सुश्री मंजुषा देशपांडे

 ☆ संकीर्ण : लोककथा  : वाखन पठारावरील लोककथा  ☆ सुश्री मंजुषा देशपांडे

ही लोककथा आहे.  एकदा म्हणे समुद्र आणि पृथ्वीमध्ये सर्व बहिण भावंडांच्यात असते तसे भांडण लागले.  या कथेत सूर्याची मुलगी पृथ्वी आणि  समुद्र व चंद्र मुलगे.   पृथ्वी आणि समुद्राचे एक मिनिट पटत नसे. चंद्र धाकटा,  तो कधी पृथ्वीच्या तर कधी समुद्राच्या पार्टीत.  तर पृथ्वी आणि समुद्राच्या  कडाक्याच्या  भांडणाचे कारण म्हणजे समुद्र पृथ्वीच्या हद्दीत शिरत होता आणि त्यासाठी वा-याच्या मदतीने त्याने मोठमोठ्या लाटा निर्माण करून त्याच्या किना-यालगतची पृथ्वीवरील झाडे आणि घरे दणादणा हलवली,  पृथ्वीला भयंकर राग आला ती तडक सूर्याकडे गेली. चंद्र  होताच साक्षीला.  सूर्याने समुद्राला बोलावले,  समुद्र कसला खट,  काय म्हणाला असेल… तर..म्हणे चंद्राने त्याला उकसवलं,  तो जवळ आला,  लांब गेला.  समुद्र आणि चंद्राच्या खेळात वारा सामिल झाला,  आणि त्यामुळे ते.. काय पृथ्वीला त्रास झाला.  समुद्राला काही पृथ्वीची खोडी काढायची नव्हती. असे साळसूदपणे सांगून त्याने चंद्राकडे पाहून डोळे मिचकावले. सूर्याला काही ते दिसले नाही पण पृथ्वीला दिसल्यामुळे तिचा चरफडाट झाला. पण ती काही न बोलता निघून गेली.  तिने समुद्राला धडा शिकवायचा ठरवला,  विचार करता करता तिला एक युक्ती सुचली,  त्या टेथिस महासागराचा तर तिला फारच वैताग येई, कारण त्याच्यामुळे तिचे तुकडे पडल्यासारखे झाले होते.  तिने समुद्रात लपलेल्या हिमालयाला विचारले,  तुला पहायचंय ना आकाश?  तो पौर्णिमेचा चंद्र…ते हिरवेगार देवदार… हिमालयाला पाहिजेच होते.  त्याला समुद्राची भीती वाटे पण तो तयार झाला.  पृथ्वी म्हणाली,  “ज्या दिवशी तो चंद्रोबा फूल फाॅर्मात असतो, त्या दिवशी तो आणि समुद्र भयंकर दंगा करत असतात आणि त्याचे इकडे तिकडे कुठे लक्ष नसते,  त्या दिवशी तू जोरात उसळी मारून वर ये… हिमालय तयारच होता,  तो दिवस अर्थातच पौर्णिमेचा होता. हिमालय वर आल्यावर सर्वानाच आनंद झाला पण समुद्राला भयंकर राग आला, तो त्याच्या अक्राळ विक्राळ लाटा आपटायला लागला.  पृथ्वीला म्हणे, ” तुझे तुकडे करून टाकीन” रागारागात पृथ्वीच्या घरी गेला आणि जोरजोरात दार वाजवायला लागला.  दिवस होते श्रावणाचे, त्यामुळे पृथ्वीबाई ठेवणीतला हिरवा कंच शालू नेसल्या आणि रंगीबेरंगी फूले भावाच्या अंगावर उधळत त्यानी त्याला घरात घेतले ओवाळले आणि म्हटले,  आजपासून आपल्या नात्याची नवी सुरुवात करू.  भांडणे विसरून जाऊ…माझी मुले तुला दरवर्षी नारळ अर्पण करतील. हा दिवस भावा बहिणीच्या स्नेहाचे प्रतिक होईल.  भावाने स्वतःच्या मर्यादेत राहिल्यास… दरवर्षी… अगदी दरवर्षी सर्व भाऊ बहिणी हा सण साजरा करतील… अशी कोपरखळीही मारायला ती विसरली नाही.

ही गोष्ट मूळच्या वाखन पठारावरील मोहम्मद हुसेन या माझ्या सहसंशोधक मित्राने सांगितली होती.

©  सुश्री मंजुषा देशपांडे

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments