कामात विघ्ने आणणारे लोक काही कमी नसतात. कर्तृत्व, पौरुष आणि पराक्रम या गुणांचे विवेकानंद यांना आकर्षण होते. अमेरिकेस जाताना खर तर अजून कित्येक किलोमीटर प्रवास व्हायचा होता, पॅसिफिक महासागर पार व्हायचा होता. पण त्या क्षणाला जे त्यांनी पाहिले ते आपल्या भूमीवरच्या लोकांना लगेच सांगावे अशी आंतरिक इच्छा निर्माण झाली होती आणि जपान सारखा प्रगतीत पुढे असणारा देश सुद्धा भारताबद्दल आदर बाळगतो याचा त्यांना जेव्हढा अभिमान वाटला तेव्हढेच वाईट वाटले आणि भारताची दुरवस्था डोळ्यासमोर उभी राहिली.

आता अमेरिकेत पोहोचल्यावर तिथले लोक, सुधारलेल्या व उच्च शिक्षित स्त्रिया, शहरे, वाहतूक, तिथले वातावरण, घरे, लोकांची वागणूक या सर्वांचे निरीक्षण विवेकानंद करत होते. त्यांच्या नजरेतून महत्वाच्या गोष्टी टिपल्या जात होत्या. सर्व धर्म परिषदेला वेळ होता आणि तिथे तब्बल ७०० एकर जमिनीवर भरवलेले अवाढव्य असे कोलंबियन एक्स्पोझीशन (औद्योगिक प्रदर्शन)भरले होते. विवेकानंद ते पाहून आश्चर्य चकित झाले. तिथे असणारी सुबत्ता, विज्ञानाचा वापर, तंत्रज्ञान, अद्ययावत संशोधन, यंत्रे, उपकरणे, सर्वसर्व बघण्यासारखे होते. ते मानवाच्या बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे प्रदर्शनच होते म्हणा ना. भौतिक प्रगती होती ती. तिथल्या नैतिकतेचे पण त्यांनी अनुभव घेतले. त्यांना हे लक्षात आले की जरी भौतिक प्रगतीत हे देश पुढे असले तरी त्या देशांना आपल्यासारखा अध्यात्माचा पाया नाही त्यामुळे त्यांची जीवनशैली नुसता देखावा आहे . शाश्वत नाही. त्यांच्याकडे शिक्षण आहे पण संस्कृती नाही. या उलट आपल्याकडे जीवन जगण्याचा शाश्वत असा आधार आहे. फक्त दारिद्र्य आणि अज्ञान दूर व्हायला हवे. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे , ते मिळाले की नवा दृष्टीकोण मिळेल, आत्मविश्वास वाढेल.

आत्मनिर्भर भारताचा विचार स्वामी विवेकानंद यांच्या समोरच सुरू झाला होता. याच प्रदर्शना जमशेटजी टाटा भाग घ्यायला गेले होते. जाताना ते स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर जपान ते शिकागो च्या प्रवासास होते. त्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतून, त्याग आणि तपस्या याचे पुनरु:जीवन करण्याची योजना टाटांनी आखली आणि बंगलोर इथे विज्ञान विषयाला वाहिलेली, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था उभी केली.     

त्यांनी अशा प्रगतिच्या व विकासाच्या अनेक गोष्टी पाहिल्या आणि त्यातील मोठमोठ्या उद्योजक जॉन डी रॉकफेलर, तिकडचे तत्वज्ञ अशा लोकांच्या भेटीतून तिथल्या विकासाचे मर्म समजून घेतले. आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास, आपल्याकडे शेती, विविध कला, कारागिरी आणि कौशल्ये आहेत त्याचा विकास व्हयायला हवा. त्याचे शिक्षण प्रशिक्षण, देऊन लघु उद्योग, मध्यम उद्योग, मोठे उद्योग यांना प्रेरणा द्यायला हवी. आपण करू शकतो असा विश्वास मनात निर्माण करून त्या तरुणांना बळ द्यायला हवे.

आज घडीला भारतात तरुणांना आकर्षित करणारी अनेक क्षेत्रे आहेत, अनेक संधी आहेत. अन्नधान्य उत्पादन , ऊर्जा क्षेत्र आहे, संरक्षण क्षेत्र आहे औषध निर्माण आहे, तंत्रज्ञान क्षेत्र आहे. मुख्य आहे संशोधन क्षेत्र. आता कोरोना काळात औषध क्षेत्रात भारताला यात लागणार्‍या औषधे व वस्तूंची निर्मिती करण्याची संधी मिळाली आहे. अशा संधी घेऊन स्वावलंबी होणं केंव्हाही देशाच्या दृष्टीने हिताचेच आहे.       

भारत स्वयंपूर्ण झाला तर भारताची अर्थव्यवस्था सुधारेल. भारताची निर्यात वाढली तर त्यातून परकीय चलन जमा होईल. अर्थव्यवस्था बळकट होईल आपण जी वस्तूंची आयात करतो त्या वस्तु जर भारतातच आपण उत्पादित करू लागलो तर आपला पैसा बाहेर जाणार नाही, त्यामुळे भारताचा खर्च कमी होईल आणि वस्तूंची टंचाई भासणार नाही. तसेच किमती पण माफक राहतील, चलनवाढ होणार नाही. दर वाढणार नाही. देशातच खूप उत्पादन झाल्यामुळे वस्तूंच्या किमती आटोक्यात राहतील आणि या वस्तूंची निर्यात करता येईल जेणे करून पुन्हा त्यावर परकीय गंगाजळी वाढेल.

स्वामी विवेकानंद यांनी जो देशाच्या पुनरुत्थानाचा मार्ग सांगितला की, “या देशाचे जीवन म्हणजे धर्म, याला धर्माचीच भाषा उमगते. धर्म हेच याचे प्राणतत्व, तुमचे राजकारण, समाज, महापालिका, प्लेगनिवारण कार्य, दुष्काळ निवारण, या गोष्टी केवळ धर्माच्याच माध्यमातून होतील, एरव्ही तुम्ही कितीही हातपाय हलवले तरी, आक्रंदने  केली तरी त्याचा काही उपयोग नाही”. कसा याचा विचार आपण जरूर करू. आत्मनिर्भर होण्यासाठी , विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे आपले अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याची आजही आवश्यकता आहे.  

© डॉ. नयना कासखेडीकर

vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments