श्री दिवाकर बुरसे
विविधा
☆ ‘श्यामलतेची दिव्यता’ – भारतीय काव्यातील वर्णसौंदर्य ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
प्रस्तावना
भारतीय काव्यपरंपरेत काही रूपं अशी आहेत, की त्यांचं वर्णन करताना शब्दही शहारतात. कारण तिथे केवळ देह नसतो, तर देहापलीकडची कांती असते; केवळ रंग नसतो, तर अनुभूतींचं अथांग विश्व दडलेलं असतं.
“श्याम”, “श्यामल”, “मेघश्याम”, “नीलमेघवर्ण”, “हिरण्यवर्ण”, “स्वर्णमय”, “कर्पूरगौर” — हे शब्द त्वचेच्या रंगाचं वर्णन करणारे नाहीत; ते करुणा, माधुर्य, गूढता, शांती आणि दिव्य तेजाचे स्वर आहेत. म्हणूनच भारतीय कवींनी श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीलक्ष्मी किंवा श्रीमहादेव यांचं वर्णन करताना रंग नव्हे, तर आपल्या दर्शनानुभूती रंगवल्या.
राम : शांत निळाईचा करुणासागर
“नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम्” ही ओळ उच्चारताच मनात एक गंभीर, दयार्द्र आणि प्रसन्न निळाई उतरते.
रामांचं श्यामल रूप म्हणजे स्थैर्याची कांती. त्यांच्या वर्णात आकर्षण आहे; पण त्याहून अधिक संयम आहे. मुखावर तेज आहे; पण नेत्रांत त्याहून अधिक करुणा आहे. जणू ऋषींच्या तपश्चर्येतून सांजवेळचं नील आकाश आकार घेत गेलं आणि त्यातून रामांचं रूप प्रकट झालं.
“रामं दूर्वादलश्यामम्… ” — दूर्वेच्या कोवळ्या हिरवट-निळसर छटेसारखी त्यांची कांती : शीतल, सौम्य आणि डोळ्यांना निववणारी.
“नीलमेघश्याम” ही उपमा सहज जन्मलेली नाही. मेघ गडद असतो, पण भयावह नसतो; तो जीवनदाता असतो. त्याच्या कुशीत वीज असते, पण वर्षावात शीतलता असते. रामांची श्यामलता अशीच — सामर्थ्य आणि सौम्यता यांचा अद्वैत संगम.
त्यांच्या वर्णात श्रावणसंध्येची गंभीर प्रसन्नता आहे. जसा दिवस मावळताना आकाश अधिक गहिरं, अधिक शांत आणि अधिक सुंदर होत जातं, तशी रामांची कांती मनात उतरते.
कृष्ण : पावरीत विरघळलेली श्यामलता
“मेघश्यामं पीतकौशेयवासम्… ” ही ओळ ऐकताच श्रीकृष्ण जणू यमुनेच्या तीरावर उभे राहतात.
कृष्णांची श्यामलता ही गूढतेची माधुरी आहे. त्यांच्या वर्णात चपलता आहे, संगीत आहे आणि अंतःकरणाला मोहून टाकणारं आकर्षण आहे. मोरपिसांनी अलंकृत ते सावळं रूप म्हणजे जणू श्रावणमेघांनी बासरीचा स्वर धारण केला आहे.
तो अंधार नाही; तो चंद्रप्रकाशाला अधिक सुंदर करणारा निळसर गहिरा पडदा आहे. त्यांच्या श्यामल कांतीवर मोरपीस अधिक खुलतं, पीतांबर अधिक उजळतो आणि बासरीचा स्वर अधिक विरघळतो.
जशी काळ्या नभामुळं तारकांची शोभा वाढते, तशी कृष्णांच्या श्यामलतेमुळं भक्ती अधिक उजळते. म्हणूनच संत तुकाराम सहज उद्गारतात :
“सावळे सुंदर रूप मनोहर… ”
या एका ओळीत भारतीय सौंदर्यदृष्टीचा आत्माच दडलेला आहे.
श्यामरंग : गूढ प्रकाशाची सावली
राम आणि कृष्ण यांचा श्यामल वर्ण सामान्य अनुवंशिक देहवर्णाच्या चौकटीत मावणारा नव्हता. “श्यामल” म्हणजे केवळ सावळेपणा नव्हे; ती सावळेपणातून झिरपणारी दिव्य कांती आहे.
भारतीय कवींनी रंगांना त्वचेच्या मर्यादेत बंदिस्त केलं नाही. त्यांनी रंगांत स्वभाव पाहिला, करुणा पाहिली, माधुर्य पाहिलं, तेज पाहिलं. म्हणून इथं श्यामवर्णही राजस आहे आणि सावळेपणातही दिव्यता आहे.
श्याम रंग म्हणजे अंधार नव्हे; तो प्रकाशाचा अधिक गूढ झालेला स्वर आहे. जसा रात्रीच्या नभात चंद्र अधिक सुंदर दिसतो, तशीच श्यामलतेच्या पार्श्वभूमीवर करुणा अधिक उजळते.
स्वर्णमयतेचे सूर्यस्पर्शी तेज
भारतीय वाङ्मयानं केवळ श्यामलतेलाच दिव्यता दिली नाही; त्यानं स्वर्णमय तेजालाही तितक्याच आदरानं गौरवलं.
वैदिक श्रीसूक्तात श्रीलक्ष्मीचं वर्णन “हिरण्यवर्णां”, “पद्मवर्णां”, “चन्द्रां प्रभासाम्” असं येतं. महाभारतात कर्णाचं, तर बौद्ध साहित्यात भगवान गौतम बुद्ध यांच्या वर्णाचं वर्णन “स्वर्णमय” असं आढळतं.
हे केवळ गोरेपण नव्हतं; ते वितळलेल्या सुवर्णासारखं तेजस्वी अस्तित्व होतं. त्वचेवर कमलदलासारखी कोमल गुलाबी छटा आणि व्यक्तिमत्त्वात सूर्यकिरणांची प्रभा होती. जणू पहाटेच्या बालरवीकिरणांनी मानवी रूप धारण केलं होतं.
भारतीय कवींनी व्यक्तिमत्त्वातील तेजाला रंगांची उपमा दिली — कुणी मेघश्याम झालं, कुणी हिरण्यवर्ण.
कर्पूरगौर शिव
श्रीराम आणि श्रीकृष्ण दोघेही श्यामवर्णी असले, तरी त्यांच्या वर्णात सूक्ष्म भेद आहे. रामांचा वर्ण निरभ्र आकाशासारखा शांत निळसर आहे; तर कृष्णांचा वर्ण वर्षाऋतूतील सजल मेघासारखा गडद नील.
महादेवांचा वर्ण मात्र याहून भिन्न आहे. कैलासनिवासी शिव “कर्पूरगौर” आहेत — हिमालयाच्या शुभ्रतेसारखे, “रजतगिरीसम” धवल आणि तेजस्वी.
त्यांच्या गौरवर्णात वैराग्याची शांतता आहे; जणू हिमशिखरांनीच मानवी रूप धारण केलं आहे.
काही रंग अनुभवावे लागतात
आज विज्ञान रंग मोजू शकतं, छटा ठरवू शकतं; पण “मेघश्याम” मोजू शकत नाही. कारण तो रंग त्वचेवर नव्हता — तो अनुभूतीत होता.
रामांचा श्याम वर्ण म्हणजे शांत प्रार्थना. कृष्णांची निळाई म्हणजे यमुनेवर तरंगणारी पावरी. श्रीलक्ष्मीची स्वर्णमय प्रभा म्हणजे समृद्धीचं मंगल तेज.
हे रंग चित्रांत रेखाटता येतात, शब्दांत मांडता येतात; पण पूर्णपणे उलगडता येत नाहीत. कारण काही रंग डोळ्यांनी दिसत नाहीत — ते अंतःकरणानं अनुभवावे लागतात.
आकाशाचा रंग हातात पकडता येत नाही; तो फक्त डोळ्यांत उतरतो. तशीच रामांची गंभीर श्यामलता, कृष्णांची मधुर निळाई आणि शिवांची कर्पूरगौर प्रभा भारतीय मनाच्या आकाशात आजही तरंगत आहे — श्रावणातील पहिल्या मेघासारखी… शांत, गूढ आणि चिरंतन.
🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




