श्री जगदीश काबरे

☆ “चुकेल तो शिकेल☆ श्री जगदीश काबरे ☆

एखाद्या व्यक्तीला “मी कधीच चुकत नाही” किंवा “माझी विचारसरणीच अंतिम सत्य आहे” अशी ठाम खात्री वाटू लागते, तेव्हा ती केवळ त्याच्या मतांवर ठाम असते असे नसून, तिच्या संपूर्ण मानसिक रचनेत एक प्रकारचा बंदिस्तपणा निर्माण झालेला असतो. मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून ही अवस्था ‘cognitive rigidity’ म्हणजेच विचारांतील कठोरता दर्शवते. अशा व्यक्तीला नवीन माहिती, विरोधी मत किंवा आत्मपरीक्षण स्वीकारणे कठीण जाते, कारण त्यातून तिच्या ‘स्व’बद्दलच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती असते. परिणामी, ती व्यक्ती एकाच विचाराच्या चौकटीत अडकून राहते आणि चकवा लागल्यासारखे त्याच प्रश्नाभोवती वारंवार फिरत राहते. हे वर्तन बाहेरून हट्टीपणासारखे दिसते, पण आतून ते असुरक्षिततेशी जोडलेले असते.

या प्रक्रियेमागे ‘confirmation bias’ ही एक महत्त्वाची मानसिक प्रवृत्ती कार्यरत असते. म्हणजे, माणूस आपले आधीचे मत बरोबर ठरवणारीच माहिती स्वीकारतो आणि विरोधी माहिती नाकारतो किंवा दुर्लक्ष करतो. त्यामुळे “मीच बरोबर आहे” ही भावना अधिकाधिक दृढ होत जाते. यात अहंकाराची जोड, व्यक्तीचे मत आणि तिची ओळख हे सगळे गुणावगुण एकरूप होतात. त्यामुळे मत चुकले आहे हे मान्य करणे म्हणजे स्वतःलाच कमी लेखणे, अशी भीती निर्माण होते. यामुळे व्यक्ती वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी आत्ममग्नतेत गुरफटते.

एखाद्या रुग्णाने “मला काहीच आजार झालेला नाही” असे ठरवले, तर तो निदान, तपासणी आणि उपचार या सगळ्यांपासून दूर राहतो. परिणामी आजार अधिक बळावतो. त्याचप्रमाणे, विचारांच्या पातळीवरही “मी चुकूच शकत नाही” ही धारणा व्यक्तीला आत्मसुधारणेपासून रोखते. ती स्वतःच्या विचारांकडे नव्या दृष्टीने पाहत नाही, त्यामुळे चुका सुधारण्याची संधीच नाकारली जाते. असे वास्तव नाकारणे, हा एक प्रकारचा मानसिक बचावात्मक प्रतिसाद असतो. याउलट, विवेकशीलता म्हणजे स्वतःच्या विचारांवरही प्रश्न विचारण्याची तयारी ठेवणे ही बौद्धिक नम्रता प्रगतीसाठी अत्यावश्यक असते. माणूस चुकतो आणि आपणही चुकू शकतो, हे मान्य केल्यावरच तो नवीन शिकण्यास, बदल स्वीकारण्यास आणि अधिक व्यापक दृष्टिकोन विकसित करण्यास तयार होतो. डोळ्यावरचा धुरकट चष्मा पुसण्याची तयारी असणे हीच खरी प्रगतीची सुरुवात असते.

अशा पार्श्वभूमीवर, “मीच बरोबर” या आत्ममग्नतेत अडकलेली व्यक्ती केवळ स्वतःच्या बौद्धिक विकासालाच अडथळा ठरत नाही, तर व्यापक सामाजिक संवादालाही बाधा आणते. कारण संवादाचा गाभा हा परस्परांचे ऐकण्याची तयारी, स्वतःच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची क्षमता आणि सत्याच्या शोधात लवचिक राहण्याच्या वृत्तीमध्ये असतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मतांना अंतिम सत्य समजते, तेव्हा ती प्रत्यक्षात सत्याच्या शोधापासून दूर जात असते आणि स्वतःच्या विचारांच्या प्रतिध्वनीतच अडकून पडते. खरी विवेकशीलता ही अचूकतेच्या दाव्यात नसून, चुकण्याची शक्यता मान्य करण्याच्या प्रामाणिकपणात आणि त्या चुकांमधून स्वतःला सतत सुधारण्याच्या धडपडीत असते. म्हणूनच बौद्धिक प्रगतीचा मार्ग हा आत्ममग्नतेतून नव्हे, तर शंकांना सामोरे जाण्याच्या धैर्य आणि आत्मपरीक्षणाच्या सवयीमधूनच उलगडत जातो, हे आपण जेवढ्या लवकर लक्षात घेऊ तेवढे बरे. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted