श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ आजोबांच्या व्रताचा वसा… इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद : श्री मकरंद पिंपुटकर 

तीन महिन्यांपूर्वी, कॉलेजात जाणाऱ्या माझ्या मुलाने आमच्या स्कूटरचा अपघात केला. चूक त्याचीच होती — स्कूटर चालवताना हा दीडशहाणा मोबाईल बघत होता. नशीब चांगलं की त्याला फारसं लागलं नाही आणि त्याच्या स्कूटरमुळे दुसऱ्या कोणाला काही झालं नाही. पण स्कूटरचा पार सत्यानाश झाला होता.

मेकॅनिकने दुरुस्तीचा खर्च भरमसाट सांगितला होता – ११, ००० रुपये. गाडी जुनी असल्याने गाडीच्या विम्याचे काही फारसे पैसे मिळणार नव्हते, आणि स्कूटरची गरज तर आम्हाला खूप होती.

करोनामध्ये नवऱ्याची नोकरी गेली होती, मोठ्या मिनतवाऱ्या करून एका इमारतीत रखवालदाराची नोकरी मिळाली होती – दहा हजार मिळायचे, पण दरमहा त्यातले हजार रुपये नोकरी लावणाऱ्या मध्यस्थाला द्यावे लागायचे. मला एका ठिकाणी पार्ट टाईम नोकरी होती, उरलेल्या वेळात मी डबे करायचे, तेच पोचवण्यासाठी स्कूटर लागायची.

त्या गॅरेजमधल्या एकाने माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले, आजूबाजूला कोणी नाही बघून त्याने हळूच मला एका दुसऱ्या गॅरेजबद्दल सांगितलं, “एक म्हातारा कारागीर आहे तिथं. जुगाड करतो, कमी किंमतीत काम होईल तुमचं. बघा तुम्हाला चालतंय का ते. “

स्कूटर कशीबशी चालवत मी त्या पत्त्यावर पोचले. एखाद्या भंगारखान्यासारखं दिसत होतं ते गॅरेज. सगळीकडे गंजलेल्या, तुटक्या फुटक्या स्कूटर्स, मोटार सायकली होत्या. रंग उडालेला, पोपडे निघणारा गॅरेजच्या नावाचा फलक कसाबसा लटकलेला होता. मी गाडी मागे घेऊन परतच जाणार होते.

तेवढ्यात गॅरेजमधून एक वृद्ध माणूस बाहेर आला. त्याचे वय पंचाहत्तर असावे, कदाचित त्याहूनही जास्त. ग्रीस लागलेले कपडे. हात थोडे थरथरत होते.

“स्कूटरला काय झालं मुली? ” त्याने विचारले.

मी त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. त्या आजोबांनी गाडीकडे पाहिले, ते काहीतरी पुटपुटले आणि गॅरेजमध्ये गेले. काही मिनिटांनी एका कागदावर कसलासा हिशेब घेऊन ते परत आले, “मी ३, ००० रुपयांमध्ये दुरुस्त करून देतो. “

माझा विश्वास बसेना, ” अहो, पण सर्व्हिसिंग सेंटरवाले तर… “

“ते नवीन सुटे भाग आणि महागडा रंग वापरतात, इंग्लिशमध्ये यस फ्यस करतात, ” आजोबा म्हणाले, “मी नवेकोरे पार्ट्स नसेन वापरत, पण चांगले असले तरच वापरतो. गाडी १००% सुरक्षित असण्याची गॅरंटी माझी. ३, ००० रुपये. “

हे बिल नक्कीच कमी होतं, पण माझ्याकडे तेवढेही पैसे नव्हते. “आणि… मी पैसे कधी देऊ? “

“तुम्ही आता १, ००० रुपये देऊ शकाल का? बाकीचे जसे जमतील तसे द्या. काही घाई नाही. “

मी तिथेच उभी राहिले. “तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत आहात? “

त्यांनी आयुष्य अनुभवलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. “करोनाने माझा तरुण मुलगा माझ्यापासून हिरावून नेला. बायको आधीच वारली होती. लेक लग्न होऊन दुसऱ्या शहरी गेलेली. मी एकटा पडलो. मी सैरभैर झालो होतो. तेव्हा एकाने मला मदत केली, औषधं, जेवणखाण, पैसे – हर तऱ्हेने मदत केली. तो दर दिवसाआड मला भेटायला यायचा.

मुलाच्या जाण्याच्या दुःखातून बाहेर यायला मला तीन चार महिने लागले. त्या भल्या माणसाने माझ्याकडून एक रुपयासुद्धा घेतला नाही. “कोण्या गरजवंताला मदत कर, ” तो मला म्हणाला. मी काही फार पैसा बाळगून नाही, बजाजमध्ये नोकरी करून निवृत्त झालो होतो. कोणाला नगद पैसे देता येणार नाहीत मला, पण दुचाकी दुरुस्त करता येतात मला. मग तेव्हापासून हेच काम पुन्हा करू लागलो, ” आजोबा सांगत होते.

दोन दिवसांत त्यांनी माझी स्कूटर दुरुस्त केली, एकदम ठणठणीत. मुलाला घेऊन मी स्कूटर आणायला गेले होते, आजोबांनी खोटंच दटावत माझ्या लेकाचा कान धरला, “पोरा, अपघातात स्कूटरचं काही नुकसान झालं, तर मी दुरुस्त करायचा प्रयत्न करेन, पण तुला काही दुखापत झाली, तर तुझ्या आईकडे कोण बघणार? “

जसं जमेल, जेव्हा जमेल तेव्हा दर दहा पंधरा दिवसांनी मी २०० – ५०० रुपये घेऊन त्यांच्याकडे जायचे. दर वेळी कोणीतरी आपली बिघडलेली दुचाकी आणि विस्कटलेलं आयुष्य घेऊन त्यांच्याकडे आलेलं असायचं, कोणाचं पेन्शन अजून जमा झालेलं नसायचं, कोणाला कामावरून कमी केलेलं असायचं, कोणी परराज्यातून आलेला असायचा – पार मोडकळीला आलेल्या जुन्यापुराण्या गाड्या – आजोबा सगळ्यांना उभारी द्यायचे, नवा आशावाद द्यायचे, उभारी द्यायचे – आणि हे सगळं कमी किंमतीत, सुलभ हप्त्यावर, किंवा अनेकदा फुकट.

जेव्हा मी माझं शेवटचं पेमेंट करत होते, तेव्हा न राहवून, मी त्यांना विचारलं, “हे चॅरिटी वगैरे सगळं ठीक आहे, पण तुमच्या पोटापाण्याचं काय? “

“काही जण एकरकमी सगळे पैसे देतात, त्यावर थोडाफार गुजारा होतो. बरेच जण पैसे देऊ शकत नाहीत, त्यामुळे माझी अजून गरज आहे हे जाणवत रहातं. “

मध्ये बराच काळ लोटला, आज आत्ता डबे द्यायला गेलेला मुलगा सांगत आला, तो आजोबांच्या गॅरेजच्या बाजूला गेला होता, तर आजोबा दिसले नाहीत, आणि गॅरेजवर “for sale” असा बोर्ड लागला होता.

मी चरकले, मोबाईलमधला त्यांचा नंबर हुडकला आणि फोन केला, फोन त्यांच्या मुलीने उचलला. “बाबा आजारी आहेत, वय झालं त्यांचं. आता घरी आले आहेत हॉस्पिटलमधून. प्रकृती जरा आणखी सुधारली की मी त्यांना माझ्या सासरी घेऊन जाईन. म्हणून गॅरेज विकायला काढलं आहे. ” 

मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. ते झोपले होते, अंगात ताकद नव्हती अजिबात.

“मी त्यांचे हिशेब पहात होते. बँकेत फक्त १८, ००० रुपये आहेत त्यांच्या. त्यांची जमाखर्चाची वही पाहिली. ७२ जणांकडून पैसे यायचे बाकी आहेत – सगळे मिळून पाच लाखांच्यावर येणं बाकी आहे, पण बाबांनी त्या उधारीसमोर नोंद केली आहे – उधार माफ केली आहे, माझ्या पैशांच्या गरजेपेक्षा ही स्कूटर त्यांना मिळणं जास्त गरजेचं आणि महत्त्वाचं होतं. “

मी त्या सगळ्यांची नावं आणि फोन नंबर घेतले आणि सगळ्यांना निरोप दिले.

दोन दिवसांनी आजोबांच्या मुलीचा फोन आला, आजोबा वारले होते.

आम्ही सगळे अंत्यसंस्काराला गेलो होतो, उधार बाकी असलेले तर आले होतेच, पण बाकीचेही अनेक जण – आम्हा सगळ्यांना आजोबांनी वेळोवेळी मदत केलेली होती.

आम्ही सगळ्यांनी आम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे पैसे गोळा केले होते, आजोबांचे उधार तर पूर्ण झालेच, थोडे आणखी पैसेही जमा झाले होते. आम्ही ते सगळे पैसे त्यांच्या मुलीला दिले.

नंतर, माझ्या मुलाने मला विचारले, “आई, तू का रडत आहेस? तू त्यांना फारसं ओळखतही नव्हतीस. ”

“कारण, ” मी त्याला म्हणाले, “त्या माणसाने मला एक अशी गोष्ट शिकवली, जी माझ्या – तुझ्या पिढीने शिकायला हवी. दररोज, आपण लोकांना पाहतो. त्यांच्या अडचणी पाहतो, त्यांच्या बिघडलेल्या गाड्या, त्यांचे रिकामे खिसे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांची बिनसलेली मनं. आता तुला ठरवायचं आहे – यांना तू मदत करणारा होणार आहेस का त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणारा? ”

मला काय म्हणायचं आहे हे माझ्या मुलाला समजले. गेल्या महिन्यापासून, तो एका अनाथाश्रमात जाऊ लागला आहे – तिथल्या मुलांना तो शिकवतो. त्याबद्दल बडेजाव करत नाही, पण नियमितपणे जातो.

आजोबांच्या व्रताचा वसा आता माझ्या मुलाने घेतला आहे.

(एका इंग्रजी कथेचा स्वैर अनुवाद.) 

इंग्रजी लेखक : अज्ञात

मराठी अनुवाद : मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे – मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments