श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ संक्रांत सण हा मोठा (भाग -2) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

संक्रांतीला आस-पासच्या बायकांना, नातेवाईकांना बोलावून हळदी-कुंकू करायची प्रथा आहे. तीळगुळाबरोबरच एखादी वस्तू द्यायची पद्धत आहे. हळदी कुंकू लावून तीळगूळ द्यायचा. गव्हाबरोबरच ओटीत, सुगडात घातलेल्याच वस्तू , म्हणजे बोरं, पावट्याच्या शेंगा, उसाचे कर्वे, गाजराचे तुकडे घातले जात. त्याच बरोबर एखादी वस्तू किंवा फळ वगैरे दिलं जाई. त्याला पूर्वी वस्तू लुटायची असं म्हंटलं जाई.  जी वस्तू द्यायची, त्याचा हळदी-कुंकू असे, त्या खोलीत एका कोपर्‍यात ढीग लावलेला असे. येणार्‍याने त्यातून आपल्याला हवे तेवढे घेऊन जायचे. त्यात प्रामुख्याने मळ्यातून आलेल्या भाज्या, फळे वगैरे असत. हवे तेवढे घेऊन जायचे म्हणून त्याला ‘लुटायची’ असा शब्द रूढ झाला. लूट करावी, इतकी ती गोष्ट अमाप असे. कालौघात परिस्थिती बदलली. मग वस्तू लुटण्याऐवजी वस्तू देणं आलं. त्यात मग गंमत म्हणून वेगवेगळ्या वस्तू आणायच्या. त्याच्या चिठ्ठ्या लिहायच्या. आलेल्या स्त्रियांना चिठ्ठ्या उचलायला सांगायच्या व जिला ही चिठ्ठी मिळेल, तिला ती वस्तू द्यायची. यात कधी आनंद असे, तर कुठे कमी मोलाची वस्तू मिळाली, याची एखादीला खंतही वाटे.

संक्रांतीचं हळदी-कुंकू संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत कधीही आपल्या सोयी-सवडीने करायची प्रथा आहे. माझ्या सासूबाईंना हळदी-कुंकवाच्या वेळी कंगवे, पावडर वगैरेचे छोटे डबे असं काही देणं फारसं पसंत नव्हतं. त्या म्हणत, ‘तुम्ही वस्तू देण्याबद्दलचं बजेट ठरवा. एखाद्या गरजवंत बाईला कशाची गरज आहे, ते बघा आणि तिला ती वस्तू घेऊन द्या. माझ्या जुन्या काळातल्या, सोवळ्या असलेल्या सासुबाईंचे हे विचार आधुनिक काळाला साजेसे होते आणि आम्ही तसच करत असू. मग ते कधी वाण म्हणून असो, वा मग सरळ सरळ प्रथा किंवा चाल म्हणून.

सणाच्या निमित्ताने दुसर्‍याला काही देण्याची प्रथा केवळ हिंदू धर्मातच आहे असे नाही, मुसलमान, क्रिश्चन, शीख , पारशी इ. सर्व धर्मात आहे. आपले सगळे सणवार, ते साजरे करण्यासाठी पडलेल्या प्रथा आनंद, उल्हास, निर्माण करणार्‍या आहेत. म्हणूनच त्या आजही टिकून आहेत. आजच्या काळात स्त्रिया उंबरठा ओलांडून घराबाहेर पडल्या. नोकर्‍या करू लागल्या. प्रत्येकीला स्वतंत्रपणे हळदी-कुंकू करावं इतका वेळ मिळेनासा झाला. मग त्यातून मंडळात किंवा सोसायतीत सगळ्यांनीच एकत्र येऊन सार्वजनिक हळदी-कुंकू होऊ लागले. रीती-रिवाजात बदल होत गेले, पण प्रथा, परंपरा कायम राहिली. पूर्वी हळदी-कुंकवाच्या वेळी  सुवासिनींनाच बोलावण्याची पद्धत होती. आता विधवांनाही सन्मानाने बोलावलं जाऊ लागलं. हा बादल माणुसकीचे बंध घट्ट करणारा आहे.

संक्रांत सणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. बाकीचे सण त्या त्या तिथीला येतात. उदा. पाडवा चैत्र प्रतिपदेला, गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, पण संक्रांतीची तिथी नक्की नसते. तिची तारीख नक्की ठरलेली असते. १४ जानेवारी. टिळक पंचांगाप्रमाणे ती १० जानेवारीला असते.  क्वचित एखाद्या वर्षी ती १३ वा १५ जानेवारीला यते. संक्रांत हा द्क्षिणायण आणि उत्तरायण या दोन कालखंडांना जोडणारदिवस  आहे. या दिवसापासन  सूर्याचे उत्तरेकडे भ्रमण सुरू होते. (त्याच्या फार भौगोलिक तपशीलात शिरायला नको).  या दिवसापासून दिवस मोठा होऊ लागतो. या दृष्टीने खरं तर हाच वर्षाच्या सुरवातीचा दिवस मानायला हवा. गुढी पाडवा हा वर्षाचा पहिला दिवस मानतात. त्यामागे विविध मिथकांचा आधार घेतलेला आहे. संक्रांतीला नववर्षाची सुरुवात मानली, तर त्याला भौगोलिक आधार आहे. शिशीर ऋतूतील थंडी , पानगळ, त्यातून दिसणारे सृष्टीचे, बापुडवाणे, उदास, मरगळलेले आणि मळकटलेले रूप आता बदलू लागणार आहे. झाडाझाडांवर नव्या अंकुरांच्या रूपाने नवजीवन साकारणार आहे. नवचैतन्याने सृष्टी बहरणार आहे. नाना रंगांच्या फुलांनी नटणार आहे. या सार्‍याचं आश्वासन संक्रांत घेऊन येते.

समाप्त 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Aparna Shembekar

माहितीपूर्ण लेख! ओघवती भाषा! खूप आवडला!