सुश्री संगीता कुलकर्णी

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “ चार नगरातले माझे विश्व ” – डाॅ.जयंत नारळीकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तक – चार नगरातले माझे विश्व–आत्मचरित्र

लेखक- डाॅ.जयंत नारळीकर

प्रकाशन – मौज प्रकाशन गृह

दिग्गज शास्त्रज्ञानं घडवलेलं रसाळ विश्वदर्शन

ही कहाणी आहे असामान्य बुद्धीमत्ता असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या वडिलांकडून आलेल्या बुद्धिमत्तेचा वारसा पुढे नेणा-या आणि आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणा-या भारतीय शास्त्रज्ञाची..

पाश्यात्य देशात व्यवसायाच्या अनेक संधी येऊनही त्या नाकारत आपल्या  मायभूमीशी असलेली नाळ कायम ठेवत भारतात परतलेल्या निगर्वी व्यक्तिमत्व असलेले डाॅ.जयंत नारळीकर…” चार नगरातले माझे विश्व ” हे त्याचं आत्मचरित्र…

प्रसिद्ध व्यक्तिभोवती एक वलय हे असतेच त्यात जर व्यक्ती डाॅ. नारळीकर यांच्यासारखी असेल तर ही उत्सुकता आपल्याला अधिक असते. अनेकदा प्रसिद्ध व्यक्तींची भाषणे लेख इ. हे सर्वांपर्यंत पोहोचलेले असते आणि माहीतही झालेले असते पण नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन डाॅ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या जीवनातले विविध पैलू या आत्मचरित्रात मांडले आहेत. आत्मचरित्र फिरतं ते बनारस, केंब्रिज मुंबई आणि पुणे या शहराभोवती…

यात केंब्रिजबद्दलची माहिती आपणास जास्त वाचावयास मिळते. त्याचे मुख्य कारण ते म्हणजे भारतीयांना केंब्रिजबद्दल असलेले  आकर्षण..  ते केंब्रिज मथ्ये असताना न चुकता (नियमितपणे) घरी आई वडीलांना पत्र लिहून आठवड्यातल्या घडामोडी कळवतं असतं. त्यांची ती सर्व पत्रे त्यांच्या आईने जपून ठेवली होती. आणि त्या पत्राचा उपयोग केंब्रिजचं दर्शन घडवताना करण्यांत आला आहे.

डाॅ. नारळीकरांनी आडनावाच्या कथेपासून सुरूवात केली आहे. ते म्हणतात नारळीकर हे नाव कशावरून आले असावे ? नारळी नामक गावातून आल्यामुळे, का नारळाच्या झाडांच्या लागवडीचे मालक असल्यामुळे ?  याची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. नारळीकरांच्या परसात आंब्याची झाडे होती. त्या झाडांना नारळाएवढे मोठे आंबे लागत म्हणून त्यांचे नाव पडले नारळीकर हे उत्तर गृहीत धरले तर एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे नारळीकरांचे मूळ आडनाव काय होते ? असो..  त्यांचे  वडिल केंब्रिज मधू उच्चविद्या विभूषित होऊन परतले ते बनारसला त्यामुळे डाॅ.नारळीकर यांचे बालपण बीएचयूच्या आवारातच गेले आणि शिक्षणही बनारसमध्ये झाले.

लहानपणीच्या आठवणी सांगताना त्यांनी १९४० ते १९५० च्या दशकातलं चित्रण रंजक पद्धतीने केले आहे. केंब्रिज मध्ये जाण्यासाठीची त्यांची धडपड आणि ट्रायपाॅस परिक्षेची तयारी यांची माहिती देताना  तिथल्या सामाजिक रूढी, परंपरा यांचं वर्णनही त्यांनी सुरेख केले आहे. हाॅएल यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या बरोबरचं संशोधन हा कालखंड वाचताना वैज्ञानिक भाषा कुठेही अवघडतेने मांडलेली नाही. संशोधनानंतर गृहस्थाश्रमातील प्रवेश मुंबईत ‘टीआयएफआर’ मध्ये केलेले काम, पुण्यात ‘आयुका’ ची उभारणी इत्यादींची माहिती त्यांनी अत्यंत सुरेख आणि सुबक पद्धतीने मांडली आहे..  जीएमआरटीचे नियंत्रण केंद्र पुण्यात सुरू करण्याची कल्पना आणि त्याही पुढे जाऊन सुरू झालेलं आंतरविद्यापिठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक केंद्राची स्थापना यांची कथा तर वाचण्यासारखी अप्रतिम अशी…

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शालेय जीवन ते आयुकातून निवृत्त होईपर्यंतच्या आपल्या प्रवासात भेटलेल्या दिग्गजांची व सहका-यांची ओळख त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत करून दिली आहे. त्यामुळे ते केवळ आत्मचरित्र न राहता त्या त्या कालखंडाची ओळख आपल्याला करून देणारा एक दस्तावेज..

या पुस्तकातून यशापयशाच्या भोव-यात सापडलेल्या आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल असे मला आवर्जून सांगावेसे वाटते…

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments