सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – १ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

” नीले, उद्या मी आणि आप्पा येतोय सोलापुरला.. येताना काय आणू मिरजेहून? ” – वहिनीचा खणखणीत आवाजातला प्रश्न..

आप्पा म्हणजे खरंतर प्रशांत, माझा एकुलता थोरला भाऊ… पण त्याकाळच्या पद्धतीला तंतोतंत अनुसरून… चुलत नि सख्ख्या भावांना अनुक्रमे तात्या, भाऊ, अण्णा, आप्पा, आबा अशी संबोधनं बहाल केलेली.. आप्पाची बायको स्वाती.. माझी वहिनी.. आईबाबांनंतर या दोघांनी माझं मातृ-पितृत्त्व स्वत:कडे घेतलेलं… म्हणूनच प्रत्येकवेळी माझ्याकडे येताना हा प्रश्न… उपचारापुरता…

खरंतर बसाप्पाची बर्फी, पेढे, खाजा, चुरमुरे आणि भलीमोठी ताजी भाजी त्यांच्याबरोबर येणार.. हे ठरलेलं..!! .. “ बाकी काही नको… फक्त लालमाठ आण”

दुसरे दिवशी हिरवीगार मेथी, कोवळा शेपू, पातळ पानांचा चाकवत, लालबुंद गाजरं, फिकट हिरव्या रंगावर पांढऱ्या नक्षीने सजलेली कृष्णाकाठची कोवळीझार वांगी नि लाल डाळिंबी रंगांची कोवळी पानं ल्यालेला ” तांबडा माठ ” अशा ” अवघ्या विठाई ” नं माझं स्वयंपाकघर उजळून निघालेलं…!!

” नुसतं बसणं म्हणजे पाप ” या विचारावर ठाम असलेली माझी वहिनी ” भाज्या निवडूनच ठेवूया लगेच ” म्हणत फरशीवर मांडी ठोकून बसलेली… — नि माझं मन केंव्हाच चाळीस वर्षे उलटा प्रवास करून मिरजेच्या घरात आईला शोधत पोहोचलेलं..!!

अगदी बाळबोध दिवस होते ते! – – आपलं घर, आपली माणसं, आपलं गाव, शाळा, मैत्रिणी, नातेवाईक.. लग्नकार्य, फक्त सुट्टीत गावाला म्हणजे मामा, मावशीकडे जाणं… एवढं चिमुकलं विश्व.. आनंदाच्या आकाशगंगेतलं!!

सकाळचा नाष्टा असा नसायचाच… असायचं ते खाणं… तेही भूक लागलेली असेल तरच… शिळ्या भाताचा तव्यावर परतलेला फोडणीचा भात, शिळ्या पोळीचा गूळ, तूप घातलेला लाडू किंवा कांदा घालून केलेली फोडणीची पोळी, आदले दिवशीची भाकरी उरलेली असेल तर दही, दूध, खाराची मिरची घालून केलेला दहीकाला, दहीपोहे, दूध पोहे, नागपंचमीच्या आसपासचे दिवस असतील तर दूध-लाह्याचं पीठ, भाजकी कणिक नि दूध आणि अगदीच काही नसेल तर आईनं करून ठेवलेला किंवा कुणाकडून तरी आलेला एखादा रव्याचा, बेसनाचा, राजगि-याचा लाडू..!!

पोरावळ, आलं गेलं, कामाच्या रगाड्यात अक्षरश: पिचलेल्या आयांची मजल यापलीकडे जाऊच शकायची नाही.. उद्या ब्रेकफास्टला काय करावं याचा विचार करणारी आजची स्टायलीश आई आणि इडली-सांबार, मेदूवडे, डोसे, पराठे, ऑम्लेट्स, सॅंडविचेस, ओट्स, उपमा, पोहे, फ्रूट्स, फ्रूट्स ज्युसेस असे अनंत पदार्थ काचेच्या टेबलावर मांडून मुलांना खाण्याचा आग्रह करणारी नि इडली आवडत नाही तर ऑम्लेट खा.. असं गोडीने विनवणारी मेकअप नि सुंदर कपड्यातील ती नाजुकशी आई टी. व्हीवर पाहिली की मला अक्षरश: रडू येतं… नि वाटतं ” अशीच आमुची आई असती तर…? “

” जे घरात आहे ते खायचं!! ” या ब्रिदवाक्यावर नि ” नाही खाल्लं एखादे दिवशी तर लगेच काही मरत नाही ” या प्रबळ विश्वासावर आमच्या काळच्या आयांनी आमचं संगोपन केलं… म्हणूनच ” मुलं भाज्या खात नाहीत तर काय करू? ” असले प्रश्न आमच्या आयांना कधी पडले नाहीत. आणि ” पराठे, कटलेट्स, थालीपीठ, वडे असे पदार्थ करून त्यांत न आवडणा-या भाज्या घाला ” अशी उत्तरंही कधी मिळाली नाहीत.

” भूक लागली की मुलं आपोआप खातात नि एखादं जीवनसत्त्व कमी पडलं ते मिळवण्यासाठी शरीर आपोआप ते जीवनसत्त्व असलेल्या भाज्या, फळं मागून घेतं..!! “.. या आई -आजीच्या सल्ल्यावर नि निसर्गाच्या कर्तृत्त्वावर श्रद्धा ठेवून मुलांना वाढवणा-या आमच्या आयांच्या विश्वासाला आमच्या पिढीनेही तडा जाऊ दिला नाही.. बोर्नव्हिटा, कॉम्पलान किंवा सप्लीमेंट्स न घेताही आमची छान वाढ झाली!!

अमावस्या, पौर्णिमेला पोळी… इतरवेळी रोज भाकरी… यात डाएट किंवा कॅलरीच्या हिशोबाचा गंधही नव्हता.. ज्वारी स्वस्त होती नि भाकरीला तेल लागायचं नाही… एवढ्याच आर्थिक हिशेबात बसणारं हे पोळीभाकरीचं गणित महिना कमी खर्चात पार पाडायचं!

डावीकडे शेंगा, जवस, लसूण, कारळे यांची सुकी चटणी, सणावाराला ओल्या खोब-याची चटणी, पाहुणे आले तर वर्षभरातील साठवणीतलं लिंबू, कैरी, मिरची यांचं लोणचं, काकडी/गाजर/बीट/कोबी यांची कोशिंबीर-कधी दह्यातली तर कधी लिंबू पिळून, कधी भोपळ्याचं नाहीतर वांग्याचं भरीत, वांगी/गवार/.. घेवडा/ कोबी/भोपळा/पडवळ/ तोंडली/कारली/दोडका इ. पैकी भाजी, आमटी/कढी आणि भात… नेहमी साध्या जाड्या तांदुळाचा आणि सणावाराला इंद्रायणी किंवा आंबेमोहराचा..

भातावर, पोळी -भाकरीवर आमची आई तूप मात्र आवर्जून वाढत असे… जेवणानंतर ताक न चुकता…

बाकी लोण्या-दह्याचे चोचले फक्त बाजरीची भाकरी, चकली, थालीपीठ, धिरडी यांपुरते!! उप्पीट, शिरा, पोहे, धिरडी, थालिपीठे, उकड.. हे पदार्थ संध्याकाळच्या खाण्यासाठी राखून ठेवलेले… पण मर्यादित… एखादी बशी भरून…

भाकरी, पालेभाज्या, पिठलं नि मूगडाळीची खिचडी रात्रीला आंदण दिलेली..

पक्वान्ने, मसालेभात, असे चविष्ट पदार्थ नि भजी पापडांसारखे तळणाचे पदार्थ सणा-समारंभांपुरते… जिभेच्या चोचल्यांसाठी नाहीत..

साबुदाणा खिचडी, बटाट्याचा चिवडा, राजगिरा लाडू, खजूर, शेंगदाण्याचा लाडू, केळी, चिक्कू, सफरचंदासारखी फळे.. दही, यांची बेगमी उपवासापुरती… एकादशी, महाशिवरात्र नाहीतर आई, आजीच्या उपवासादिवशी मिळणा-या चार चमचे साबुदाण्याच्या खिचडीची चव दिवसभर जिभेवर रेंगाळायची..

आईच्या नाजुक हातांनी भरवलेला मऊ गुरगुट्या गरम गरम मेतकूट-भात नि लिंबाचं लोणचं, लापशी, मऊसर सांजा, साजुक तुपातला शिरा, घसा शेकून देणारी उकड, तोंडाला चव यावी म्हणून कमी तेलातलं भरपूर लसूण घातलेलं धिरडं, खडीसाखर, काळे मनुके, मोसंब्याचा रस फक्त आजारपणात… म्हणूनच “पडू आजारी मौज हीच वाटे भारी “

इतर वेळेला मात्र शाळेत जाताना गडबडीत कसाबसा बोटांना पोळत तोंडात कोंबलेला वरण भात नि डब्यातली थंडगार पोळी नि गोळा झालेली, अनेकदा दप्तराला नि वह्या पुस्तकांना तेलाने अंघोळ घालणारी भाजी… नि लोणचं!

आईनं डबा भरून करून ठेवलेला पातळ पोह्याचा चिवडा, भडंग… कुठल्यातरी देवापुढे फोडलेल्या नारळापासून बनवलेले रव्याचे लाडू, नारळाच्या वड्या नाहीतर… बेसनाचे लाडू…

आई गावाला गेलेली असताना आम्ही दोघी बहिणींनी बनवलेले तेल, तिखट, मीठ लावलेले पोहे किंवा चुरमुरे… किंवा चुरमु-यात कांदा, कोथिंबीर नि चिंचेचं पातळ पाणी घालून केलेली नि आम्ही तिघा भावंडांनी मिटक्या मारत खाल्लेला तो भेळ नामक आंबटचिट्ट दिव्य पदार्थ (फरसाण, शेव विरहित)

अशा या नीरस खाद्ययात्रेमुळेच आम्हाला चिवडा, चकली, लाडू, अनारसे, शेव नि दिवाळी संपल्यावर बनणा-या मिसळीमुळे दिवाळीचे वेध लागत..

कधीतरीच होणारा मैत्रिणीचा वाढदिवस, वर्षातून एखाद-दुसरं होणारं कुणाचं तरी लग्न, पाहुण्यांकडची सुट्टी, घरातले सण-समारंभ अगदी श्राद्ध -पक्ष सुद्धा… यांचं फार आकर्षण वाटे … कारण या दिवशी वेगळ्या चवीचे, वेगळे खाद्यपदार्थ थोड्याशा चमचमीत स्वरूपात खायला मिळत…

हॉटेलच्या चमचमीत, चवदार चवीची चटक लागलेल्या नि कधीतरीच घरचं अन्न खाणा-या आजच्या पिढीला आमचं हे आकर्षण समजणारच नाही…

भरपूर आलं- लसूण, कोथिंबीर, मिरचीचं वाटण घालून केलेला बटाटा, फ्लॉवरचा रस्सा, भरली वांगी, डाळकांदा, वरणफळं किंवा चकोल्या, दगडासारखी झालेली असली तरी वेगळ्या चवीची इडली, तव्याशी झटापट करून तुकड्या-तुकड्याची गॅंग म्हणून जन्म घेणारा तथाकथित डोसा, टोमॅटो सार, केवळ भाज्या घातल्या आहेत म्हणून ज्याला पुलाव म्हणायचं असा बेचव भात… अशा पदार्थांनीही आमच्या ओसाड खाद्यजीवनात मरुस्थळं फुलवलेली आहेत…!!

रोजच्या पोळी भाकरी, भात, आमटीच्या त्याच त्याच चक्रात एकच गोष्ट वेगळेपणा आणायची –ती म्हणजे भाजी! रोजचं जेवणं बाकी सगळं तेच भाजी मात्रं वेगळी!!

त्या काळची भाजीही त्या काळासारखी शुध्द असे.. स्वत:ची चव, स्वत: चा रंग, स्वत:चा स्वाद.. स्वत:चं अस्तित्त्व राखणारी… आजच्या पंजाबी भाजीसारखी स्वत:ला कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, काजू यांच्या ग्रेव्हीत स्वत:ला समर्पित करून स्वत:ची ओळख संपवणारी नव्हे किंवा सोया-टोमॅटो किंवा व्हाईट सॉस, चीज अशा चिकचिकाटात स्वत:ला गुरफटवणारी चायनीज किंवा कॉंटिनेंटलही नाही…

कढईत टाकली की अख्ख्या गल्लीभर बातमी पसरावी अशी शेपूची भाजी मग ती डाळ घालून केलेली असो, पीठ पेरूनची असो नाहीतर वरणातली… माझ्यासारखा शेपू आवडणारा भाकरी नि शेपूच्या भाजीवर ताव मारेल किंवा न आवडणा-याला त्या दिवशी उपवास घडेल..

तुरट चवीचा नवलकोल… पादवायुसारख्या वासाचा.. तोही कुणाला तरी आवडणारा..

डाळ घालून कोबीची भाजी नुसतीही खावी अशी..

भरपूर ओल्या खोब-यातल्या मिरची, आलं घालून केल्या फ्लॉवरच्या भाजीला पोळीशिवाय मजा नाही.

भाजणी पेरून केलेली असो किंवा वाल घालूनची असो… पडवळाची भाजी मला आवडतेच..

श्रावणघेवड्याला मटकी नि आमसूल हवेच… पण त्याची लिंबू, ओले खोबरे घालून पचडी सरस…

गवारीला ओव्याशिवाय स्वाद नाही नि लाल भोपळ्याला मेथीशिवाय गंध नाही..

दुधीची भाजी ही निव्वळ फसवणुक आहे.. पण त्याच्या कापाला मात्रं तोड नाही..

भेंडी लहान मुलांना का आवडते, हे एक मोठं कोडं आहे..

दुस-याच्या मदतीशिवाय पानही न हलणारं वांगं.. मात्र त्यात भरलेल्या मसाल्यामुळे मिरवून घेतं.. कांदा, मसाल्यामुळे भरीताच्या रुपात आवडून जातं नि डाळवांगं म्हणूनही भाव खातं.. नशीबवान कार्टं..!!

पीठ पेरून असो, डाळ घालून असो नाहीतर गोळा भाजी असो.. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर… मेथी स्वत:च्या गंधाची पदोपदी जाणीव देत असते.. अगदी दुसरे दिवशीपर्यंत…

– क्रमशः भाग पहिला

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted