सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 

☆ सूर संगत (भाग – ४) – भाग्यद बिभास १ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

भाग्यदायिनी लक्ष्मीदेवतेला आवाहन करणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचा पवित्र सूर भाषेच्या पलीकडं जाऊन आपल्याला ज्या गीताशी तादात्म्य पावायला लावतो ते कन्नड गीत म्हणजे ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, नम्मम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ आणि शब्दार्थापलीकडच्या ह्या बंधांमधे महत्वाची भूमिका बजावतात ते ‘बिभास’ रागाचे सूर! मागच्या दोन लेखांमधे उल्लेखिलेल्या भूप व देशकार रागांचाच आरोह-अवरोह घेऊन त्यातील रे आणि ध हे दोन स्वर कोमल केले कि बिभास रागाचे आरोह-अवरोह मिळतात आणि त्यात फक्त रे हा एकच स्वर कोमल केला तर तो शुद्ध धैवताचा बिभास होतो. ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे पद ह्यापैकी रे व ध दोन्ही स्वर कोमल असणाऱ्या बिभासातले आहे.

एकच आरोह-अवरोह पण त्यातल्या एक किंवा अनेक स्वरांचे ‘व्हेरिएशन’ वापरले गेले तर लगेच त्या रागाचा थाट बदलतो आणि काहीवेळा रागस्वरूपानुसार अगदी तेच सूर असणाऱ्या रागांचाही थाट भिन्न असू शकतो. यासाठी एक उदाहरण भूप-देशकाराचे देता येईल. एकच आरोह-अवरोह असूनही भूप ‘कल्याण’ थाटातला तर देशकार ‘बिलावल’ थाटातला! ह्याच आरोह-अवरोहात रे आणि ध कोमल झाले कि तो बिभास ‘भैरव’ थाटातला आणि फक्त रे कोमल केला कि तयार होणारा शुद्ध धैवताचा बिभास हा मारवा थाटातला!

आता ‘थाट’ म्हणजे नेमके काय? आजवर कुणीच कधीही कोणता थाट गायल्याचे कुणाच्याच ऐकिवात नसेल, तरीही थाटाचे इतके महत्व काय आहे? आणि थाट व रागात नेमका काय फरक आहे?

सप्तकातील मुख्य सात स्वर व त्यांपैकी पाच स्वरांची व्हेरिएशन्स म्हणजे पाच विकृत स्वर ह्या एकूण बारा स्वरांतून निर्माण होणारी सात स्वरांची वेगवेगळी ‘कॉम्बिनेशन्स’ म्हणजे थाट! हिंदुस्थानी पद्धतीत एकावेळी एका स्वराचे कोणतेतरी एकच स्थान विचारात घेतले जाते. म्हणजे प्रत्येक थाटात सा आणि प हे दोन अचल स्वर व उरलेल्या रे, ग, म, ध, नि ह्या पाच स्वरांचा शुद्ध किंवा कोमल/तीव्र ह्यापैकी एकच प्रकार वापरला जातो. एका स्वराची शुद्ध व कोमल किंवा शुद्ध व तीव्र अशी दोन्ही रूपं एकाच थाटात आढळून येणार नाहीत. थोडक्यात सा, रे, ग, म, प, ध, नि हे सात स्वर घेऊन केली गेलेली वेगवेगळी(स्वरांच्या शुद्ध/कोमल/तीव्र रुपांमुळे वेगळेपण ल्यायलेली) सप्तके म्हणजे थाट आणि एका थाटातील स्वरांची विविध ‘कॉम्बिनेशन्स’ म्हणजे राग! त्यामुळे थाटास रागांचे उत्पत्तीस्थान मानले आहे.

सोपं करून सांगायचं तर एक उदाहरण देता येईल. समजा सात ठराविक ‘इनग्रेडियन्ट्स’चे(पाककृतीसाठी साहित्य) किट तयार केले आणि आणि ते किट बऱ्याचजणांना देऊन काहीतरी रेसिपी तयार करायला सांगितली. त्यासाठी अट अशी ठेवली कि किमान पाच ‘इनग्रेडियन्ट्स’ तरी वापरायला हवे (रागात किमान पाच स्वर असावे लागतात) परंतू कोणता ‘इनग्रेडियन्ट’ किती प्रमाणात वापरायचा हे स्वातंत्र्य रेसिपी तयार करणाऱ्याला दिलं.  आता विचार करता ह्या प्रकारे एकाच ‘इनग्रेडियन्ट्स’च्या ‘सेट’ मधून कोणतेही पाच/सहा/सात ‘इनग्रेडियन्ट्स’ वापरले ह्यासाठी गणितीय ‘परम्युटेशन-कॉम्बिनेशन’ पद्धतीनुसार ठरविक ‘रेसिपीसंख्या’ निर्माण होईल आणि त्यातही कोणता ‘इनग्रेडियन्ट’ किती प्रमाणात वापरला गेला ह्यानुसार रेसिपी वेगळी मानायची तर चवीत जाणवण्यासारखा फरक असलेल्या ‘रेसिपीज’ही गृहीत धरता येतील(उदा. भूप-देशकार)!

ह्यापैकी ‘इन्ग्रेडियन्ट्स’ म्हणजे एक ठराविक स्वरसप्तक/थाट आणि त्यातून दिलेल्या नियमांचे पालन करून तयार होणाऱ्या ‘स्वादिष्ट/रुचकर’ पाककृती म्हणजे राग! ‘स्वादिष्ट/रुचकर’पणावरच सगळ्यांना त्या ‘पाककृती’चं आवडणं/नावडणं ठरतं त्यानुसारच ‘कानाला भावणारे’ स्वरसमूह राग म्हणून अस्तित्वात आले. रागाबाबत आरोह व अवरोहात समान स्वरसंख्या व समान स्वर असावेत हे बंधनकारक नाही, त्यामुळे गणितीय पद्धतीने अनेक कॉम्बिनेशन तयार झाली. मात्र ते प्रत्येकच कॉम्बिनेशन प्रचलित झाले असे नाही त्याचे कारण म्हणजे ‘रंजयती इति राग:’ हा निकष आहे.  ‘थाट कुणीही गायल्याचे ऐकिवात नाही’ ह्याचा अर्थ कळणे आता सोपे जाईल. नुसते कच्चे ‘इनग्रेडियन्ट्स’ कुणी खाऊ शकत नाही(तसेच नुसता थाट कुणी गाऊ शकत नाही). त्यातून निर्माण होणाऱ्या ‘स्वादिष्ट’ पाककृतीचा मात्र आस्वाद घेता येतो(तसेच कानाला सुखावणाऱ्या स्वरसमूहातून उभे राहाणारे विश्व म्हणजे राग!).

रागाला आरोह-अवरोह असतात कारण तरच वर्तुळ पूर्ण करता येते. थाटाला आरोह-अवरोह नसतात किंवा इतरही काही नियम नसतात… तो फक्त एक ‘सेट ऑफ नोट्स’! पुन्हा वार्चेच उदाहरण देता येईल. आधी नुसता कच्चा तांदूळ व त्यावर मसाले, तिखट-मीठ, कच्च्या भाज्या खाऊन मग वरती गरम पाणी पिऊन कुणी मसालेभात/बिर्याणी खाल्ल्याचं समाधान मिळवू शकेल का!? त्या ‘इनग्रेडियन्ट्स’वर(रागातील स्वर) योग्य त्या पद्धतीने(रागनियम पाळून) संपूर्ण प्रक्रिया(ठराविक आकृतीबंधात विस्तार करून राग खुलविणे) केली गेली तरच रुचकर पदार्थाचा आस्वाद घेता येऊ शकतो(राग मनाला भावणारा ठरतो.).

क्रमशः…

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments