श्री जगदीश काबरे
🌸 विविधा 🌸
☆ “गृहिणी की हक्काची मोलकरीण?…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
कपडे, भांडी, धुण्याला जी बाई घरी येते तिला मोलकरीण म्हणायचं आणि दिवसभर 24 तास घरातली सगळी कामं करत असते तिला मात्र मालकीण म्हणायचं! खरं पहाता काय फरक आहे दोघीत? फरक असलाच तर एक मोलाची मोलकरीण असते, तर दुसरी हक्काची मोलकरीण, एवढाच. या विधानातून भारतीय कुटुंबव्यवस्थेतील स्त्रीच्या श्रमांचे एक दाहक वास्तव समोर येते. घरात भांडी, कपडे आणि स्वच्छतेची कामे करणाऱ्या स्त्रीला ‘मोलकरीण’ म्हटले जाते; कारण ती कामाच्या मोबदल्यात श्रम विकते. पण घरातील सर्व कामे बारा महिने तिन्ही त्रिकाळ करणाऱ्या, स्वयंपाक, स्वच्छता, मुलांचे संगोपन, वृद्धांची देखभाल आणि कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या स्त्रीला ‘मालकीण’ म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात तिच्या श्रमांना कोणताही आर्थिक मोबदला नसतो, कामाचे तास निश्चित नसतात आणि सुट्टीचीही हमी नसते. तिच्या श्रमांना प्रेम, कर्तव्य, त्याग आणि संस्कार अशा गोंडस शब्दांचे आवरण चढवले जाते.
म्हणूनच ‘एक मोलाची मोलकरीण, तर दुसरी हक्काची मोलकरीण’ असते असे उपरोधाने म्हणावेसे वाटते. हेच आपल्या पुरुषप्रधान सामाजाचे विदारक वास्तव आहे. फरक फक्त दोघींच्या कामात नाही; तर त्यांच्या श्रमांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक मान्यतेतही आहे. बाहेरून कामाला येणाऱ्या स्त्रीच्या श्रमांची किंमत ठरते; घरात राबणाऱ्या स्त्रीच्या श्रमांना मात्र अनेकदा किंमतच नसते. पहिलीला कामगार म्हणून ओळख मिळते, दुसरीला कुटुंबात देवी म्हणत मखरात बसवले जाते आणि संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली तीचे शोषण केले जाते. केरसुणी आणि गृहिणी यांना लक्ष्मीची उपमा दिली जाते. म्हणजे बाई देवी असते पण तिची जागा केरसुणीसारखी एका कोपऱ्यात असते, असेच यातून त्यांना आडवळणाने सुचवायचे असते. गृहिणीला मोठेपणा दिल्याचा आणायचा पण प्रत्यक्षात तिला मात्र संस्कृती नामक सोन्याच्या पिंजऱ्यात डांबायचे. ही पुरुषी मानसिकतेची कपटनीती आहे. घरकाम करणाऱ्या स्त्रीला कमी वेतन, असुरक्षित रोजगार आणि सामाजिक अवमान सहन करावा लागतो; तर गृहिणीला आर्थिक परावलंबित्व, श्रमांची अदृश्यता आणि निर्णयप्रक्रियेतील दुय्यम स्थान यांचा सामना करावा लागतो. दोघींच्या परिस्थितीचे स्वरूप वेगळे असले, तरी दोघींच्या श्रमांना समान मानवी प्रतिष्ठा आणि योग्य मूल्य मिळत नाही.
मोलकरीण असो की घरकाम करणारी गृहिणी त्यांचे काम हे कामच असते; उपकार नाही. एवंच गृहिणी ही घराची मालकीण आहे, असे म्हणत घरातील स्त्रीच्या श्रमांना प्रेमाच्या नावाखाली विनामूल्य सेवा समजण्याची मानसिकता बदलल्याशिवाय स्त्री-पुरुष समानतेच्या घोषणा अर्थहीन ठरणाऱ्या आहेत.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





