सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “रियाना” – लेखिका : सुश्री प्राची राजे ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक : रियाना 

लेखिका : प्राची राजे.

प्रकाशक : शॉपीजन (ऑनलाईन प्रकाशन) 

माननीय प्राची राजे यांनी लिहिलेली आणि शॉपीजन या ऑनलाइन प्रकाशकांनी प्रकाशित केलेली रियाना ही कादंबरी मी शॉपिजनच्या ॲपवरच नुकतीच वाचली. शॉपिजन ॲप द्वारा सातत्याने मराठी दर्जेदार साहित्य प्रसिद्ध होत असतं आणि अनेक वेळा मी ते अत्यंत आवडीने वाचत असते. त्यातलीच माननीय ‘प्राची राजे’ यांची ही ‘रियाना’ कादंबरी.

ही कादंबरी एकूण ५२ भागात लिहिली गेली आहे आणि प्रत्येक भाग वाचताना वाचकाची पुढील भागासाठीची उत्कंठा वाढत राहते हे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

मा. प्राची राजे यांची ही पहिलीच मराठी कादंबरी आहे. या कादंबरीचं समीक्षण करण्यापूर्वी मला लेखिकेविषयी काही कौतुकास्पद आणि ठळक बाबी नमूद कराव्याशा वाटतात ज्या समीक्षणाच्या दृष्टीने तितक्याच महत्त्वाच्या असू शकतात.

झारखंड जिल्ह्यात जन्माला आलेल्या, जमशेदपूरवासी, सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या माननीय प्राची राजे यांना त्यांच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा कधीही शिकवली गेली नाही. त्यांनी जे लेखन केलं ते इंग्रजी व हिंदी भाषेतूनच. अगदी पाच सहा वर्षांपूर्वीच त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले आणि इतक्या थोड्या काळातच त्यांनी कथानक, भाषा, शब्दशैली, व्याकरण या सर्व निकषांवर परिपूर्णतेने उतरलेली ‘रियाना’ ही मराठी कादंबरी वाचकांपुढे सादर करण्या इतपत मोठी झेप घेतली. त्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

आता आपण ‘रियाना’ कादंबरीच्या मूळ कथानकाचा संक्षिप्त आढावा घेऊया. मी जरी येथे “संक्षिप्तपणे” असा उल्लेख केला असला तरी ५२ भागातल्या या कादंबरीचं कथानक तसं गुंतागुंतीचं आणि विस्तृत आहे. मात्र वाचकाला पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाटेल आणि त्याची उत्कंठा टिकवून ठेवेल इतपतच कथानक इथे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कादंबरीची गोष्ट सांगितल्यासारखं लिहून मला वाचकांची वाचनातली मौज आणि आनंद हिरावून घ्यायचा नाही.

देवग्राम सारख्या खेड्यात, शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन नंतर स्वतःचा विकास, ज्ञानवृद्धी आणि व्यावसायिक ज्ञान मिळवण्यासाठी एक जिद्दी हरहुन्नरी, मेहनती, महत्त्वाकांक्षी युवक पुण्याजवळ पिंपरी येथे येतो आणि बघता बघता स्वतःचं भलं मोठं औद्योगिक क्षेत्र विस्तारित करून “जयवंत इनामदार” या नावाने प्रचंड नावलौकिक, प्रतिष्ठा मिळवतो. शेकडो एकर जमिनीवर त्यांचा व्यवसाय बहरतो.

कथा सुरू होते ती जयवंतराव इनामदार आणि त्यांची दिवंगत पत्नी प्रतिभा यांच्या कष्टाळू सहजीवनाने प्राप्त झालेल्या यशापासून आणि हे अधोरेखित करणार्‍या त्यांच्या प्रासादासारख्या घरात साजरा होणार्‍या” सत्तराव्या कौटुंबिक वाढदिवस समारंभाने आणि नंतरची शेवटपर्यंतची कथा त्यांची तीन मुले अनंत, प्रदीप आणि सुदर्शन म्हणजेच सनी आणि सुना वृषाली, मधुरा, नातवंडे आणि इतर सहाय्यक पात्रांच्या भोवती गुंफली जाते. तीन पिढ्यांचं प्रतिनिधित्व या कादंबरीच्या कथेत आहे.

अनंत आणि वृषालीची तीन नंबरची, दोन मुलांच्या पाठीवर, ” मुलगी हवीच” म्हणून झालेली मुलगी अर्थात ‘रियाना’ हीच या कादंबरीची नायिका आणि मुख्य पात्र असली तरी या कादंबरीतलं प्रत्येक पात्र हे कथानकाच्या गुंफणीत महत्त्वाचं ठरतं.

अनंत आणि प्रदीप हे जयवंतरावांच्या व्यवसायाचा वारसा यशस्वीपणे सांभाळत असतात. सनी थोडा वेगळा म्हणजे वडिलांच्या व्यवसायाचा भाग न बनता स्वतंत्रपणे उद्योगात व्यस्त. भावाभावांच्या नात्यात तसा काही बेबनाव सुरवातीला जाणवत नाही. मात्र जयवंतराव ज्यांना आबासाहेब म्हणून संबोधले जायचे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते त्यांचे “फोर स्टार हॉटेल- प्रतिभा रिसॉर्ट” आणि तिथला कारभार “सनीच्या” नावाने करतात. त्यानंतर काही दिवसातच त्यांचा रहस्यमय मृत्यू होतो आणि याच वळणावर कादंबरीचे कथानक अत्यंत प्रभावीपणे पुढे उलगडत जातं. येथे आणखी एक जाणवतं की या कथानकाचे दोन स्वतंत्र भाग आहेत. त्यात पहिला भाग आबासाहेब, त्यांच्या समृद्धीचा आणि रहस्यमय मृत्यूचा. दुसरा भाग रियानाच्या जन्माचा आणि जन्मत:च असलेल्या तिच्या व्यंगांचा, त्यातूनच तिची परिवाराकडून होणारी केवीलवाणी भावनिक आणि शारीरिक हेळसांड याबद्दलचा. मात्र कादंबरीतलं नायिकेचं पद प्रभावीपणे टिकवत कथानकातल्या या दोन्ही भागांचं अतिशय बेमालूमपणे एकत्रीकरण होत कथानक निर्णायक पद्धतीने समाप्त होते.

आबासाहेबांचा मृत्यू की खून, रियानाची आत्महत्या की अपघात आणि या दोन्ही घटनांचे एकमेकांशी असलेले संबंध काय? निष्पाप रियानाचं होणारं शारीरिक शोषण का आणि कोणाकडून? या सर्व प्रश्नांची उत्तरे कादंबरी पूर्ण वाचल्यावरच धक्कादायक पद्धतीने वाचकाला मिळतात आणि या संपूर्ण कथानकाद्वारे जो संदेश लेखिकेला वाचकापर्यंत पोचवायचा आहे तो अत्यंत परिणामकारकरीत्या पोहोचवला जातो आणि त्याच बिंदूपाशी कादंबरी वाचून संपल्यानंतर वाचक उदास, सुन्न आणि “या अनैतिक प्रकाराला आळा बसलाच पाहिजे” या ठाम विचारापर्यंत येऊन पोहोचतो.

या कादंबरीतली मुख्य पात्रे म्हणजे ‘रियाना’, जयवंत इनामदार (आबासाहेब) त्यांचे मुलगे अनंत, प्रमोद, सुदर्शन उर्फ सनी आणि त्यांच्या पत्नी वृषाली आणि मधुरा. या सर्व पात्रांची परस्परांशी असलेली कौटुंबिक नातीही अनेक कंगोरे असलेली आहेत. कधी प्रेमाची, तर कधी द्वेष, मत्सर, चढाओढ आणि स्वार्थीपणाची, तितकीच संशयाचीही. एका धनाढ्य कुटुंबातली ही सारी जवळची नाती वेगवेगळ्या घटनांतून, संवादातून लेखिकेने अगदी सहजपणे उलगडलेली जाणवतात. प्रत्येक पात्राचं व्यक्तिमत्व, स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांच्या मनात चाललेली विविध मानसिक अंदोलने लेखिकेने अत्यंत समरसतेने आणि स्वतःला अलिप्त ठेवत त्या काल्पनिक पात्रांना रंगवलेले असल्यामुळे कादंबरीतल्या या व्यक्ती आणि घटना वाचकांच्या डोळ्यासमोर उभी राहतात. नायिकेच्या भूमिकेत असलेली नऊ दहा वर्षाची निष्पाप, आईवडिलांच्याही प्रेमाला पारखी झालेली, किंबहुना नकोशीच वाटणारी आणि घरातच होणाऱ्या अनोळखी किळसवाण्या शारीरिक शोषणामुळे भयभीत, भेदरलेली बालिका जिला स्वतःच्या भावना व्यक्तही करता येत नाहीत तिच्याविषयी मात्र वाचकाला करुणा, दया, उत्पन्न होऊन तिचं केविलवाणेपण सहन न होउन ठायी ठायी डोळे पाणावतात.

एका श्रीमंत कुटुंबातला, दिखाऊ, बेगडी प्रतिष्ठितपणा, लालसा, लोभ यांचा झालेला परिपाक आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी भक्ष्य बनलेल्या नायिका रियानाचे कथित वाचताना, कल्पनेत बघताना काळीज चिरत जाते.

आबासाहेबांच्या अत्यंत विश्वासातली माणसं म्हणजे वासुदेव आणि पद्माबाई पण ज्यांच्यावर विश्वास ठेवावा त्यांनीच पाठीमागून वार करावा अशी ही खल प्रवृत्तीची माणसे लेखिकेने अत्यंत ताकदीने उभी केलेली आहेत. त्यांच्याबद्दल वाचकांच्या मनात चीड, लज्जा, घृणा उत्पन्न करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

या पात्रांव्यतिरिक्तही अनेक सहाय्यक पात्रे या कादंबरीत आहेत जी कथानकाच्या ओघात चपखलपणे बसतात. त्यामुळे कादंबरी वाचताना जाणवतं की यातलं कुठलंही पात्र अनावश्यक, घुसडलेलं नाही.

या कादंबरीत विश्वसनीय पात्रे विश्वासघातकी होतात, तुटलेली नाती पुन्हा जुळली जातात, पश्चाताप आणि मन परिवर्तन झालेलं इथे अनुभवायला मिळतं. रियानाच्या आणि आबासाहेबांच्या मृत्यूचं कारण आणि रहस्य शोधताना एकेकाळीची अहंकारात वावरणारी आणि म्हणून दुरावलेली नातेवाईक मंडळी, एकमेकांवर संशय घेणारी माणसंही आपल्या हातून झालेल्या अक्षम्य चुकीची एकमेकांना कबुली देत अखेर न्याय मिळवून देण्याच्या एका चांगल्या कारणासाठी कशी एकत्र येतात या सार्‍यांचे शाब्दिक वर्णन अत्यंत अकृत्रिम रित्या आणि वाचकाला पटवत वास्तवापर्यंत नेण्यात लेखिका संपूर्णपणे यशस्वी झालेली आहे.

एखादी नदी जशी उंच सखल भागातून, कधी संथ, खडकातून फेसाळत, वळणावळणांनी वाहत तिची ठरलेली दिशा आक्रमते तशीच या कादंबरीतली गोष्ट पुढे पुढे जात राहते.

या कादंबरीत एका समृद्ध परिवाराच्या माध्यमातून गूढता, रहस्यमयता, औत्स्युक्य, अतिन्द्रियता मृतात्म्याचे अस्तित्व अथवा ऋणानुबंध जे अवैज्ञानिक अथवा अविश्वासनीय वाटत असले तरी मूळ कथेची गरज ओळखून, कथानकाशी पूरक पद्धतीने गुंफलेले आहेत. “असंही होऊ शकतं’ असू शकतं” या विचारापर्यंत वाचक मनाने पोहोचतो हे विशेषत्वाने सांगावसं वाटतं. या कथानकात उणीव भासते ती फक्त थोड्यातरी, गंभीरतेपासून क्षणभर दूर करणार्‍या विनोदाची पण मूळ विषयच गंभीर विचार देणारा असल्यामुळे तेही बाजूला ठेवता येते.

या संपूर्ण घटनात्मक कादंबरीचा मूळ उद्देश म्हणजे समाजात चाललेले बालकांचे लैंगिक शोषण आणि गरिबी, असहाय्यता याचा फायदा घेऊन, चमकती आमिषे दाखवून होणारी मानवी नीच, हीन तस्करी आणि या गुन्हेगारी वृत्तीला, विकृतीला चव्हाट्यावर आणून कायद्याने कडक शासन व्हावे ही अपेक्षा. अशा वृत्तीला कठोर कायद्याची दहशत बसवून या अनैतिकतेला समूळ नष्ट करण्याची तळमळ.

हा एक ज्वलंत सामाजिक प्रश्न माननीय प्राची राजे यांनी रियाना कादंबरीत अत्यंत कळकळीने, धाडसाने आणि प्रामाणिकपणे मांडलेला आहे आणि वाचकाचे डोळे उघडण्यात त्या खरोखरच पूर्णपणे यशस्वी ठरल्या आहेत.

समाजातली नीतीमूल्ये टिकवण्यासाठी एक “आय ओपनर” कादंबरी असेच मी म्हणेन.

सत्तर एम. एम. स्क्रीनवर एखादा सातत्याने उलगडत जाणारा घटनापट पहावा तशी ही कादंबरी वाचली जाते. विचारी मनावर गारुड करते. एकाच वेळी उद्विग्न करते आणि सामाजिक जाणीवही देते. सर्वांनी जरूर वाचावी अशी ही कादंबरी “रियाना”

प्राचीताई तुमचे मनापासून अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

“शॉपीजन” प्रकाशकांचेही इतकी सुंदर कादंबरी प्रकाशित केल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि आभार!

 धन्यवाद!

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments