श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “पत्रिका (कुंडली) आणि प्रगती पुस्तक…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
आपल्याला प्रगतीचा आधार समजवून घ्यायला याच दोन गोष्टी लागतात. दोन्ही ठिकाणी काही घरं (रकाने) आणि काही आकडे असतात. पत्रिकेवरच्या आकड्यांनुुसार निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर विश्वास ठेवला नाही तरी, प्रगती पुस्तकावरच्या आकड्यांवर विश्वास ठेवावाच लागतो. आणि याच प्रगती पुस्तकावरच्या आकड्यांमुळे बर्याचदा (घरातली माझी) परिस्थिती बदललली होती. त्यामुळे आकडे आणि परिस्थिती माझ्या बाबतीत हातात हात घालून फिरत असली तरी मोठे आकडे आणि चांगली परिस्थिती अशी ती नव्हती, आणि नाही.
पत्रिका ही वेळ आणि काळ यावर, म्हणजे जन्मावर अवलंबून असते अस म्हंटल तर प्रगती पुस्तक हे केलेल्या कर्मावर अवलंबून असतं अस म्हणाव लागेल. पण या जन्मावर आणि कर्मावर अवलंबून असलेल्या गोष्टीबद्दल वर्मावर लागेल अस बरच काही ऐकाव लागलं आहे. पत्रिकेत कदाचित मागच्या जन्माच्या काही गोष्टींचा प्रभाव असेल. पण प्रगती पुस्तक फक्त वर्तमानाशी निगडीत असतं. आणि माझ वर्तमान मान वर करण्यासारखं कधीही नव्हत. आणि नाही.
पत्रिकेत भविष्याचा वेध असेलही. पण प्रगती पुस्तकावरून घरी काय परिस्थिती निर्माण होईल याचे लागलेले वेध लगेच लक्षात यायचे. आपली पत्रिका प्रत्येकाला समजेलच अस नाही. ती समजण्यासाठी अभ्यास करावा लागतो. पण प्रगती पुस्तकाच तस नाही. ती आमचा अभ्यास दाखवात होती. आणि इतरांना अभ्यास न करताही तो लक्षात यायचा.
प्रगती पुस्तक हे शाळेचच असत अस नाही. ते नंतर तुम्ही काय, कसं, किती कमवलं, किंवा जमवलं, आणि गमवलं याचही असत. फक्त शाळेतल्या प्रगती पुस्तकावर ते आकड्यांनी दाखवतात, तर आयुष्यात केलेल्या गोष्टी या बोलून दाखवतात. पण त्यावरुन निकाल लक्षात येतोच.
माझी पत्रिका आणि माझं प्रगती पुस्तक यावर मी बोलण्यापेक्षा इतरांनाच बोलण्यासाठी भरपूर वाव मिळाला. माझ्या पत्रिकेत भविष्यात काय आहे हे कोणी अभ्यास करून सांगण्यापेक्षा, माझं प्रगती पुस्तक पाहून माझं भविष्य अभ्यास न करताही सांगणारे बरेच भेटले.
पण माझ्या पत्रिकेत सांगितलेल्या काहि गोष्टी बर्याच अंशी तशाच घडल्या. काही गोष्टी अशा…
मी मोठा होईन… खरंच मी पाहता पाहता साठीला आलो.
मी स्वत:च्या पायावर ऊभा राहिल… खरंच आजही मी काठीच्या आधाराशिवाय माझ्या पायांवर ऊभा आहे.
आत्ता बरीच बडबड करत असला, कोणाच विशेष ऐकत नसला तरी पंचविशी नंतर परिस्थितीत अमुलाग्र बदल घडून यायची शक्यता… अठ्ठावीसाव्या वर्षी माझं लग्न झाल आणि… बडबडतर कमी झालीच, आणि ऐकालाही लागलो. आता कोणाच ऐकतो हा भाग निराळा… पण त्यामुळेच आता आईच बोलणंसुध्दा ऐकाव लागतं. काही वेळा तर मुलंही बोलतात… बोलणं ऐकणं आणि ऐकाव लागणं यातला असलेला वरवरचा फरक खोलपणाने समजला.
धनराशीचा एखादा आकडा किंवा रकाना पत्रिकेत असतो का याची कल्पना नाही. पण इतर सगळ्या राशींनी रकाने पूर्ण भरल्याने कोणत्याही राशीने या बाबतीत माझ्यावर तेवढा विश्वास दाखवलाच नाही. किंवा विनाकारण त्या धनराशीने माझ्या पत्रिकेत घुसखोरी केलेली नाही.
माझ्या पत्रिकेतल्या काही आकड्यांवरुन स्थैर्य आणि सकारात्मक व्रुत्ती आहे अस लिहिलं होत. ते स्थैर्य म्हणजे नक्की काय हे मला बर्याच विषयात बरीच वर्ष पस्तीस किंवा छत्तीस गुण मिळाल्यामुळे, आणि पुढे पगारातही कमीतकमी मिळणार्या वाढीमुळे समजलं. फक्त त्या पस्तीस आणि छत्तीस या आकड्यांमुळे एकाच वर्गात राहण्याच स्थैर्य मात्र टळलं होत. कदाचित या बाबतीत माझा गुरु आणि माझे गुरु प्रभावशाली होते. किंवा दोघांचा शनि कमजोर होता. याच बाबतीत आमचे छत्तीस गुण जुळले असतील, आणि मला परिक्षेत छत्तीस गुण मिळाल्याने गुरूंचा मान राहिला असेल. त्या स्थैर्याचा अर्थ वाढणार नाही, असा न घेता कमी होणार नाही असाच मी सकारात्मक घेतला.
माझ्या पत्रिकेत असणाऱ्या आणखीन दोन गोष्टी म्हणजे इतरांनी केलेल्या कामामुळे याला अपेक्षित यश मिळाल नाही तरी आशावाद, आणि धैर्य सोडणार नाही… खरच माझ्या भविष्या बाबतीत मी म्युच्युअल फंडा सारखाच आशावादी आहे. तर धैर्य दाखवतांना गडगडलेला शेअर बाजार मला तेेवढा विचलित करत नाही.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





