उज्ज्वला केळकर
☆ सृजनाचे क्षण… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर ☆
आता ‘पांघरूण’कथेविषयी. याच क्रेशमधला एक मुलगा. त्याचं नाव मी ठेवलं ‘सर्जा’. सर्जाचं घर, मी, तळा-गाळातलं कुठलंही प्रतीनिधिक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड, दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या संसाराबाबतचं कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडलेका’शिवाय बोलणं नाही. आईदेखील सदा करवादलेली.
आज क्रेशमध्ये चादरींचं वाटप होतं. त्यासाठी सगळ्या आयांना बोलावलं होतं. मी कथेत चादरींची केली ब्लॅंकेटस्. नाना रंगांची आकर्षक ब्लॅंकेटस्. आपल्याला कोणत्या रंगाचं ब्लॅंकेट मिळेल? तो विचार करायचा. त्याला लाल ब्लॅंकेट मिळालं होतं. त्याचा जर्मनीतला भाऊ डेव्हीड सारखंच. सर्जा अतिशय उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. त्याने घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावलं आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून गेले.
सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो. आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते. हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल. अशी चिकटेल, लई मजा येईल. तो सर्जाच्या अंगावरचे ब्लॅंकेट ओढू लागतो. ‘ब्लॅंकेट दे’ म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘माझ्या जर्मनीतल्या बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही. ’
‘तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो.
सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येतं, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधीकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते…इथे कथा संपते.
तर अशा अनेक कथांमागच्या कथा सांगता येतील. अनेकदा प्रत्यक्ष अनुभव न घेता मानसिक अनुभवावरही मी कथा लिहिल्या आहेत. जे सुचलं, ते एकदा कागदावर उतरलं, की तृप्तता येते. समाधान वाटतं. आनंद होतो. तरीही मी, काही जण म्हणतात, त्याप्रमाणे असं म्हणणार नाही, की मी ‘स्वान्त सुखाय’ लिहिते. ‘स्वान्त सुखाय’च जर लिहायचं असेल, तर छापायला पाठवायचा खटाटोप कशाला करायचा? मला जे वाटतं, भावतं, ते तसं इतरांनाही भावतं, आवडतं का? हे मला समजून घ्यावसं वाटतं, त्यांच्या प्रतिक्रिया समजून घ्याव्यात, त्यातून काही नवीन शिकायला मिळेल का, हेही बघावं, असं वाटतं म्हणून मी लिहिते आणि छापायलाही देते.
अनेक जण अर्थप्राप्तीसाठी लिहितात. नावलौकिक मिळावा म्हणूनही लिहितात. मागणी तसा पुरवठा करणारीही काही लेखक मंडळी आहेत. संपादक, प्रकाशक, प्रायोजक यांनी सांगितलं, म्हणून लिहिणारीही काही लेखक मंडळी आहेत. इतरांचं कशाला? मी माझंच एक उदाहरण सांगते. सांगली आकाशवाणीच्या नाट्यविभागाने एकदा मला सांगितलं, जागतिक आरोग्यादिनाच्या निमित्ताने ‘फास्ट फूड’ या विषयावर तुम्ही नभोनाट्य लिहा. ठाशीव, साचेबंद विचार – फास्ट फूडचे फायदे-तोटे इ. बद्दल मला लिहावेसे वाटत नव्हते. या शब्दाभोवती विचार करता करता ‘फास्ट फूड’ संकल्पनेच्या नाना परी मला सुचल्या. बाजारात मिळणारं नेहमीचं फास्ट फूड, दहा दिवसात दहावी विज्ञान, भूगोल, इ. ‘इंटलेक्चुअल फास्ट फूड, ’ ‘कल्चरल फास्ट फूड’, ‘जेनेटिक फास्ट फूड’ (९ महिन्यांऐवजी ९ आठवड्यात बाई बाळंतीण व्हावी, म्हणून संशोधन) वगैरे… फॅँटसीच्या अंगाने मी हे नभोनाट्य लिहिले. ते अनेकांना आवडलेही. माझ्याकडे वरील विषयाची मागणी झाली नसती, तर मी हे नभोनाट्य वा नंतर याचीच केलेली कथा मुळीच लिहिली नसती. म्हणजे हा विषय मला सुचलाच नसता. माझी एकूण ५ नभोनाटये, व १००च्या वर ‘प्रतिबिंब’ शीर्षकाखालील कौटुंबिक श्रुतिका प्रसारित झाल्या आहेत.
सांगली आकाशवाणीच्या नाट्यविभागाने माझ्याकडून ‘एड्स्’ या विषयावरही सांगून नभोनाट्य लिहून घेतले. त्या विषयावरही मागणी नसती, तर मी नाटक, कथा लिहिली नसती.
एकदा एका मुलाखतीत कुणी तरी मला माझ्या लेखन प्रवासाविषयी विचारले. मग मीही त्याचा मागोवा घेऊ लागले. मला आठवतं, मी आठवीत असताना पहिली कविता लिहिली. त्यावेळी गोवा मुक्तिसंग्राम अगदी शिखरावर होता. रोज नव्या बातम्या. त्यावर चर्चा वगैरे… एक दिवस बातमी आली, या संग्रामातले शिलेदार हेमंत सोमण रस्त्यातून तिरंगा घेऊन चालत असताना पोर्तुगीज सैनिकाने त्यांना गोळी घातली. ते शहीद झाले. सर्वांना वाईट वाटलं. त्या दिवशी कशी कोण जाणे, मला कविता सुचली,
‘ हेमंत सोमणांनी गोव्यात झेंडा रोविला.
तडतडा तडकले पोर्तुगीज झेंडा त्यांनी पाहिला ‘ यानंतर ओळींवर ओळी… ते हुतात्मा झाले इथपर्यंतच्या. सगळ्यांनी कवितेचे कौतुक केले. पण दुसर्या दिवशी बातमी आली, त्यांना गोळी मारली नाही. त्यांना तुरुंगात टाकले. बातमी चांगलीच होती. आम्ही आनंदोत्सव साजरा केला. झाले ते चांगलेच झाले, पण माझी बिच्चारी कविता मात्र शहीद झाली. त्यानंतर शाळेत फारशी काही कवितेच्या वाटेला गेले नाही. नाही म्हणायला ११वीच्या निरोप समारंभाच्या वेळी एक कविता करून म्हंटलेली आठवते.
कॉलेजमध्ये असताना मला कवितेत रस असणार्या, कविता करणार्या मैत्रिणी मिळाल्या. आणि मीही उत्साहाने कविता करू लागले. हळू हळू वैचारिक, ललित लेखनही सुरू झालं. अभ्यासाचा सराव म्हणून असेल, मी कविता, कथा, पुस्तके यांची समीक्षाही करू लागले.
माझं लग्न झालं आणि मी सांगलीजवळील माधवनगरसारख्या खेड्यात एकत्र कुटुंबात राहू लागले. पुढे दोन-तीन वर्षे घरात काम काम आणि कामच. काही नवीन सुचायला आणि विचार करायला वाव आणि वेळच नव्हता. माझे लेखन थांबलेच जसे. नाही म्हणायला किरकोळ कविता अधून –मधून लिहिल्या जात. त्या जाणणार्या आणि कविता लिहिणार्याही काही जेष्ठ कवयित्री तिथे मला मिळाल्या. महिला मंडळाच्या ‘वंदना’ या हस्तलिखित वार्षीकाच्या संपादनाचेही काम तिथे मी केले.
पुढे १९७० साली मला सांगलीच्या डी. एड. कॉलेजमध्ये अध्यापनाची नोकरी लागली. तिथे अनेक विद्यार्थिंनींशी संबंध आला. त्यांच्या नाना कथा आणि व्यथा मला कळल्या, पण तरीही मी कथेच्या वाटेकडे वळले नव्हते. बाकीचे लेखन मात्र पूर्ववत चालू होते. या काळात माझे अनुभवविश्वही विस्तारले. मला लेखनाला नवनवे विषय सुचले. तरीही या काळात माझे प्रामुख्याने लेखन हे कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी झालं.
माझं कथालेखन त्या मानाने उशिरा सुरू झालं. त्याला कारणही तसंच घडलं. मला लग्नानंतर दहा वर्षाने मुलगा झाला. तोपर्यंत मुलाची (मुलगा किंवा मुलगी) वाट पाहून आम्ही अनाथाश्रमातून मूल दत्तक घ्यायचे ठरवले होते. त्यासाठी फॉर्म भरणे वगैरे चालू केले होते आणि अचानक मला दिवस गेल्याचे लक्षात आले. नंतर माझ्या मनात आलं, जर मी आधी मूल दत्तक घेतलं असतं आणि नंतर मला स्वत:चं मूल झालं असतं, तर घरातली, नात्यातली, शेजारची त्याच्याशी कशी वागली असती? यातून मला ‘परक्याचं पोर’ हे कथा सुचली. बाळंतीण असतानाच मी ती लिहिली. ही माझी पहिली वाहिली कथा. ती खूप गाजली. मला अनेक खुषीपत्रे आली. त्यानंतर मी बर्याच कथा लिहिल्या. त्याही गाजल्या. माझे ५ कथासंग्रह प्रकाशित आहेत. १. कृष्णस्पर्श २. धुक्यातील वाट ३. झाले मोकळे आकाश ४. फास्ट फूड ५. पाचा उत्तरी सफल संपूर्ण. माझे २ कविता संग्रह आहेत. १. चंद्रपालखीची वाट २. मृगजळाकाठी. एक भौगोलिक पुस्तक आहे. ‘भारतीय नद्यांची ओळख. ’ यात भारतातील मुख्य नद्या व त्यांना मिळणार्या ३-४ महत्वाच्या उपनद्या यांची भौगोलिक व सांस्कृतिक महिती दिली आहे.
याशिवाय माझी बालवाङ्मयाची ३०-३२ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यात कथा, कविता, नाटिका, चरित्र इ. प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. माझ्या काही कथांचा हिंदीत, तर तुरळकपणे उडिया, तेलुगु, कन्नडमध्ये अनुवाद झाले आहेत. मला माझ्या एकंदर लेखनासाठी, बालवाङ्मयाच्या ३ पुस्तकांसाठी, २ अनुवादीत पुस्तकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. तसेच मला जालंदर येथे पंजाब कला साहित्य अॅकॅडमीचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे मला कोटा येथे ‘शब्दसरोज सन्मान’, व जबलपूर येथे ‘डॉ. श्रीराम दादा ठाकूर संस्कारधानी सन्मान’ मिळाला आहे. पण महाराष्ट्राबाहेरचे हे पुरस्कार सन्मान मला माझ्या अनुवादित साहित्यासाठी मिळाले आहेत.
अनुवादीत साहित्य हा माझ्या लेखनाचा आणखी एक टप्पा. मला अनुवादित साहित्य वाचायला आवडतं आणि अनुवाद करायलाही आवडतो. अनुवाद म्हणजे केवळ एका भाषेतील शब्दाला, दुसर्या भाषेतील प्रतिशब्द देणे नव्हे. ते झाले भाषांतर. अनुवाद हीदेखील पुनर्निर्मिती असते. अनुसृजन असंही काही लोक त्याला म्हणतात. तो शब्द मला फार आवडतो. तर मी अनुवाद करते म्हणजे पुनर्निर्मिती किंवा अनुसृजन करते.
मी फक्त हिन्दी भाषेतील साहित्याचा अनुवाद करते. अनुवादामुळे, वेगवेगळे प्रदेश, तिथला परिसर, वातावरण, लोकजीवन, लोकसंस्कृती, त्यांचे रीतिरिवाज, त्यांची जीवनदृष्टी कळून येते. नवीन ज्ञान होतं. त्याचबरोबर हेही कळतं, की जीवनपद्धती वेगवेगळी असली, तरी संस्कृतीचा अंत:स्त्रोत एकच आहे. मी आत्तापर्यंत, मोहनलाल गुप्ता, प्रतिमा वर्मा, सूर्यबाला, मधु कांकरीया, भगवान वैद्य ‘प्रखर’, सुशांत सुप्रिय, गिरिमा घारेखान, हंसा दीप, इ. लेखकांच्या कथांचा अनुवाद केला आहे. रेत में खोयी नदी, संघर्ष, गोरा, गोदान इ. कादंबर्यांचा अनुवाद केला आहे. माझे ७ अनुवादित लघुकथा संग्रह प्रकाशित आहेत. हरीशंकर परसाई, घनश्याम अग्रवाल यांच्या व्यंग्य लेखनाचाही मी अनुवाद केला आहे. सरश्री तेजपारखी, स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानात्मक पुस्तकांचाही मी अनुवाद केला आहे. माझ्या अनुवादीत पुस्तकांची संख्या ३५ च्या वर आहे. काही पुस्तके छापली जाण्याची वाट बघत प्रकाशकांच्या रांगेत उभी आहेत.
अभिमन्यू जसा चक्रव्यूहात शिरला आणि आत आतच जात राहिला, तसेच माझे अनुवादाच्या बाबतीत झाले आहे. मी एकदा अनुवादात घुसले, ती त्यातच गुरफटत गेले. माझे स्वत:चे लेखन बाजूलाच पडले. पण मला यातही आनंद मिळाला. अगदी नवनिर्मिती केल्याचा आनंद. तर असे हे माझे काही सृजनाचे क्षण, जे मला आनंद, समाधान, तृप्ती देऊन गेले. आपल्या सगळ्यांना ते सांगावेसे वाटले, म्हणून हा लेखन प्रपंच.
— समाप्त —
© उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




