श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “धर्मसंकट!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
सुभेदार.. – मेजर सेंगर साहेब – कारगिल युद्धातील विजयाचे प्रातिनिधिक चित्र
मेजर बाळू मोहारे
“ब्रावो, तुम नीचे चले जाव… यह मेरा हुकुम है! ”
मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे… हे एवढं १९५ मीटर्सचं अंतर चढून गेलं… दोन रात्रींत की… भारतीय सैन्याचे शूर जवान पाकिस्तानी खंदकांमध्ये घुसून हाहा:कार माजवणार आणि शत्रूला तिथून हुसकावून लावणार हे निश्चित होतं… ही सैन्यचौकी परत भारताच्या ताब्यात येणार हेही निश्चित होतं. आणि असं असताना सर्वांत पुढे असणा-या सैनिकाला मोहिमेचे प्रमुख लष्करी अधिकारी आज्ञा देत आहेत… माघारी फिर!
“नाही, साहेब! मी माघारी नाही जाणार मोहिम अर्धवट सोडून! ” ब्रावो निर्धाराने म्हणाला!
तो पर्वत त्याच्या मागील बाजूने पाच हजार फूट उंच वर चढून जायचं होतं. खरं तर पुढच्या बाजूने चढत जाणे सोपे आणि कमी वेळ घेणारं होतं… पण या बाजूने वर चढण्याचं धाडस करणं म्हणजे मरणाला स्वत: हाक मारण्यासारखं! कारण कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांच्या वेशात घुसखोरी करून भारताची काही ठिकाणं काबीज करून ठेवलेली होती. अनेक तरुण वीरांच्या प्राणांची बलिदाने देत देत ही सर्व ठिकाणं पुन्हा हस्तगत करण्याची मोहीम सुरु होती. या ठिकाणांपैकी हा पर्वत एक अतिशय अवघड आणि उंच पर्वत होता. शत्रू पर्वताच्या त्या उंच शिखरावर खंदक बनवून बसला होता.. आणि शत्रूच्या सैनिकांची संख्या होती दोनशेपेक्षा अधिक. आणि शस्त्रसज्जता खूप आधी, नियोजनपूर्वक करून ठेवलेली होती. उंचीवर असल्याचा फायदा घेत पाकिस्तान वरून भारतीय फौजांवर थेट आणि अचूक गोळीबार करू शकत होता. आणि म्हणूनच ही पोस्ट पाकिस्तानच्या हातून परत हिसकावून घेणं अनिवार्य झालं होतं!
मेजर साहेबांनी निवडक वीस जवान सोबत घेतले. योजना तयार होतीच. पण योजना कागदावर जेवढी सोपी वाटत होती तेवढीच अंमलात आणायला महाकठीण. या बाजूने कधीच कुणी वर चढून येऊ शकणार नाही, अशी खुद्द शत्रूचीच खात्री होती. कारण, चढण भयावह सरळसोट. त्यात बर्फ. पाय ठेवण्यात किंचित चूक म्हणजे हजारो फूट खाली कोसळून मृत्यू ठरलेला. इथून वर चढण्याचा विचार कोण करेल?
हा विचारच नव्हे तर कृतीही करू शकणारी एक सेना जगात आहे… भारताची… हिंद की सेना! एक प्रचंड वळसा घेत सेना निघाली. प्रत्येकाच्या खांद्यावर जगण्यासाठी, झोपण्यासाठी आणि लढण्यासाठीचं सारं अत्यावश्यक साहित्य… वजन खूप.. किमान चाळीस किलो तर निश्चित! एखादा ग्राम जरी वजन कमी नेता यावं म्हणून खाद्यपदार्थांची वेष्टने सुद्धा काढून टाकलेली होती… कारण शरीर त्याच्यावर लादलेल्या प्रत्येक ग्रामचा हिशेब मागत राहतं चालताना, डोंगर चढताना. पायांत खास बर्फातले बूट… बर्फातून वाट काढायची होती… आणि विरळ हवेतील प्राणवायू शक्ती लावून शरीरात ओढून घ्यायचा होता.
सारा प्रवास रात्रीच्या अंधारात… तशी चंद्रप्रकाशाची थोडीसी सोबत मिळायची पण ती थोडीशीच. चालताना चंद्रप्रकाशही धोक्याचाच होता. वरून जर शत्रूने खाली पाहिले आणि त्याला हालचाल दिसली तर प्राण वाचणार नाहीत असा गोळीबार होणार. दिवसा चालण्याचा प्रश्नच नव्हता. दिवस उजाडू लागला की पांढ-या रंगाचा पोंचू म्हणजे पावसाळ्यात घालतात तसा कोट अंगावर घ्यायचा आणि काहीही हालचाल न करता बर्फात पडून राहायचं… बर्फ मरणाचं थंड… तापमान दर्शवणारा पारा खाली खाली सरकतो आहे. लपण्यासाठी आडोसा कुठेच नाही… सर्वजण जमेल तिथे झोपून जात… पण झोप केवळ म्हणायला… दिवसभर वेळ घालवण्यासाठी गप्पा आणि हास्यविनोद… दबक्या आवाजातले! मोहिमेच्या मुख्य दोन-तीन जणांनी तर ठरवून टाकलं… पुढे आयुष्यात याच जागी यायचं आणि दिवस असाच काढायचा! मरणाच्या वाटेवर चालत असताना भविष्यकाळाचा विचार केवळ शूरच करू जाणे! तसं मोहिमेवर निघताना कमांडर साहेबांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रिय व्यक्तीच्या नावे एक पत्र लिहून द्यायला सांगितलं होतं. जो कुणी मोहिमेवरून परतू शकणार नाही, त्याच्या घराच्या पत्त्यावर हे पत्र पोहोचवले जाणार होतं!
रात्रीचे चालणं आणि दिवसा बर्फात एखाद्या दगडासारखं पडून राहणं… असं पाच-सहा दिवस चाललं. मुख्य पर्वत लागला तेंव्हा एका रात्रीत शे-सव्वाशे मीटर्सच प्रवास होई… पुढे चालणारे… नव्हे बर्फाच्या पहाडाला स्वत:चं शरीर चिकटवून वर वर जाणारे दोन जवान. अत्यंत अनुभवी आणि कुशल. त्या पर्वतीय भागाची खडानखडा माहिती असलेले जुने जवान. कमरेला दोर. एका हातात टोकदार कुदळ-कु-हाड. खांद्याच्या थोडंसं वर बर्फात कु-हाड टोचायची… मग दुस-या हातातली कु-हाड टोचायची… त्या कु-हाडीवर शरीराचं वजन पेलायचं… एक पाय खालच्या किंचितशा कपारीवर टेकवायचा… पहाडाच्या छातीत खिळा ठोकायचा… त्यात दोर ओवायचा… दोर खाली सोडायचा… त्या दोराला धरून खाली थांबलेले सैनिक वर चढणार… असे एक पाऊल वर टाकायचे म्हणजे घरच्या सपाट बागेत पंधरा मिनिटे सलग फावडे मारण्याइतके श्रम. कोपरापासून हात थंडीने आकडून जायचे. म्हणून एका वेळी एकाने एकएकदा दोर लावण्यासाठी वर जायचे… असे दोघे जण आळीपाळीने हे काम पार पाडीत होते… अजून वरून शत्रूने पाहिले नव्हते! या प्रवासात किती विश्रांती मिळाली असेल? काय खाल्ले असेल? शरीरधर्म कसा पार पाडला असेल? कुटुंबियांची किती आठवण आली असेल? शेवटच्या पत्रात काय लिहिलं असेल? शत्रू संख्येने किती आहे हे माहीत नाही… मोहिमेचा शेवट कसा होईल हे ठाऊक नाही! पण सैनिकांची पावलं थबकली नव्हती!
वाटेतल्या एका विशिष्ट जागी जवळचं इतर साहित्य ठेवलं गेलं… कारण ते घेऊन वर चढणं कठीण जात होतं. दोर लावून झाला की परत यायचं आणि हे साहित्य सोबत आणण्यासाठी जोडी जोडीने जायचं आणि यायचं. हे अंतर सुमारे दीडशे मीटर्स होतं. एकेदिवशी हे सामान परत आणायला गेलेल्या सैनिकांच्या जोडीच्या हालचाली शत्रूने टिपल्या… त्यांना आपले सैनिक दिसले नाहीत… पण एके ठिकाणी काही खुणा दिसल्या असाव्यात… त्यांनी त्या जागी बॉम्बगोळे टाकले. ते दोघेही सैनिक जबर जखमी झालेच असावेत!
आता पुढे आलेले अधिकारी आणि एक डॉक्टर त्यांच्या B. F. N. A. (Battle Filed Nursing Assistant) सह मागे पळत निघाले… बर्फात पळणं म्हणजे जमेल तेवढं वेगात चालणं. तेवढ्यात ते दोघे सैनिक यांच्याकडेच येताना दिसले… पुढे असणा-या सैनिकाच्या हातातून रक्ताची धार लागलेली होती.. दुसरा सैनिक त्याच्या काही पावलं मागे होता… डॉक्टर पुढे झाले आणि त्या सैनिकाचा हात हातात घेऊ लागले… तेवढ्यात त्या सैनिकाने डॉक्टरांना जोरात मागे ढकलले… आणि म्हणाला… ”साहब… पिछे वाले मेरे बडी को देखो… उसके सिर में घाव हुआ है! ”
डॉक्टर आणि नर्सिंग असिस्टंट मागे धावले… बॉम्बचा एक तुकडा त्या सैनिकाच्या डोक्याला खोलवर जखम करून गेला होता… रक्त वाहत होतं… त्याही गडबडीत नर्सिंग असिस्टंटने त्या सैनिकाच्या डोक्यावरचे त्या जखमेवरचे केस काढले… आणि एखाद्या सुसज्ज ऑपरेशन थिएटर मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स घालतात तसे अचूक, नीटस टाके घातले… त्यामुळेच त्या सैनिकाचे प्राण वाचणार होते. सैनिकांनाच नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते… रक्तस्राव थांबवणे, रुग्णाला स्थिर करणे, उपचारासाठी तिथून हलवणे अशी कौशल्ये सैनिकांना अवगत असतात. सफाईदारपणे रायफलचे ट्रिगर्स दाबणारी खडबडीत बोटं एखाद्या विणकर पक्ष्यासारखे नाजूक, अचूक टाके घालतात हे विशेषच म्हणावे लागेल.
आता केवळ १९५ मीटर्स अंतर उरलं… ते चढून गेलं की थोडी सपाट जागा येईल. तिथं शत्रूचे खंदक असतील… शत्रू आरामात खंदकाच्या खोलीत खोलवर बसून गोळीबार करीत असेल… आणि आपण त्यांच्यावर तुटून पडायचं!
शेजारच्या पहाडांवरून आपले इतर सैनिक आपल्या या बहादरांचा प्रवास पाहू शकत होते… श्वास रोखून. शत्रूला गुंतवून ठेवण्यासाठी आपल्या तोफा खालून वर मारा करीत होत्याच पुढच्या दिशेने… यांना मागून वर चढता यावं अशासाठी ही योजना होती. ही शेवटची चढण चढायला आरंभ करण्याच्या वेळी, म्हणजे अंधार पडायच्या बेतात असताना या मोहिमेच्या प्रमुखाला वरिष्ठ पातळीवरून वायरलेस मेसेज आला… ”ब्रावोला परत पाठवून द्या! त्याच्या घरी आणिबाणीची वैद्यकीय परिस्थिती उदभवली आहे. त्याचे घरी असणे अत्यावश्यक आहे! ”
ब्रावो बर्फाच्या एका कड्याखाली वर चढायला सुरुवात करण्याआधी थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून बसला होता… साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं… त्याच्या चेह-यावर नेहमीचं एक हास्य होतं… पण त्या हास्याच्या थराखाली एक पुसटशी चिंताही दिसली! सैन्यात बारा-पंधरा वर्षांची सेवा झालेला ब्राव्हो… गावाकडे कुटुंब… आई-वडील, पत्नी. आदर्श मुलगा आणि प्रेमळ पती म्हणून गावात याची ओळख. एक शल्य मात्र मनाला टोचणी लावून होतं… पदरी अपत्य नव्हतं. पत्नी दोनदा आई होण्याच्या अगदी जवळ असतानाच वैद्यकीय कारणांनी घात केला… आणि अपत्यसुख दूर गेलं.
आणि आज मोहिमेच्या प्रमुख साहेबांना बेस वरून मेसेज आला आहे… पत्नी त्याच अवस्थेत आहे… यावेळी तिच्या जीवाला खूप धोका आहे! या मोहिमेच्या प्रमुखांसमोर एक यक्षप्रश्न उभा राहिला. मोहिम महत्त्वाची आहे… हा सैनिक महत्त्वाचा आहे… त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानेच इथवर दोर लावत लावत आपल्या दलाला सुरक्षित आणलं आहे… आता तर एक दोन रात्रीचीच चढण शिल्लक आहे! पण हा ब्रावो तर जीवाला जीव देणारा… तहान-भूक हरपून याने काम केलं आहे! आता याच्या पत्नीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा तिच्याजवळ तिच्या या निकराच्या प्रसंगी असला पाहिजे… कारण घरी म्हातारे आई-वडील… अशावेळी आपलं माणूस जवळ असावं!
मोठ्या काळजाच्या प्रमुखाने त्याही स्थितीत एक निर्णय घेतला… ब्रावोने त्याचं काम चोख बजावलं आहे… आता आम्ही उरलेलं काम करू! ते म्हणाले, ”ब्रावो… निघ. घरच्या मार्गाला लाग. इथून खाली जाणं तुलनेने सोपे आहे… वर यायला पाच दिवस लागले… खाली जायला दोनच दिवस लागतील… सोबत एक बडी देतो… जा… वहिनीला तुझी जास्त गरज आहे! ”
यावर ब्रावो एखाद्या लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला! ते पाहून प्रमुख अधिका-याचेही डोळे भरून आले! अंधार होऊ लागला होता… चढण सुरु करायला पाहिजे… वेळ गमवता कामा नये. पण ब्रावो काही केल्या तयार होईना… म्हणाला… ”साहेब, आपण अगदी जवळ आलोय… दोन रात्रींत पोहोचू वर. या मोहिमेत सहभागी होण्याचे भाग्य लाभावं म्हणून स्वयंस्फूर्तीने तुमच्या दलात आलो… कारण मला माहित आहे… मी डोंगर सफाईदारपणे चढू शकतो… माझा उपयोग होईल मोहिमेत! ”
यावर साहेब म्हणाले, ”ब्रावो, तुझी तर वार्षिक रजाही तू घेतली नव्हतीस. आता संधी आहे आणि गरजही. जा तू! ” त्यावर ब्रावो उत्तरला… ”अशा स्थितीत रजेचा विचारही मनाला शिवला नाही, साहेब! ” “हा तर माझ्या रेजिमेंटच्या इज्जतीचा सवाल आहे… नाम, नमक और निशान! ”
“साहेब, माझ्या सोबतीने आळीपाळीने दोरी लावण्यासाठी वर चढणा-या माझ्या बडीच्याअल्फाच्या पायांना मोठ-मोठे फोड आलेत… मी त्याला सांगितलं आहे… इथून पुढची सर्व चढण मी एकटा चढेन आणि दोर लावेन! ”
हे बोलणे सुरु असताना ज्याच्या पायांना फोड आलेले आहेत, असा त्याचा बडी, अल्फा पुढे झाला आणि त्यानेही ब्रावोची समजूत काढायला सुरुवात केली… एक एक क्षण पुढे जात होता… मोहिमेला उशीर होत होता!
सहका-याचे वाक्य पुरे होण्याआधीच ब्रावो एखादा स्फोट व्हावा तसा ओरडून म्हणाला… ”मला मूल झालंच आणि त्याने मला विचारलं… तुम्ही तुमच्या सहका-यांना ऐन लढाईत सोडून घरी निघून का आलात? तर त्याला मी काय सांगू? ”
सर्वच शांत झाले… प्रत्येकाच्याच मनात हाच सवाल होता. सर्वच जण एकमेकांसाठी जीवाला जीव देणारे सैनिक. कुटुंबांपेक्षा जास्त सहवास लाभलेले वीर. कित्येक मरणं अनुभवलेली पहाडी मनं.
यात अर्धा पाऊण तास गेला… शेवटी प्रमुखांनी… Its an order, Bravo! असं म्हटल्यावर जड पावलांनी ब्रावो तिथून खाली जायला तयार झाला… त्यानेच लावलेल्या दोरावरून खाली खाली घसरत चालला… एखादी निर्जीव वस्तू असावी तसा!
इकडे दोन रात्री चढण चढत चढत सैन्य वर पोहोचले… आता केवळ काही मीटर्स अंतर राहिले होते… शत्रूचे खंदक आणि आपल्या सैनिकांत… प्रमुखांनी कवर फायर साठी बेसला मेसेज दिला… तिथून मेसेज आला… नो गन फायर! युद्ध थांबवण्याचा आदेश आला होता… Cease-fire घोषित झाले होते. भारताने ऑपरेशन विजय पूर्ण केले होते. पराभूत पाकिस्तानी सैन्य त्या पर्वतावरून खाली उतरायला सुरुवातही झाली होती!
इकडे याच वेळी ब्रावो घरी पोहोचला होता… त्याने साहेबांना मेसेज केला… ”साहेब, बाळ-बाळंतीण सुखरूप! मी बाप झालो! ”
घरची काळजी बाजूला ठेवत मोहिमेत सहभागी झालेला, डोंगराएवढी समस्या असतानाही डोंगर चढत राहण्यासाठी अडून बसलेला सैनिक, मोहिमेची काळजी असतानाही सहकारी सैनिकाच्या कौटुंबिक समस्येची काळजी वाहणारे कमांडिंग ऑफिसर, मोहिमेतले प्रमुख अधिकारी… या सर्वच गोष्टी अलौकिक! या सर्वांचीच जणू दैवानेच धर्म संकटातून सुटका केली होती!
(प्रस्तुत कहाणी कारगिल युद्धादरम्यान घडलेली आहे. मेजर दीपेंद्रसिंग सेंगर (सेवानिवृत्त) यांनी त्यांच्या एका भाषणात ही कथा सांगितली होती. सैनिकी पद्धतीनुसार त्यांनी त्यावेळी ब्रावो, अल्फा ही नांवे वापरली होती. ही नावे म्हणजे रेडीओ सिग्नल्स असतात. पण पुढे Monks and warriors नावाच्या podcast मध्ये त्यांनी ब्रावोच्या नावाचा उल्लेख केला आहे… सुभेदार मेजर बाळू मोहारे (निवृत्त)! आणि त्यांचे छायाचित्रसुद्धा दाखवले आहे.)
© श्री संभाजी बबन गायके.
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






